आम्ही गप्प...; चंद्रपूर शहरातील सर्व टायमर बंद; वाहतूक पोलिसांनी चंद्रपूर शहर धरले वेठीस,... तरीही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी गप्प

 चंद्रपूर : लोकांनी लोकांसाठी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जेव्हा फक्त आपली चमकोगिरी आणि राजकारण करण्यात व्यस्त असतात त्यावेळी काय अनागोंदी माजते याचा आदर्श नमुना चंद्रपुरात बघायला मिळत आहे. वाहतूक पोलिसांनी जनतेला गृहीत धरून शहरातील सिग्नलवर असलेले सर्व टायमर बंद करून टाकले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहे, लोकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. अपघातात वाढ झाली आहे. यातून वाहतूक पोलीस प्रशासनाने संपूर्ण शहर वेठीस धरले आहे. मात्र, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जनतेच्या या समस्येकडे सपशेल पाठ फिरवली आहे. जिल्ह्यातील पालकमंत्री, खासदार, आमदार, आजी-माजी मंत्री यापैकी एकानेही या गंभीर प्रकाराची अद्याप दखल घेतलेली नाही. लोकप्रतिनिधी आपली राजकीय पोळी आणि प्रतिमासंवर्धन करण्यात 'मस्त' आहेत आणि त्यांच्या निष्क्रियतेच्या जोरावर वाहतुक पोलीस चंद्रपूर शहरात आपला कारभार चालवत आहे. 

Chandrapur traffic



वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी ही चंद्रपूर महानगरपालिका आणि वाहतुक पोलीस विभागाकडे आहे. सिग्नल संचालित करण्याची जबाबदारी मनपाकडे तर वाहतूक व्यवस्था नियंत्रित करण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांची असते. शहरातील सिग्नलचे तीनतेरा वाजले आहेत, अनेक सिग्नलमध्ये बिघाड आलेले आहेत, मात्र 'प्रशासक' राज असलेल्या मनपाकडे ते दुरुस्ती करण्यास वेळ नाही. तर दुसरीकडे वाहतूक सुकर करणारे सर्व टायमर वाहतूक पोलिसांनी बंद करून टाकले. मात्र या अनागोंदी कारभाराबाबत जाब विचारण्याचा वेळ जिल्ह्यातील एकाही लोकप्रतीधींकडे नाही. याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी safarnamaFM ने कुठल्याही लोकप्रतिनिधीशी कुठलाही संपर्क करण्याचा प्रयत्न केला नाही. कारण ही समस्या safarnamaFM ची नाही, कुठल्या प्रशासनाविरोधात पूर्वग्रहदूषित दृष्टीकोनातून निर्माण केलेली नाही. ही समस्या जनतेची आहे. जर जनतेची समस्या जबाबदार लोकप्रतिनिधींना दिसत नसेल तर तो त्यांचा दोष आहे. 

राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. त्यांची ओळख जिल्ह्यात 'हंगामी पालकमंत्री' अशी आहे. निवडक प्रशासकीय बैठका आणि राजकीय कार्यक्रम याच्यातच त्यांचा दौरा आटोपतो. ते गेल्यानंतर चंद्रपूर जिल्हा अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात 'रामभरोसे' असतो. ते पालकमंत्री झाल्याने चंद्रपूर जिल्ह्याचा नेमका कुठला विकास झाला याचा शोध चंद्रपूर जिल्ह्याची जनता अद्याप घेत आहे. विदर्भातील एकमेव महिला खासदार प्रतिभा धानोरकर यांचं मूळ गाव वरोरा. त्यांचा देखील चंद्रपुरात दौराच असतो. अन्यदिनी हा कारभार त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी बघतात. रस्त्याच्या उद्घाटनाप्रसंगी प्रोटोकॉल पाळला नाही म्हणून प्रभारी मनपा आयुक्तांच्या कार्यालयात जाब विचारायला त्या आवर्जून गेल्या. त्यांच्या एका इशाऱ्याने रस्त्याची डागडुजी करण्यास मनपा प्रशासन कामाला लागल्याची प्रसिद्धी करण्यात आली. मात्र, संपूर्ण शहराची वाहतूक व्यवस्था टायमरविरहित करण्यात आली ही समस्या अद्याप त्यांच्यापर्यंत पोचलेली नाही. (कुणाचा?) सांस्कृतिक आणि राजकीय 'कार्यक्रम' कसा करायचा यात पारंगतता प्राप्त केलेले चंद्रपुरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी आपला मतदारसंघाच्या अनेक जबाबदाऱ्या स्वतःहून हाती घेतलेल्या आहेत. बहुतेकवेळा चंद्रपुरात असणारे ते एकमेव लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्या गाड्यांचा ताफा शहरातुन इकडेतिकडे जाताना सामान्य चंद्रपूरकर नियमित बघतो. मात्र, शहरात सिग्नलवरील सर्व टायमर बंद असल्याची बाब त्यांच्या अद्याप निदर्शनास आलेली नाही, हे विशेष. चंद्रपुरात इतिहास घडला आणि पहिल्यांदाच शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत आमदार सुधाकर अडबाले निवडून आले. शिक्षण खात्याशी संबंधित अनेक महत्वाच्या बाबींवर ते पाठपुरावा करत असतात. यातून अनेक मोठमोठे घोटाळे देखील समोर आलेत. विधानभवनात त्यांच्या आवाजाला एक विशेष महत्व आहे. मात्र त्यांनीही वाहतूक समस्या एक क्षुल्लक बाब म्हणून दुर्लक्ष केले असावे. राज्याचे माजी अर्थमंत्री, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि राज्यातील एक मातब्बर नेते म्हणून सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे बघितले जाते. सध्या ते बल्लारपूरचेच आमदार असले तरीही जिल्ह्याच्या अनेक समस्या ते पोटतिडकीने मांडतात. जिल्हा बँकेत घडलेला कथित भरती घोटाळ्याच्या चौकशीचा पाठपुरावा त्यांनीच केला. पुढे त्यातून फार काही पुढे आले नाही, ही बाब वेगळी. मात्र आज चंद्रपूर जिल्ह्यात जी काही विकासाची मोठी कामे झाली आहेत, ती त्यांच्यामुळेच. अशा संवेदनशील समजल्या जाणाऱ्या नेत्यालाही शहरातील वाहतूक दुर्वव्यवस्थेची आणि त्याच्या दाहकतेची जाणीव अद्याप झालेली नाही. संवैधानिक पद नसले तरी आमदार विजय वडेट्टीवार यांना राज्याचे विरोधीपक्षनेते समजले जाते. त्यांनी देखील चंद्रपूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची धुरा सांभाळलेली आहे. पालकमंत्री असताना त्यांचा चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा 'नागपूर निवासस्थानावरून आगमन, ब्रम्हपुरी येथे विविध कार्यक्रमांना उपस्थिती, गडचिरोली येथे मुक्काम आणि पून्हा नागपूरकडे प्रयाण' असा तीन टप्प्यांचा असायचा. मंत्री असल्याने  केवळ 'आपत्ती आणि व्यवस्थापन' यासाठी ते चंद्रपुरात यायचे. आजही त्यांचा पसंतीचा राजकीय केंद्रबिंदू ही तीनच ठिकाणे आहेत. त्यामुळे त्यांच्यासारख्या राज्यस्तरीय नेत्याला चंद्रपूर सारख्या किरकोळ शहरातील किरकोळ वाहतूक व्यवस्थेकडे लक्ष देण्यास वेळ नसावा. 

शेवटचे व्यक्तीमत्व हे सध्या औपचारिक नसले तरी लोकप्रतिनिधी आहेत. लोकप्रतिनिधी म्हणण्यापेक्षा त्यांना जनसेवक म्हटल्यास अधिक संयुक्तिक ठरेल. ते म्हणजे जनविकास सेनेने संस्थापक आणि माजी नगरसेवक पप्पू देशमुख. आपल्या प्रभागाव्यतिरिक्त संपुर्ण शहराची नैतिक जबाबदारी त्यांनीच आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. त्यांचा हा आवाका महापौरपदापेक्षा फक्त एक प्रभाग कमी आहे. आयुक्त, जिल्हाधिकारी, उत्पादन शुल्क विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग अशा सर्वांना ते धारेवर धरतात. त्यांनी घेतलेल्या मुद्द्यांवरून नवनवीन पध्दतीने आंदोलने करण्याची बाब आता चंद्रपुरकरांसाठी अजिबात नवीन राहिलेली नाही. काही महिन्यांपूर्वी घडणाऱ्या जीवघेण्या अपघातांमुळं बापट नगर चौकात सिग्नल बसविण्यात यावा अशी जोरदार मागणी त्यांनी रेटून धरली होती. अखेर तिथे सिग्नल बसवण्यात आला. यानंतर संपूर्ण शहरातील सिग्नलवरचे टायमर बंद करण्यात आले. मात्र त्यांच्याकडे सध्या अमाप मुद्दे आणि नगरसेवक म्हणून पुन्हा निवडून येण्याचे आव्हान असल्याने कदाचित या किरकोळ बाबीकडे त्यांचे दुर्लक्ष झाले असावे.

सध्या विधानसभा आणि लोकसभा दोन्ही सभागृहाचे सत्र सुरू आहे. सर्व लोकप्रतिनिधी सध्या नागपूर-दिल्ली येथे आहेत. प्रशासनात बसलेले सर्व उच्च अधिकारी एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत. पण एकूणच हे सर्व लोकप्रतिनिधी जनतेच्या प्रश्नांबाबत किती सजग आहेत याची प्रचिती सामान्य नागरिकांना येत आहे. पुढे खरंच ते या समस्येची दखल घेतात की 'एवढेच कामे आहेत का' असं म्हणत दुर्लक्ष करतात हे बघणे उत्सुक्याचे ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments