64 वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा, चंद्रपूर केंद्र; नाट्य समीक्षण : 'कर्नल सरंजामे आणि ती'

 नाट्य समीक्षण : 'कर्नल सरंजामे आणि ती'


(चंद्रपूर केंद्रावर पार पडलेल्या सर्व नाटकांचे समीक्षण वाचण्यासाठी वरील home बटनवर क्लिक करा) 

Drama



नाटकाची संहिता आणि त्याचे सादरीकरण याचा फारसा असा काही संबंध नाही. सादरीकरण असे असावे की प्रेक्षकांना बघताना कथानकाचा विसर पडावा आणि संहिता अशी घट्ट असावी की सादरीकरणासाठी काही 'जागा' उरुच नये. या दोन्ही गोष्टींचा सुरेख संगम 'कर्नल सरंजामे आणि ती' नाटकाच्या सादरीकरणात बघायला मिळाला. नाट्याच्या चौकटीत कसलेली संहिता आणि सादर करताना त्यावर कलात्मक स्वातंत्र्याचे केलेले संस्कार यामुळे एक सशक्त आणि परीणामकारक नाट्य समर्थपणे उभे राहिले. पात्रांची अचूक निवड, त्यांचा कसलेला अभिनय, नेपथ्य-प्रकाशयोजनेची सांगड घालत उभे केलेले प्रसंग, नाटकातील प्रत्येक नाट्याला टिपणारी, खुलवणारी परीणामकारक प्रकाशयोजना, मर्यादित साहित्याचा वापर करून उभे केलेले प्रतिकात्मक नेपथ्य, कथेतील भावाला  एकसंध करणारे सुस्पष्ट पार्श्वसंगीत, वैविध्यपूर्ण रंगछटा उधाळणारी आकर्षक रंगभूषा-वेशभूषा अशा प्रत्येक अंगातुन दखलपात्र अशी छाप सोडली गेली. 


कर्नल सरंजामे हे सेवानिवृत्त सैनिक. देशसेवेसाठी भावी संसाराचा त्याग करणारे अविवाहित असामी. तारुण्यात मालतीशी त्यांचं प्रेम जडतं, दोघेही एकमेकांवर प्रेम करतात. मात्र, केवळ देशसेवा करण्यासाठी ते प्रेमाचा त्याग करतात. आपल्या प्रशस्त बंगल्यात निवांतपणे एकटेच आयुष्य जगत असतात. त्यांच्या शेजारी राहणारी आणि समवयस्क असणारी 'मेरी' हिच्यावर त्यांचा जीव जडतो. त्यांना हार्टअटॅक आल्यावर आपल्यावर शुश्रूषा करणारी मेरी ही त्यांची आस्थेने काळजी घेत असते. पती गेल्यावर आणि एकुलत्या एक मुलीचे लग्न झाल्यावर देखील ती एकटी रुग्णालयात काम करत असते. तिच्या मनात देखील कर्नलबाबत एक 'सॉफ्टकॉर्नर' असतो. अशातच पोलीस अधिकारी दिपेंद्रची एन्ट्री होते. त्याची नुकतीच पोस्टिंग इथे झालेली असते. 
दिपेंद्रचे वडील कर्नलचे सहकारी आणि चांगले मित्र असतात. मात्र, एका महिलेचे रक्षण करताना चुकीच्या पद्धतीने त्यांचे कोर्टमार्शल होते आणि हा खोटा आरोप सहन न झाल्याने तुरुंगातंच ते आत्महत्या करतात. अन्याय करणाऱ्या प्रवृत्तीची कर्नलला मनस्वी चीड, अशा प्रवृत्तीला ठेचून काढावं हाच त्यांच्यानुसार एकमेव पर्याय. त्यामुळे दीपेंद्रच्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घ्यावा अशी धगही त्यांच्या मनात कायम असते. ती दिपेंद्रसमोर बोलूनही दाखवतात. मात्र, 'झालं गेलं विसरून जा' अशी भूमिका त्याची असते. शिवाय तुम्ही एकटे असतात त्यामुळे तुमच्या काळजीसाठी एखादा 'पेईंगगेस्ट' घरात ठेवा असा प्रेमळ सल्लाही तो देतो. त्यानुसार 'लिना' त्यांच्या घरी राहायला येते. अनेकांना नकार दिल्यावर लिना या तरुणीला बघताच क्षणी ते होकार देतात. लीनादेखील त्यांचा भरपूर सांभाळ करते, त्यांनाही तिचा लळा लागतो. लीना आणि दिपेंद्र एकमेकांच्या प्रेमात पडतात. पण लिनाच्या मनात काही वेगळाच प्लान सुरू असतो. कर्नल गेल्यावर सर्व संपत्ती आपल्यालाच मिळणार यासाठी ती अनेक डाव रचले. पुढे लिनावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिच्या सहकाऱ्याला कर्नल गोळ्या घालून ठार करतात आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू होतो. लीना आपल्या प्लानमध्ये यशस्वी होते का, लिना आणि कर्नल सरंजामे यांचा काय संबंध आहे. याची उकल म्हणजे 'कर्नल सरंजामे आणि ती' हे नाटक आहे. 

