64 वी राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा, चंद्रपूर केंद्र; नाट्य समीक्षण : 'भूत झोंबलं तात्याला''

 नाट्य समीक्षण : ' भूत झोंबलं तात्याला'


(या स्पर्धेत सादरीकरण झालेल्या सर्व नाटकांचे समीक्षण वाचण्यासाठी वरील home बटनवर क्लिक करा)

Drama



'भू त झोंबलं तात्याला', भुताची संकल्पना घेऊन धमाल उडवून देणारे नाटक ठरले. क्षणोक्षणी होणारी प्रासंगिक विनोदनिर्मिती आणि नाविन्यपूर्ण सादरीकरणातुन हे नाटक समर्थपणे उभे ठाकले. 

जमादार म्हणून सेवानिवृत्त झाल्यावर तात्यांच्या वाट्याला येतात ती बायकोची दुषणे, सुनेनी दिलेली घरकामे आणि मुलाचे फटकळ वागणे. पण तात्याही काही कमी नंबरी नाही. त्यांनीही जीवन जगण्याची कला शिकली आहे. म्हणून आपल्याच पोराच्या खिशातील पैसे चोरून 'मटका' लावायला देखील ते संकोचत नाहीत. पोरगाही तात्याचाच, त्यामुळे पैसे चोरी गेल्याचे लक्षात आल्यावर पहिला आड तो तात्यावरंच घेतो. झडतीत तात्यांची चोरी रंगेहाथ पकडली जाते आणि ही स्थिती आता आपल्यावर अधिक उलटू नये म्हणून घरातून निघून जाण्याचं नाटक करत थेट स्मशानात पोचतात. इथे त्यांना भेटतो तो खराखुरा भूत. हे भुतंही मोठं वात्रट. त्याला चौथ्या सोमवारी मुक्ती मिळणार असते, पण ती मिळण्यापूर्वी त्याला त्याच्या काही इच्छा पूर्ण करायच्या असतात. त्या बदल्यात तो तात्यांच्याही काही इच्छा पूर्ण करण्याची हमी देतो. खात्री पटल्यावर तात्या या भुताला घरी घेऊन येतात. मग जी काही धमाल उडते ते 'भूत झोंबलं तात्याला' हे नाटक आहे.  

Drama
'भूत झोंबलं तात्याला' नाटकातील एक प्रसंग.











नाविन्यपूर्ण स्वगततंत्र, प्रासंगिक अभिनयसंपन्न विनोदाची पेरणी, अचूक टायमिंग यातून हे नाटक लीलया पेललं गेलं.
मुख्य सुत्रधार म्हणून तात्यांची भूमिका करताना अशोक आष्टीकर यांनी हे नाटक खिळवून ठेवले. नेमकी संवादफेक, त्यातील अचूक टायमिंग, रंगमंचावरील त्यांचा सहज-मुक्तवावर, क्रियेवर दिलेली प्रतिक्रिया यामुळे सादरीकरणाचा पाया भक्कमपणे रचला गेला. तात्याच्या बायकोचे पात्र डॉ. ललिता घोडे यांनी समर्थपणे उभे केले.  विनोदनिर्मिती पात्राच्या खांद्यावर नसून कथानकातील प्रसंग त्याचे साध्य आहे हे भान त्यांच्या अभिनयातून दिसून आले. अन्यथा विनोदनिर्मिती करण्याच्या नादात त्याचा अतिरेक होण्याची भीती अधिक होती. या दोघांची केमिस्ट्री  'घरोघरी मातीच्या चुली' म्हणण्यात्पत आश्वासक अशी होती. विठोबाच्या भूमिकेत अमित राऊत यांनी रंगत आणली. आवाजाचा योग्य चढोतार, प्रेक्षकाभिमुख नियंत्रित देहबोली यातून परिणाम साधला गेला. बाबीच्या भूमिकेत सचिन वानखेडे यांनी भर घातली. रगेल आणि माजोर्डा दादा त्यांनी आश्वासकरित्या साकारला. त्यात अचानक संचारलेल्या बायकी रसाचा आविष्कार म्हणजे मजेशीर धक्का होता. त्यांनी आवाजाचा बेस आणखी वाढवला असता तर दोन विरोधाभासी व्यक्तिमत्वाची फोडणी अधिक सुरेख झाली असती. सूनबाईच्या छोट्याशा भूमिकेत साक्षी पंडिले यांनी छाप सोडली. मात्र प्रभावी सादरीकरणाचा कळस गाठला तो भुताची भूमिका करणाऱ्या लखन सोनूले यांनी. या पात्राची चालढाल, नजर, देहबोली सर्वकाही त्यांनी सुरेख उतरवलं. आवाजाची पट्टी, त्यातील पॉजेस, टायमिंग ही देखील त्यांनी शेवटपर्यंत समर्थपणे राखली. मुळात हे पात्र भूत असल्याने ते 'extra human' वाटणे अगत्याचे आहे. त्याच्या देहबोलीपासून तर चेहऱ्याच्या हावभावापर्यंत ते वेगळं दिसणं अपेक्षित आहे. यासाठी नियंत्रित पण कमालीची ऊर्जा लागते. या अपेक्षेला लखन सोनूले यांनी यथोचित न्याय दिला, अगदी पहिल्या प्रसंगापासून तर अंतिम प्रसंगापर्यंत. या व्यतिरिक्त अन्य कोणी फारसा प्रभाव टाकू शकले नाही. रंगमंचावरील काहींचा वावर हा केवळ औपचारिकता म्हणून वाटला, त्यातून परीणाम साधला गेला नाही.



