64 वी राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा, चंद्रपूर केंद्र; नाट्य समीक्षण : 'फेस टू फेस'

 नाट्य समीक्षण : 'फेस टू फेस'


(या स्पर्धेत सादरीकरण झालेल्या सर्व नाटकांचे समीक्षण वाचण्यासाठी वरील home बटनवर क्लिक करा)
Face to face


येश नेहमीप्रमाणे ठरलेल्या रेस्टॉरंटमध्ये पोलीस अधिकारी असलेली प्रेयसी जुईला भेटायला जातो. मात्र, तिथे पोचून त्याला मोठ्ठा धक्का बसतो. जुई त्याला ओळखण्यास नकार देते. आवाज तोच मात्र चेहरा पूर्णपणे बदललेला त्यामुळे जुईसाठी देखील हा एक आघातंच असतो. हॉटेलचा वेटर देखील त्याला ओळखण्यास नकार देतो. जयेशला यातील काहीच समजत नाही. अशा द्विधा मनस्थितीत तो जुईचे घर गाठतो आणि आपला चेहरा हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोस्ट वॉन्टेड जब्बार सारखा दिसत असल्याची धक्कादायक कबुली देतो. इकडे जब्बार हा भारतात आल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळते. त्याला पकडण्यासाठी देशातील सर्व सुरक्षा यंत्रणा कामाला लागतात. चार महिन्यांपासून जयेश बेपत्ता होता, पोलिसांना त्याचा कुठलाच थांगपत्ता लागलेला नाही. अशातच अचानक जयेशचं येणं आणि तो पूर्णतः जब्बारसारखा दिसणं यामुळे हे कोडं आणखी गहन होत जातं. जुई याबाबतची माहिती सहकारी पोलीस अधीक्षक पाटील यांना सांगते. पोलिसांना हा जब्बारचं असल्याची खात्री वाटते मात्र जुईला तो जब्बार नसून जयेशंच आहे याची मनोमन खात्री वाटत असते. पुढे नेमकं काय होतं, तो जयेश असतो की जब्बार, यामागे नेमकी कुणाची प्लॅनिंग असते, पोलीस याचा छडा लावतात का आणि खऱ्या गुन्हेगाराला त्याची शिक्षा मिळते का या सर्व प्रश्नांचा उलगडा 'फेस टू फेस' नाटकातून होतो.

'फेस टू फेस' या नाटकातील एक प्रसंग.





या नाटकाच्या सादरीकरणातुन कथेचे गूढ आणि थरार टिकवून ठेवण्यात यश आले. उत्कंठावर्धक कथानक, त्यातील रंजक प्रसंग, प्रभावी अभिनय, सुव्यस्थित नेपथ्य, प्रसंगानुरूप पार्श्वसंगीत हा या नाटकाच्या जमेच्या बाजू ठरल्या. 

ढोबळमानाने नाटकाची संहिता ही थरारक, तर्कशुद्ध आणि भावरससमृद्ध आहे. प्लास्टिक सर्जरी, फिंगरप्रिंट बदलवण्याचा कट, या शस्त्रक्रियेची शास्त्रीय गुंतागुंत, मोबाईल आणि लँडलाईनचा वापर, गुप्तचर यंत्रणेला दिलेला गुंगारा, जब्बारचा प्लान आणि कथानकातील एकूण नाट्य या गोष्टीं चपखलपणे संहितेत बसवण्यात आल्याय. मात्र त्याचे सूक्ष्म निरीक्षण केल्यास अनेक गोष्टींची त्यात कमतरता राहिली असल्याचे जाणवले. जर जयेश हा चार महिन्यांपासून बेपत्ता आहे, त्याला गुंगीचे औषध देऊन त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी केली गेलीय तर पहिल्या प्रसंगात त्याच्या वागण्यातुन आणि संवादातून ही अस्वस्थता का दिसून आली नाही? यासाठी त्याला जुई आणि वेटरच्या निर्णायक प्रसंगाची वाट का बघावी लागली?. ज्या ठिकाणी गुंगीचे औषध देऊन त्याचे अपहरण झाले त्याला चार महिन्यांनी त्याच ठिकाणी सोडण्यात येते मग तिथून रेस्टॉरंटचा गाठण्यापर्यंतच्या प्रवासात त्याला अनाकलनीय असं काहीच का वाटत नाही? तो थेट वेटरला भेटल्यावरंच का रिऍक्ट होतो? जर प्रेयसी मोठी पोलीस अधिकारी आहे तर त्याचा हुद्दा marketing executive इतका सामान्य का ठेवण्यात आला? या स्थितीला कुठला आधार नसेल तर निदान executive manager तरी करता आले असते. जर जयेश आपल्या प्रेयसीवर खरं प्रेम करतो तर तो तिला सांगून देखील पळून जाऊ शकला असता मात्र तो चक्क तिचे हातपाय बांधून पळून जातो. प्रेक्षकांना तो जब्बार वाटावा इथपर्यंत ठीक आहे मात्र यातून हे नाते किती स्वार्थी आणि अविश्वासू आहे याचा बोध अधिक होतो, तर दुसरीकडे एका प्रेमाचा विश्वास हाच या कथेचा मजबूत आधार आहे. आपल्या समोर वेटरचा खून झालेला बघताना याची माहिती मात्र पोलीस विभागात काम करणारी जुई देत नाही. आंतराष्ट्रीयस्तराचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी पोलिसांच्या तावडीतून पळून जातो आणि पोलीस अधीक्षक सहकाऱ्यांना त्याला पकडण्याचे निर्देश देऊन स्वतः जुईशी संवाद साधत असतो. एसपी पाटील हे जुईसोबत असल्यामुळे जयेशचे लोकेशन मिळते आणि तो पकडला जातो, तर त्यापूर्वी एका चाणाक्ष पोलीस अधिकाऱ्यांचे प्रसंगावधान म्हणून तो स्वतः तिथे उपस्थित राहण्याचा निर्णय घेतो याचे सूचक देखील देता आले असते. तसा ठळक संदर्भ न दिल्याने ही स्थिती योगायोगापर्यंत मर्यादित राहिली. 


सर्व कलावंतांनी आपापली भूमिका, जबाबदारीला  न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. ऋषिकेश निवल यांनी जयेश आणि जब्बार या दोघांच्या भूमिका आश्वासकरित्या साकारल्या. जयेशची धडपड, तगमग, त्याची अस्वस्थता आणि नैराश्य प्रभावीपणे उभे केले. तसेच जब्बार या आतंकवाद्याचे क्रौर्य, चातुर्य, आक्रमकता देखील त्यांनी सुरेख मांडली. मात्र, ज्या प्रेयसीच्या निर्व्याज प्रेमाच्या खात्रीने तो जयेश असल्याचा सिद्ध झाला, तिच्याबद्दल वाटणारे प्रेम, आस्था आणि करुणा हा भाव मात्र सादरीकरणात दिसून आला नाही. एक कर्तृत्ववान पोलीस अधिकारी, प्रेयसी आणि या दोन्ही भूमिकांची द्वंद्व असे जुईचे पात्र आहे. डॉ. प्रणाली वायकर यांनी हे पात्र वठवताना अनावश्यकरित्या भावनिक झाले. पात्राच्या संवादात आधीच भावना ओतप्रोत भरलेल्या आहेत, त्या प्रसंगानुरूप येणारच आहेत पण एक कणखर आणि चाणाक्ष पोलीस अधिकारी ही बाजू भावपूर्ण अभिनयाच्या ढगात लपली गेली. या पात्राचे हेच खरे आव्हान होते. सुरेश या वेटरची भूमिका करताना संवादातून भाषेची एकवाक्यता राखली गेली नाही. कधी ग्रामीण कधी प्रमाण अशा सळमिसळ यात झाली. शिवाय एक वेटरच्या पेहरावात फॉर्मल लेदरचा बूट दाखवला गेला ही बाब खटकणारी वाटली. जर वेशभूषेतुन एखादी पात्र उभे करायचे आहे तर ते आश्वासक असे उभे व्हायला हवे, त्यात विसंगती नको. यात डॉ. अनिरुद्धजीत नरखेडकर यांनी पोलीस अधीक्षक पाटीलच्या भूमिकेत उल्लेखनीय छाप सोडली. पोलिसी खाक्याला शोभेल अशी शरीरयष्टी, आश्वासक देहबोली, जरबी संवादफेक, आवाजातील चढउतार, इंग्रजी वाक्यांचा योग्य उच्चार हे अभिनय सादरीकरणाचे मुख्य केंद्रबिंदू ठरले. त्यातून प्रभावी सादरीकरण घट्ट बांधल्या गेले. 

नेपथ्य देखील सुसज्ज आणि कल्पक असे होते. एका बाजूला पोलीस कार्यालय, मध्ये जुईचं घर, दुसऱ्या बाजूला रेस्टॉरंट, न्यायालय, प्रसंगानुरूप बदलणारे नेपथ्य हे प्रभावी ठरले. न्यायधीशांचा बेंच दाखवताना तो आरोपीचा पिंजरा अधिक वाटत होता. जर आरोपीला पिंजरा नाही तर जजचा बेंच साधा लाकडी सुद्धा दाखवता आला असता. 

 प्रकाशयोजना आणखी प्रभावी करता आली असती. अनेक प्रसंगात पूरक प्रकाशाची कमतरता जाणवत होती, काही ठिकाणी नेमकी स्पॉटची जागा कलावंतांनी चुकवली. शेवटचा फाशीचा प्रसंग, त्यापूर्वीचा जब्बारचा प्रसंग हे इफेक्ट उत्तमरित्या सादर करण्यात आले. 

वेशभूषेकडे फारश्या बारकाईने लक्ष दिलं गेलं नाही. एखादं पात्र निव्वळ पेहरावावरून उभं राहावं इतका प्रभाव त्यात दिसून आला नाही. तीन स्टार असलेला पोलीस अधिकाऱ्याचा हुद्दा हा पोलीस अधीक्षक म्हणून नसतो, त्यावर एक स्टार आणि भारताची राजमुद्रा असते याचे भान राखायला हवे होते. यात मोबाईल नंबर सांगताना संपूर्ण दहा आकडी क्रमांक सांगण्यात आले. यात कुणाची प्रायव्हसी बाधित होऊ शकते त्या ऐवजी 9 किंवा 11 अंक सांगता आले असते. चित्रपटातही ही क्रिया टाळली जाते. 


-अमित शंकर वेल्हेकर

नाटक : फेस टू फेस
लेखक : सुहास देशपांडे
दिग्दर्शक : ऋषिकेश निवल
नेपथ्य : मुन्ना गहरवाल, विनायक नवल
प्रकाश योजना : भिवशंकर माळोदे
पार्श्वसंगीत : संदीप देशपांडे
रंगभूषा-वेशभूषा : सतीश देवरे, अश्विनी निवल
भूमिका : ऋषिकेश निवल, डॉ. प्रणाली वायकर, डॉ. अनिरुद्धजीत नरखेडकर, आशिष शेळके आणि इतर.

Post a Comment

0 Comments