(स्पर्धेचे सर्व नाट्य समीक्षण वाचण्यासाठी home ऑप्शनवर क्लिक करावे)
पावसाळी रात्र. अस्वस्थ असलेला एक प्रसिद्ध लेखक आपल्या लोणावळ्याच्या फार्महाऊस येतो. काहीतरी महत्वाचं त्याला लिहायचंय. पण हात फ्रॅक्चर झाल्याने त्याला तातडीने एका टायपिस्टची गरज असते. त्याने मॅनेजरला सांगितल्यानुसार एक टायपिस्ट त्या पावसाळी रात्री येतो. तो त्याला कथाही सांगायला सुरुवात करतो. कथा काय त्याच्या जीवनातील भूतकाळालाच उजाळा देतो. पण ही त्याच्या जीवनाची केवळ एक बाजू असते. पुढे घडणाऱ्या नाट्यमय घडामोडीत टायपिस्ट त्याच्या खोलात दडून बसलेल्या दुसऱ्या व्यक्तिमत्वाची बाजू उलगडून दाखवतो. हा टायपिस्ट कोण, कुठला, त्याची पार्श्वभूमी काय याचा काहीच थांगपत्ता या लेखकाला लागत नाही. ते एक गूढ आहे. पण त्याचा कसला ना कसला तरी संबंध आपल्याशी आहे ही अस्वस्थ करणारी जाणीव त्याच्या मनात उत्तरार्धापर्यंत कायम असते. नाटकाचा निर्णायक शेवट बरेच काही सांगून जातो. अशी सस्पेन्स-थ्रिलर 'दि अनॉनिमस' या नाटकाची थोडक्यात कथा.
नाटकातील सशक्त कथानक, त्यातील ट्विस्ट अँड टर्न, धक्कातंत्र यामुळे शेवटपर्यंत हे नाटक खिळवून ठेवते. तीच रंगत कायम राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न सादरीकरणातुन करण्यात आला. नाट्य स्पर्धच्या उदघाटन सोहळ्यामुळे प्रयोगाला उशीर झाला. नाटकाची लय धरायला सुरुवातीची काही मिनिटे गेली पण टायपिस्ट भीमाच्या प्रवेशानंतर हे नाटक रंगात यायला सुरुवात झाली. एकूणच कथानकाच्या अपेक्षेप्रमाणे नेपथ्य साकारण्यात आले. प्रकाशयोजना, वेशभूषा ही सुद्धा अनुरुप अशी होती. पावसाचा इफेक्ट उभा करण्यासाठी सतत हलणाऱ्या निळ्या पडद्यावर केलेला प्रयोग हा ती रात्र जिवंत करणारा होता.
यातील सर्वात महत्वाची आणि प्रभावी गोष्ट म्हणजे रंगमंचाच्या मध्यभागी असलेल्या भिंतीवरील 'पेंटिंग' जो नाटकाच्या कथानकाचा आत्मा आहे. हा एक 'शॅडो इफेक्ट' आहे. 'शॅडो इफेक्ट' हा अमूर्त स्वरूपात असतो, त्याचे वेगवेगळे गहन पैलू असतात, त्याचे अन्वयार्थही वेगवेगळे असतात. पण सांगल्या जाणाऱ्या गोष्टीशी त्याचा अजोड संबंध असतो. सादरीकरणाचा हा एक सायकॉलॉजिकल इफेक्ट असतो ज्यामुळे प्रेक्षक कथानकाशी घट्ट बांधला जातो. या पेंटिंगने देखील सादरीकरणात हीच महत्वाची भूमिका बजावली.
पेंटिंगमधील श्रीकृष्ण, त्यांची बासरी, डोळ्यातून निघणारे दोन अश्रू, त्यातील अंधार-प्रकाश, त्या अश्रुत अडकलेल्या एकाच व्यक्तीमत्वातील दोन परस्परविरोधी प्रतिमा, त्यातील कॉन्ट्रास्ट हे या नाटकाचं गूढ कायम ठेवत मर्म उलगडून दाखवतं.
सोबतच बाजूच्या भिंतीवरील दारं नसलेले दोन पिंजरे, त्यात असलेले दोन पक्षी, एक उडण्याचा प्रयत्न करणारा दुसरा विसावलेला हे चित्र देखील परस्परपूरक असे होते.
सर्व कलावंतांनी आपापला अभिनय चोखपणे पार पाडण्याचा प्रभावी प्रयत्न केला. यात जरासंध म्हणून जयंत वंजारी यांनी छाप सोडली. वयोमानानुसार आलेली स्थूलता, स्वभावातील कणखरपणा, आत चाललेले द्वंद्व, पश्चाताप, समोर दिसत असलेला प्रारब्ध, त्यातून आलेली हतबलता या सर्व बाबी त्यांनी नियंत्रित देहबोली, शब्दविराम आणि प्रभावी संवाद यातून प्रभावीपणे साकारल्या. या पात्राचा मेकअप व्यक्तिमत्वाला फुलवण्यात यशस्वी झाला. यातील मोहन/पांडुरंग, छाया/प्रमिला, भीमा, जिवा यांचे पात्र देखील सादरीकरणात प्रभावी ठरले. पांडुरंगचा चष्मा काढलेला आणि जिवासोबतचा शेवटचा प्रसंग, छायाचा मोहन सोडून गेल्यानंतरचा मोनोलॉग, भीमाचा "मी जरासंध" हा संवाद प्रभावी ठरला. विशेषतः पात्रांची वेशभूषा ही कालसुसंगत अशी होती.
कथानकतील पात्र आणि त्याचे संवाद ही एक प्रकारची मोजपट्टी असते. त्यावर कुठले रंग उधळायचे हे स्वातंत्र्य सर्वस्वी दिग्दर्शक आणि कलावंताचे असते. भीमाचे पात्र साकारताना हा प्रयत्न 'मोजपट्टी'त अडकल्याचे जाणवले. हे पात्र आभासी असले तरी प्रेक्षकाच्या दृष्टीने खरे आहे. तो अपंग आहे म्हणजे त्याला नेमका कुठला व्यंग आहे हे समजत नाही, केवळ एका पायाने पंगू आहे यातून त्याच्या देहावस्थेची नेमकी माहिती मिळत नाही. शिवाय बालपणी झालेला अपंग व्यक्ती हा चेहऱ्यावर कधीच वेदना आणून चालत नाही, मात्र हे पात्र चालताना नेहमी चेहऱ्यावर वेदना आणून चालत असते. पुढे अनेकदा क्रच (काठी)च्या आधारावर चालताना पायांची चुकामुक झाली.
पाऊस पडत असल्याच्या इफेक्ट दाखवणारा 'स्पॉट' स्पष्टपणे दिसून येत होता, नंतर त्याची जागा बदलली. निळ्या पडद्याच्या डाव्या बाजूचा लाईट एकदा बंद झाला, नाट्यगृहातील साउंड सिस्टीम काहीशी सुव्यस्थित नसल्याने पार्श्वसंगीत आणि कथन सुस्पष्टपणे पोचायला अडचण झाली. पहिल्या प्रसंगात फोन उचलल्यानंतरही रिंग सुरू होती, मोहन-छायाच्या प्रेमप्रसंगानूरूप 70 च्या दशकातील गाणे वजविण्यात आले त्याऐवजी काळ जिवंत करण्यासाठी 90 दशकातील एखादे गाणे वापरता आले असते. डाव्या बाजूला असलेली खुर्ची आणि त्या जागेचा वापर सुनियोजित पद्धतीने करता आला असता. भीमाचा "मी जरासंध' ह्या संवादात ब्लॅकआऊट होण्यापूर्वीच पात्र निघून गेले. अशा बऱ्याच गोष्टी घडल्या.
हे नाटक म्हणजे वर्तमानकाळ आणि भूतकाळाचा लपंडाव आहे. मात्र हे दोन स्थित्यंतर सादरीकरणात तितके लयबद्ध होऊ शकले नाही. परफॉरमिंग आर्ट मध्ये पर्सेप्सशन हा महत्वाचा भाग असतो. तुम्हाला जे सादर करायचे आहे तो प्रभाव आणण्यासाठी तुम्ही काहीही करू शकता. वर्तमानकाळ आणि भूतकाळ दिसायला हे दोन समांतर बिंदू आहेत. पण हे टू डायमेंशनल जग नसून वर्तमानकाळ, भुतकाळ आणि वर्तमानकाळ असं थ्री डायमेंशनला आहे. खरं तर ही एक कधीही न संपणारी शृंखला आहे, हे एक loop आहे. या पद्धतीने त्याची हाताळणी झाली असती तर हे नाटक अधिक लयबद्ध झालं असतं.
-अमित वेल्हेकर
नाटक : दि अनॉनिमस
दिग्दर्शक : मकरंद परदेशी
नेपथ्य : दिगंबर इंगळे
संगीत : श्रीकांत अंबेरे
प्रकाश योजना : मिलिंद गवई
कलावंत : जयंत वंजारी, मकरंद परदेशी, मंजिरी कीर्तने, ज्ञानदीप कोकाटे, सायली देठे, सुदीप गुठे
0 Comments