Drama
'कर्नल सरंजामे आणि ती' नाटकातील एक प्रसंग.






नाटकाची संहिता ही सादरीकरणासाठी आव्हानात्मक अशी आहे. कथानक इस्टेब्लिश झाल्यावरही ती प्रसंग, संवादांचे आडवळणे घेत संथगतीने प्रवास करते. एखाद्या सस्पेन्स वाटणाऱ्या कथानकासारखी त्याला शिफ्टिंग नाही. अशावेळी सादरीकरणात खिळवून ठेवणारे नाट्य टिकवून ठेवणे हे मोठे आव्हान होते. यात स्पर्धक यशस्वी झाले. यात सादरीकरणाच्या सर्वांगांचा कुशलतेने वापर करण्यात आला. 

कलवंतांचा कसदार अभिनय ही या नाटकाची जमेची बाजू. गौरव पराते यांनी एक आश्वासक पोलीस अधिकारी उभा केला. रंगमंचावर मर्यादित हालचाली करूनही ही परीणामकारकता साधली गेली. कर्नलच्या भूमिकेला डॉ. प्रजेश घडसे यांनी न्याय दिला. जरबी आवाज, संवादाचा योग्य चढोतार, भूमिकेनुरूप देहबोली त्यामुळे हे नाट्यभावाचा पाया मजबूत झाला. परिचारिका मेरी हिच्या भूमिकेत प्रणिता चव्हाण यांनी छाप सोडली. प्रेमळ, गोंडस आणि जबाबदार वयस्क स्त्री त्यांनी उत्तमरित्या प्रस्तुत केली. मात्र, सुमेधा श्रीरामे यांच्या सशक्त अभिनयाने सादरीकरणाला एका उंचीवर नेऊन ठेवले. दोन व्यक्तिरेखा, त्यातील द्वंद्वात्मक आभासी पात्र, स्वभावाचे परस्परविरोधी दोन टोक याचे संतुलन त्यांनी अभिनयकौशल्याने सुरेखपणे मांडले. बरेचदा दोन परस्परविरोधी व्यक्तिरेखा स्विकारताना कलावंतांकडून त्याला अतिरंजितपणे वठवण्याचा प्रयत्न होतो.  त्यातून 'ह्युमनिस्टिक अप्रोच' कमी होतो आणि अनावश्यकरित्या पात्र अधिक नाटकीय होत जाते. लिना हे देखील असेच पात्र आहे. पण सुमेधा यांनी ही जबाबदारी परिपक्वतेने सांभाळली. प्रत्येक पात्राचे आणि नाट्यभावाचे सहजपणे स्थित्यंतर करताना वेगळा 'टोन' आणि देहबोली देऊन त्यातील फरक त्यांनी स्पष्टपणे अधोरेखित केला. तीन आभासी व्यक्तिरेखांवर एक अलगद कटाक्ष टाकलेला संवाद आणि खाताना तिखट लागण्याची संपूर्ण प्रक्रिया ही त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाची पोचपावती होती. 

 कलातंत्राचा सुनियोजित आणि परिणामकारक वापर हे प्रकाशयोजनेचे वैशिष्ट्य ठरले. दोन्ही विंगेतून दिलेले स्पॉट, फ्लॅशबॅकच्या प्रसंगात दिलेला प्रकाश, लिनाचे खरे व्यक्तिमत्त्व उलगडणारा प्रसंग यातून हे कौशल्य दिसून आले. "मोह मोह के धागे" या गाण्याच्या थीमचा वेगवेगळ्या प्रसंगात केलेला वापर, बुलेट गाडीचा आवाज, नाट्यभावानुसार निवडलेले 'ट्रॅक्स' यातून पार्श्वसंगीताचे महत्व अधोरेखित झाले. रंगभूषा-वेशभूषा हे देखील आश्वासक अशी होती.  ग्रंथालय आणि मॉर्निंगवॉकच्या प्रसंगात लावलेला फ्लेक्स हाय डेफिनेशन असल्याने या प्रसंगात जिवंतपणा आला.


