चंद्रपूर : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने लागू केलेल्या नियमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांची आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची धुरा देखील याच विभागाकडे आहे. मात्र, ज्या विभागाकडे ही सर्व जबाबदारी आहे त्यांच्याकडूनच मंत्रालयाच्या या नियमांना वाकुल्या दाखवल्या जात आहे. मोठ्या शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी वर्दळीच्या सिग्नलवर टायमर बसवला जातो. मात्र केवळ आपली डोकेदुखी कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी शहरातील टायमर असलेल्या सर्व सिग्नलवरील ही व्यवस्था बंद केली आहे. यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली असून छोट्यामोठ्या अपघातात वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांना वाहन चालविण्यात प्रचंड त्रास होत असून वाहतूक विभागाने मात्र यावर मुकदर्शकाची भूमिका घेतली आहे. स्वतःची डोकेदुखी वाचविण्यासाठी चंद्रपूर वाहतूक पोलिसांनी काढलेला उपाय हा राज्यातील उत्तम असा 'नमुना' असून वाहतूक मंत्रालयाने याची दखल घेऊन हा 'मॉडेल' संपूर्ण देशभरात लागू करावा का याबाबत विचार करणे आता आवश्यक झाले आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या नियमांनुसार ज्या सिग्नलवर वाहतुकीची वर्दळ अधिक आहे, त्या ठिकाणी सिग्नलवर टायमर लावला जातो. यामुळे आपला सिग्नल सुरू व्हायला किती वेळ बाकी आहे, दुसऱ्या रस्त्याच्या टायमर बाबत अचूक माहिती मिळते. त्यामुळे सिग्नल तोडणाऱ्यांच्या संख्येत घट होण्यास मदत मिळते. तसेच अधिकचा वेळ असल्यास वाहनधारक आपली वाहने बंद ठेवतात. त्यामुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण नियंत्रित राहते. देशभरातील सर्व मोठ्या शहरांत अशी व्यवस्था आहे. या तंत्रज्ञानामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यास मोठी मदत मिळते. हे तंत्रज्ञान येण्यापूर्वी सिग्नल सुरू आणि बंद व्हायच्या आधी नारंगी लाईट लागायचा. मात्र तो लगेच लागल्याने अनेक अपघात व्हायचे तसेच यामुळे सिग्नल तोडणाऱ्यांच्या संख्या देखील अधिक असायची. त्यामुळे हा टायमरचे तंत्रज्ञान लागू करण्यात आले. मात्र चंद्रपूरात वाहतूक पोलिसांचा परतीचा प्रवास बघायला मिळत आहे. वाहतूक पोलिसांनी शहरातील सिग्नल असलेले सर्व टायमर बंद करून टाकले आहे. यामुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला समोर जावे लागत आहे. याबाबत वाहतूक पोलिस प्रशासनाची बाजू जाणून घेण्यास वाहतूक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांच्याशी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. जनतेच्या प्रश्नाबाबत आणि जनसेवकाच्या कार्यकक्षेत येणारा हा विभाग किती सजग आहे याची प्रचिती येत आहे.
लोकप्रतिनिधी 'चिरनिद्रेत'
चंद्रपूर शहराची वाहतूक व्यवस्था नाहकपणे वेठीस धरली गेली आहे. मात्र, चंद्रपूरचे लोकप्रतिनिधिंना याचे काहीही सोयरसुतक नाही. राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक उईके, चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर, चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर जोरगेवार, विधानपरिषदेचे आमदार सुधाकर अडबाले यांनी या अव्यवस्थेची कुयहलीही दखल अद्याप घेतलेली नाही. त्या संबंधात जबाबदार अधिकाऱ्यांना जाब विचारलेला नाही त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार सर्रास सुरु आहे. यामुळे चंद्रपुरकरांची मात्र चांगलीच गैरसोय होते आहे.
0 Comments