मुळात हे नाटक सिच्युएशनल कॉमेडी (प्रासंगिक विनोद) आणि त्यावर मॅड कॉमेडीची फोडणी असं आहे. प्रासंगिक विनोदात वास्तविकतेची झालर असते मात्र मॅड कॉमेडीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नसतो. त्यातून निव्वळ विनोदनिर्मिती व्हावी हाच शुद्ध हेतू असतो, यासाठी प्रचंड ऊर्जा लागते, देहभान विसरावे लागते. सादरीकरणात प्रासंगिक विनोद निर्मिती झाली मात्र मॅड कॉमेडीकडे अजिबात दुर्लक्ष झाले, यात अवघडलेपण दिसून आले. पहिल्या प्रसंगात सूनबाईची ओळख, भूत झोंबणारा भटजी, अधेमध्ये वळवळणारा सरमळकर यात रंगत निर्माण होणारा विनोद सहजपणे हुकला. 

तात्याच्या घराची संरचना नेपथ्यातुन सुव्यस्थित साकारली गेली. प्रॉपर्टीचा काटेकोरपणे वापर करण्यात आला. कांस्यमूर्तीची तलवार नेमकेपणाने निर्माण केली गेली. स्मशानभूमीचा प्रसंग, सोसाट्याचा वारा, हलणारी झाडं हा प्रसंग देखील थोडक्या प्रॉपर्टीमधून परिणामकारक वाटला. घरी लावण्यात आलेला फोटो नेमका दिसून पडत नव्हता. रंगमंचावर पात्रांचा वावर चप्पल-जोडे घालून असतानाही त्याचा आवाज होऊन सादरीकरणात व्यत्यय निर्माण न होण्याची पुरेपूर काळजी घेण्यात आली. छोट्याशी वाटणारी प्रॉपर्टी मोजा आणि रूमालाचा नाट्यनिर्मितीसाठी किती सुरेख वापर होऊ शकतो हे देखील या संहितेचे दखलपात्र वैशिष्ट्य. 

