चंद्रपुरात मुलगी नकोशी झालीय का? जिल्ह्याच्या तुलनेत चंद्रपूर शहराची धक्कादायक आकडेवारी; चंद्रपूर मनपाचा आरोग्य विभाग कागदावरच; safarnamafmचा स्पेशल रिपोर्ट



चंद्रपूर : बीड सारख्या जिल्ह्यात स्त्रीजन्म दर कमालीचा घसरला आणि त्या तपासात मुंडे दाम्पत्याने सुरू केलेल्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला. राज्यात सांगली, कोल्हापूर या ठिकाणी देखील अशाच अवैध गर्भलिंग निदान करणाऱ्यांचे रॅकेट उघडकीस आले. चंद्रपूर जिल्ह्यातील आणि विशेषतः चंद्रपूर शहरातील स्त्री जन्मदराची धक्कादायक आकडेवारी नेमकी याच भीतीकडे लक्ष वेधत आहे. यावर मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्यांची या गंभीर विषयाबाबत लपवाछपवी आणि कारवाईशून्य कारभार या शंकेला आणखी बळ देत आहे. जिल्ह्याचा स्त्री जन्मदर हा कमी झाला आहे त्या तुलनेत चंद्रपूर शहराची आकडेवारी ही अत्यंत चिंताजनक आहे. जिल्ह्याच्या तुलनेत एकट्या चंद्रपूर शहरात अर्ध्याहून अधिक खासगी प्रसूतीगृहे आणि सोनोग्राफी केंद्रे आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सरासरी जन्माला येणाऱ्या एकूण मुलांपैकी (मुलं आणि मुली) जवळपास 50 टक्के संख्या ही एकट्या चंद्रपूर शहराची आहे. मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांच्या तुलनेत चंद्रपूर महानगरपालिकेची आकडेवारी  ही खालच्या स्तरावर आहे. जिल्ह्याच्या तुलनेत मनपाची सरासरी देखील मोठी तफावत आहे.  त्यामुळे चंद्रपूर शहरात असे कुठले रॅकेट सक्रिय असण्याची दाट शक्यता आहे. मात्र मागील सात वर्षांत अशा एकाही रॅकेटचा पर्दाफाश आरोग्य यंत्रणा करू शकली नाही.

Chandrapur female ratio



Chandrapur female ratio


गर्भात असलेल्या भृणाचे लिंग जाणून घेणे हे PCPNDT कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. मात्र, समाजात अजूनही काही लोकांना मुलगी नकोशी आहे. अशा सामाजिक अपप्रवृत्तीला खतपाणी तेव्हा मिळते जेव्हा अवैधरित्या गर्भलिंग निदान करणारे एक रॅकेट तयार होते. जेव्हा अचानक स्त्री जन्मदर कमी होतो आणि तो सातत्याने कमी होत जातो त्यातून कुठे तरी अवैधरित्या गर्भलिंग निदान करणारे रॅकेट सक्रिय आहे याची खात्री निर्माण होते. चंद्रपूर शहराची आकडेवारी हीच संशयाची सुई निर्माण करत आहे. एका हजारामागे मुलांमागे किती मुली जन्माला आल्या त्यानुसार जन्मदर ठरवला जातो. चंद्रपुरात 2020 मध्ये 6 हजार 918 मुलांचा जन्म झाला तर याच वेळी फक्त 6 हजार 52 मुली चंद्रपूर शहरात जन्माला आला. ही आकडेवारी एक हजारामागे केवळ 866 अशी आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयाच्या मागील सात वर्षांच्या आकडेवारीत 900 पेक्षा खाली स्त्री जन्मदर कधीही गेलेला नाही. इतकी चंद्रपूर शहराची आकडेवारी गंभीर आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील 65 प्राथमिक आरोग्य केंद्रात स्त्री जन्माचा दर हा हजाराहून वर गेला आहे.  2021 मध्ये एक हजार मुलांमागे 1120 मुली, तर 2022 मध्ये 1008 मुलींचा जन्म झाल्याची नोंद आहे. त्यामुळे चंद्रपुरात नक्कीच कुठेतरी पाणी मुरत आहे, पण मनपाचे आरोग्य अधिकारी त्याचा शोध घेण्याऐवजी ही बाब लपविण्यात धन्यता मानत आहे.

Chandrapur sex ratio



Chandrapur female sex ratio

जिल्ह्याच्या तुलनेत चंद्रपुरात कमी झालेला स्त्री जन्मदर


2019 ते 2024 या सहा वर्षांत जिल्ह्याचा स्त्री जन्मदर हा अनुक्रमे 944, 922, 959, 939, 944 आणि 929 असा आहे. ग्रामीण रुग्णालयांच्या क्षेत्रात हे गुणोत्तर 985, 983, 982, 988, 976 आणि 993 तर गावपातळीवर काम करणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचे गुणोत्तर हे 957, 922, 1120, 1008, 962, 966 असे आहे. पण या तुलनेत सर्वाधिक निराशाजनक जन्मदर हा चंद्रपूर महानगरपालिका कार्यक्षेत्राचा आहे. हा जन्मदर 2019-901; 2020-866; 2021-939; 2022-927; 2023-947; 2014-947 असा आहे. त्यात 2017 पासून हा जन्मदर सातत्याने खाली घसरला आहे. 2017 मध्ये स्त्री जन्मदर गुणोत्तर 988 होते, 2018 मध्ये 907 तर 2019 मध्ये 901 असे होते.


मनपाचा आरोग्य विभाग 'कारवाईशून्य'

स्त्री जन्मदराबाबत शासन गंभीर आहे. अवैधरित्या गर्भलिंग निदान होत असलेला प्रकार उघडकीस आणण्यासाठी डिकॉय केसेस करण्याची तरतूद आहे. असा प्रकार उघडकीस आणणाऱ्या खबरीला राज्य शासनाकडून 1 लाख आणि मनपा प्रशासनाकडून 25 हजार इतकी रक्कम दिली जाते. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी याबाबत आरोग्य विभागाची वारंवार कानउघडणी केली आहे. मात्र गेल्या सात वर्षांपासून एकही रॅकेटचा पर्दाफाश करणारी कारवाई झालेली नाही. आरोग्य विभाग चंद्रपुरात सर्वकाही सुरळीत असंच भासवत आहे. 

Post a Comment

0 Comments