64 वी राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा, चंद्रपूर केंद्र; नाट्य समीक्षण : 'अस्तित्व ऍट अंश डॉट कॉम'

 नाट्य समीक्षण : 'अस्तित्व ऍट अंश डॉट कॉम'


(या स्पर्धेचे सर्व नाट्य समीक्षण वाचण्यासाठी वरील home बटनवर क्लिक करा)


Drama


  ना टकाची संहिता किती सशक्त किती दुबळी याचा विचार हा नाटक स्पर्धेत उतरविण्यापूर्वी घ्यायचा असतो. मात्र एकदा का याची निवड झाली की संहिता कशीही असो ती  अंगीकृत करत आपल्या संपूर्ण संभाव्य कलात्मक ताकदीनिशी उतरविणे हे कुठल्याही स्पर्धकाने अंतिम लक्ष असायला हवे. यात 'अस्तित्व ऍट अंश डॉट कॉम'  नाटकाचे सादरीकरण खरे उतरले नाही. प्रयत्न चांगला असला तरी पात्रांच्या सर्वांगांना न समजता केलेला अभिनय, निर्णायक प्रसंगी नाट्य निर्मिती करण्याची फिस्कटलेली टायमिंग, तपशिलवार नेपथ्य उभे करण्याची गमावलेली संधी, एकमेकांची सांगड घालणाऱ्या कथानक- पार्श्वसंगीताची सुटलेली लयबद्धता आणि औपचारिकता पूर्ण करणारी रंगभूषा-वेशभूषा, प्रकाशयोजना यामुळे परिणामकारक नाट्य उभे राहू शकले नाही. 

'अस्तित्व ऍट अंश डॉट कॉम' या नाटकाची संहिता आणि आजच्या युगात कथानकातील साधर्म्य याचा फारसा मेळ लागत नाही. इंटरनेटच्या प्रारंभी काळात नाट्यसृष्टीत अशा नावाचा उपयोग केला जायचा पण स्मार्टफोनच्या युगात नाटकाचे नामकरण हे 'आऊटडेटेड' वाटते. एकीकडे स्मार्टफोन आणि दुसरीकडे लँडलाईनची हतबलता ही बाब संहितेच्या परिपक्वतेवर बोट ठेवते. लेखकाने संहितेत केवळ लँडलाईन वापराच्या 'भूमिकेसाठी' दोन प्रौढ सुशिक्षित व्यक्तींना स्मार्टफोनपासून वंचित ठेवले ही बाब तंत्रज्ञानाच्या नावावरून नाटकाचे नामकरण करण्याच्या संस्कारावरंच प्रश्नचिन्ह उभे करते. अन्यथा नाटकाच्या नावाचा कथानकाशी काही संबंध नाही. 

आपल्या मुलाने उंच भरारी घ्यावी यासाठी जमेल ती सर्व तडजोड करून त्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठविणारे अनेक पालक आहेत. मात्र परदेशात गेल्यावर मुलांचा सुर बदलतो. त्या वातावरणात राहून आपल्यासाठी दिवसरात्र एक करणाऱ्या जन्मदात्यांना ते दूर सारतात, त्यांचा तिरस्कार करायला लागतात. आपल्या आईवडीलांना ते केवळ 'उपयोगिता' म्हणून बघायला लागतात. अशा नाकर्त्या मुलांची संख्या आपल्या भारतीय समाजात काही कमी नाही. याच विषयावर हे नाटक भाष्य करते. 