विनोदी नाटक आणि पार्श्वसंगीत यांचा अजोड संबंध असतो. नाटकात निव्वळ संगीताने हशा निर्माण करता येतो इतकं त्याचं सामर्थ्य आहे. मात्र, रंगत आणणाऱ्या संगीताची निवड आणि अचूक टायमिंग असूनही सादरीकरण तितके प्रभावी होऊ शकले नाही. यात संगीताची clarity आणि त्याचे योग्य नियंत्रण हा मोठा अडथळा वाटला. Dolby vision तंत्रज्ञानाच्या जमान्यात वापरणारे संगीत हे किमान 320 kbps इतके असावे, यात clarity अधिक सुस्पष्ट असते. संवाद नसताना त्याची लाऊडनेस वाढवता आली असती. कथानक आणि प्रकाशयोजनेची नाटकात जुगलबंदी आहे. त्यामुळे म्हणेल तेव्हा म्हणेल तो इफेक्ट येणे आवश्यक होते. हे आव्हान अभिषेक श्रीकुंडावार यांनी समर्थपणे पेलले. स्वच्छ प्रकाशयोजनेमुळे घराला अधिक जिवंतपणा आला. खिडकीवर दिलेला स्पॉट, पहिल्या अंकाचा शेवट, स्मशानभूमीच्या प्रसंगातही परीणामकारकता जाणवली. 
पांढऱ्या पडद्याच्या प्रसंगात पात्रांची सुस्पष्टता कमी वाटत होती. सुती कपडा नसल्याने पात्राच्या मागून प्रकाश अधिक परावर्तित होत होता.  रंगभूषा-वेशभूषादेखील दखलपात्र होती. विशेषतः काकू, बाबी आणि भुताच्या पात्रांवर केलेली मेहनत दिसून आली. रंगमंचाच्या बाहेर साकारलेला प्रसंग सादरीकरणाचा सर्वोच्च बिंदू होता. 

"दिन ढळला तो ढळला, श्रीला शिरा तात्याला तांदूळ, भूतांचे काम इकडे तिकडे करण्याचे, देवाचे काम निर्मिती करण्याचे, गडे नको म्हणू मला तांदळाचे खडे आठवतात,  जो एकदा बुवा तो जन्मभर बुवा, मला रंगमंचाच्या मर्यादा आहेत" असे अनेक संवाद हे दखलपात्र ठरले.

उत्तम सादरीकरण झाले मात्र काही ठिकाणी विनोदाची टायमिंग चुकली, काही ठिकाणी ती प्रसंगावधान राखून सावरल्या गेली. अशोक आष्टीकर यांनी तात्यांची भूमिका करताना सहज, संपन्न आणि समृद्ध अभिनय करत अनेक क्षण चोरून नेले. पण,
तात्यांचे स्वगत बऱ्याच लांब पल्ल्याचे आहे. प्रत्येक स्वगतातुन निर्माण होणारा एक मूळ भाव, त्यात अनेक उपभावांची विभागणी, वाक्यांनुसार त्याचा वियोग आणि त्यातील स्वल्पविराम, पूर्णविराम अशी त्याची सूक्ष्म रचना आहे. आणि याचा पहिल्या वाक्यापासूनचा प्रवास सूक्ष्मभाव निर्माण करत करत अंतिम वाक्यापर्यंत त्याची विराटभावस्वरूप निघावे असे आहे. जसे पावसाचे पाणी हळूहळू आपसात मिसळत विराट रूप घेते तसे. शिवाय ही प्रक्रिया खूप पटापट आहे. अनेक प्रसंगांत हा एकात्मक परिणाम साधला गेला नाही, असे जाणवले. 


-अमित शंकर वेल्हेकर

नाटक : भूत झोंबलं तात्याला
लेखक : डॉ. ललिता घोडे
दिग्दर्शक : अशोक आष्टीकर
नेपथ्य : प्रशिक डोंगरदिवे, कृष्णा रोकडे
प्रकाश योजना : अभिषेक श्रीकुंडावार, अशोक कार्लेकर
पार्श्वसंगीत : उत्पल टोंगो
रंगभूषा-वेशभूषा : स्नेहा टोम्पे, आशिष मदनकर, अनिता टेंभुर्णे
भूमिका : डॉ. ललिता घोडे, अमित राऊत, लखन सोनूले, नंदकिशोर मोहोड, साक्षी पंडिले, विपीन डोमाळे, सचिन वानखेडे, मनोज खंदाडे, प्रणव काटपेलवार, अजय सुभेदार, सिद्धार्थ जयस्वाल, दिव्या टेंभुर्णे, अशोक आष्टीकर आणि इतर.

Post a Comment

0 Comments