फ्लॅशबॅकच्या प्रसंगात बळवंत आणि मालतीची वेशभूषा ही 70-80 च्या काळातील आहे, ती आश्वासक अशी होती. मात्र बळवंतने खाली जीन्स आणि 'जॉगर शु' घातला होता. त्यातही ब्लॅक शुवर व्हाइट सोल होतं. त्याकाळी अशी फॅशनंच नव्हती. 'बेलबॉटम' त्या काळचा प्रचलित प्रकार दाखवता आला असता. फॉर्मल लेदर शु हा मागील 100 वर्षांचा कुठलाही काळ दाखविण्यासाठी अनुरुप असतो. चित्रपटात वेगवेगळ्या फ्रेममधून काळ उभा करता येतो पण नाटकात असं होऊ शकत नाही त्यामुळे हा फरक हा अधिक ठळक आणि स्पष्ट दाखवणे आवश्यक असते. दिपेंद्रच्या पोलिसी वेशभूषेत केवळ हालचाल बरोबर व्हावी म्हणून  'सर्व्हिस गन' कंबरेच्या मागे लावली, जेव्हा की ती समोर असते. सैन्यातील अधिकारी हे शिष्टाचाराबाबत (etiquettes)
 निग्रही असतात, त्यांच्या सेवेचा हा एक भाग असतो. कोट घातल्यावर बसताना नेहमी त्याचे बटन उघडे करून बसले जाते. मात्र कर्नलच्या भूमिकेत हे भान गांभीर्यपूर्वक राखले गेले नाही. ही बाब खटकनारी वाटली. अनेक वरिष्ठ अधिकारी निवृत्त झाल्यावरदेखील गळ्यात सैनिकी स्कार्फ लावतात. तो लावला असता तर पात्र अधिक आश्वासक वाटले असते. कर्नल दिपेंद्रच्या वडीलाबाबत सांगतानाच्या प्रसंगात दिपेंद्र हा 'फ्रीज' होतो जेव्हा की मुबलक जागा आणि प्रकाश असताना त्याची अस्वस्थता हालचालीच्या माध्यमातून दाखविण्याची संधी होती. दिपेंद्रच्या प्रवेशप्रसंगी दार उघडून नाट्यभाव निर्माण करण्यात दिरंगाई झाली, टायमिंग चुकली. 

पोलिसी पिळदार शरीरयष्टी वाटावी यासाठी गौरव पराते यांनी वेशभूषेखाली आणखी एक कापड घातले. पोलिसी वेषात ते योग्य वाटले, मात्र साध्या शर्टवर ही असहजता दिसून आली. आपल्यापेक्षा मोठ्या साईजचा शर्ट आणि हाताच्या कोपऱ्यापासून बारीक हात यातून हा फरक स्पष्ट जाणवत होता, शिवाय यामुळे देहबोली आणि विशेषतः मानेची हालचाल अधिक मर्यादित राहिली. आत विंटरवेअरचा किंवा थेट स्वेटशर्टचा अन्यथा लेदर जॅकेटचा वापर करूनही ही बाधा मिटवता आली असती. हा प्रयोग मॉर्निंगवॉकच्या प्रसंगातही लिना पात्रासाठी केला गेला मात्र त्यात हा फरक जाणवला नाही. सकाळच्या व्यायामप्रसंगी प्रकाश आल्यावर पात्राची हालचाल दाखवली जाते ती आधीच सुरू व्हायला हवी होती. लीप सिंक करून 'मोह मोह के धागे' गाण्याचा प्रसंग रंगवला गेला. त्यांचा ट्रान्स यात दाखवला गेलाय, तो परिणामकारकही आहे. पण कमीअधिक बदल करून तो लीप सिंक न करता देखील दाखवता आला असता. ते अधिक संयुक्तिक वाटले असते. लिनाच्या सहकाऱ्याचा खून केल्यावरच्या प्रसंगात 'माझ्याच घरी येऊन' या संवादात चुकामुक होऊन पुनरावृत्ती झाली. 

नाटकाच्या संहितेतील प्रसंगांत अनेक भावनांचा 'मूड स्विंग' आहे. कधी गंभीर झालेला प्रसंग अचानक विनोदी होतो, यातून अनेकदा भावात्मक साशंकता निर्माण होते. कर्नलच्या मृत्यूचा प्रसंग हा खटकणारा वाटला. सीपीआर देताना मेरी कर्नलच्या ओठांना स्पर्श करते चुंबन आणि हास्यास्पद वाटावा या प्रमाणे कर्नल उठतात आणि पुन्हा मृत पावतात. यातून त्यातील गंभीरतेचा भाव निघून गेला. मेरीने चुंबन घेतले म्हणजे कर्नलची शेवटची ईच्छा आपोआप पूर्ण झाली, हे समजण्याची जबाबदारी सुजाण प्रेक्षकांना दिली जायला हवी होती. त्यात अशी विनोदनिर्मिती करण्याची आवश्यकता नव्हती. यामुळे शेवटच्या प्रसंगाची इंटेनसिटी त्या ताकदीने उभी राहण्यास मोठा अडथळा निर्माण झाला. कारण या प्रसंगानंतर थेट शेवटचा निर्णायक गंभीर प्रसंग आहे.


-अमित शंकर वेल्हेकर

नाटक : कर्नल सरंजामे आणि ती
लेखक : सुनील देशपांडे
दिग्दर्शक : संजय रामटेके
नेपथ्य : संकेत पगारे
प्रकाश योजना : शिवशंकर माळोदे
पार्श्वसंगीत : आलेख कोटरंगे
रंगभूषा-वेशभूषा : स्वाती चौधरी, श्रीहरी दुर्गे, देवानंद साखरकर, राममिलन सोनकर
भूमिका : डॉ. प्रजेश घडसे, सुमेधा श्रीरामे, गौरव पराते, प्रणिता चव्हाण, योगेश भलमे, आदर्श मास्टे, दीपरत्न मडावी, सलोनी डाखरे, साक्षी गुरनुले आणि संजय रामटेके.

Post a Comment

0 Comments