अविनाश आणि अनघा आपला एकुलता एक मुलगा अमेय याला उच्च शिक्षणासाठी परदेशी धाडतात. यासाठी बँकेतून स्वेच्छानिवृत्त झालेले अविनाश आपली सर्व मिळकत मुलासाठी खर्च करतात. पण मुलाला भारतात येऊन  त्यांच्यासोबत राहायचं नाही आणि त्यांना तिकडे देखील बोलवायचं नाही, अशी तणावाची परिस्थिती. अशातच मुलाने सांगितल्यानुसार त्याची मैत्रीण 'प्राची' त्यांच्या घरी राहायला येते. इच्छा नसताना मुलाच्या 'इमोशनल ब्लॅकमेलिंग' समोर हतबल होऊन ते तिला घरी ठेवतात आणि बघता बघता तिच्याशी या दाम्पत्याचा लळा लागतो. तिचा स्वभाव पाहून ते तिला आपली सून म्हणून बघतात. पण यामागे अमेयची क्रूर योजना असते. ती प्राची नसून त्यांचा खून करण्यासाठी नेमलेली 'कोमल' असते. त्यांची हत्या करून सर्व संपत्ती आपल्या नावावर करावी असा त्याचा कट असतो. हे करत असताना या दाम्पत्याचं निर्व्याज प्रेम बघून कोमलचं मतपरिवर्तन होतं. पुढे या संपूर्ण षड्यंत्राचा उलगडा होतो आणि आपल्याला मुलाचा त्याग करून हे दाम्पत्य कोमलसोबत जाण्याचा निर्णय घेतात असे थोडक्यात या नाटकाचे कथानक आहे.

ढोबळमानाने नाटकाची संहिता जरी नाट्यपूर्ण असली त्यात सखोल मांडणीचा अभाव आहे. केरळी असल्याचा बनाव करून आलेल्या कोमलच्या संवादात कुठलाही दाक्षिणात्य प्रभाव नाही, स्मार्टफोन आणि व्हाट्सएप कॉलिंगच्या जमान्यात लँडलाईनचा वापर, केवळ 40 हजारात दोघांच्या खुनाची सुपारी घेणारी कोमल, आपल्या खुनाचे षड्यंत्र रचणाऱ्या मुलाला कुठलाही जाब न विचारणारे दाम्पत्य, आपली सर्व संपत्ती दान करून वृद्धाश्रम उघडण्याच्या निर्णयापर्यंत पोचणारे दाम्पत्य, एकाच भावनेला घेऊन त्याच त्याच पद्धतीने व्यक्त होणारे स्वगत यात भावनिक सुसंगतीचा अभाव दिसून आला.

मात्र याचे सादरीकरण त्याहून अधिक प्रभावहीन झाले. अमेय हा अमेरिकेत राहणारा त्याचा संवाद किमान इंग्रजी वाटावा याचीही तसदी घेण्यात आली नाही. फोनवरून बोलताना हातात माईक संवाद करण्याऐवजी विंगेतून आवाज काढण्यात आला. घरात दरवाजा आहे तो उघडता आणि बंद करावा लागतो याची फारशी तसदी कलवंतांनी घेतली नाही. केरळ येथे राहणाऱ्या मुलीचा पेहराव कसा असावा यावर ध्यान दिले नाही. घराला घरपण देण्यासाठी नेपथ्य आणि प्रॉपर्टीचा देखील उल्लेखनीय वापर केला गेला नाही, नकारात्मक पात्रासाठी वापरलेल्या लाल रंगाचा उपयोग प्रकाशयोजना करताना त्यात नेमकेपणा नव्हता, संगीताचा त्रोटक वापर, त्यांची सुसंगतपणा राखला गेला नाही, संवाद नसताना देखील आवाजाची उंची वाढवली गेली नाही. अभिनयातुनही फारसा प्रभाव साधला गेला नाही. चुकलेली टायमिंग, संवादाचा नेमका भावसंदर्भाचा अभाव, अडगळीची देहबोली यामुळे त्यातील गांभीर्य टिकवून ठेवता आले नाही. 

 किशोर गौरशेट्टीवार यांनी प्रामाणिक प्रयत्न केला. 

-अमित शंकर वेल्हेकर

नाटक : अस्तित्व ऍट अंश डॉट कॉम
लेखक : सुहास देशमुख
दिग्दर्शक : राजा भगत
नेपथ्य : विनायक देशमुख, विनोद नेवस्कर
प्रकाश योजना : राजेश्वर पिंपरकर, भास्कर खैरे
पार्श्वसंगीत : शाम चोपडे, निकलेश ढोरे
रंगभूषा-वेशभूषा : रमेश मरगडे, सुधा भगत, अस्मिता भोसले
भूमिका : किशोर गौरशेट्टीवार, किशोरी केळापुरे, प्रशांत गावंडे, वैष्णवी दिवटे, विलास सुतार, श्रावण चांदेकर, आशिष घाटे.

Post a Comment

0 Comments