(चंद्रपूर केंद्रावर पार पडलेल्या सर्व नाटकांचे समीक्षण वाचण्यासाठी वरील home बटनवर क्लिक करा)
चंद्रपूर केंद्रावरील 64 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचा अखेरचा प्रयोग पार पडला. थोर क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनसंघर्षावर प्रकाश टाकणारे 'वीर बिरसा मुंडा' हे नाटक सादर झाले. झाडीपट्टी नाट्यकृतीचा बाझ घेऊन नाटकाचे सादरीकरण करण्यात आले.
इतिहासाने या देशातील काही महापुरुषांवर फार मोठा अन्याय केला. त्यातीलच एक नाव म्हणजे थोर क्रांतिकारक वीर बिरसा मुंडा. जेव्हा 1857 वगळता ब्रिटिश सत्तेविरोधात सशस्त्र क्रांतीचे फार मोठे उठाव झाले नव्हते, त्या काळात एका युवकाने ब्रिटिश साम्राज्याची पाळेमुळे हालवून टाकली होती, त्याचे नाव म्हणजे बिरसा मुंडा. अवघ्या 25 वर्षांच्या आयुष्यात किती जन्मांचं कर्तृत्व करून जगता येतं याचं एकमेवाद्वितीय उदाहरण म्हणजे बिरसा मुंडा.
बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 मध्ये झारखंड राज्यातील उलिहातु येथे झाला. म्हणून बिहार राज्यापासून वेगळं होताना झारखंड राज्याचा जन्मदिन देखील हाच सुवर्णदिन आहे. त्यावेळी ब्रिटिश सत्तेची जुलूमशाही शिगेला पोचली होती. त्यांच्या छत्रछायेत आपल्या समाजात पूर्वापार चालत असलेली जमीनदारी, सरंजामी अधिक फोफावली होती. ब्रिटिशांच्या नव्या जुलुमी कायद्यानुसार आदिवासींचे मूलभूत हक्क हिरावले होते. ज्या जंगलांचे खरे मालक आदिवासी आहेत, त्यांना जंगलात आपली जनावरे चरवण्यास प्रतिबंध लावण्यात आला, त्यांना सरपण गोळा करण्यास देखील मनाई होती. असे करताना आढळल्यास त्यांची मिळकत असलेली शेतजमीन जप्त केली जायची, त्यांची जमीन कोणीही बळकावू शकत होते, यातून त्यांच्यावर अन्याय अत्याचार केले जायचे. दुसरीकडे या भोळ्याभाबड्या लोकांना भुलवून ख्रिस्ती करवून घेण्याची मिशनरी मोहीम सुरू होती. या विरोधात दाद मागायची तरी कुणाला या प्रश्नाचे उत्तर नव्हते. अनेकांनी आवाज उठवला, विद्रोह केला मात्र हा एक उठाव व्हावा असे नेतृत्व तयार होत नव्हते. हे नेतृत्व तयार होण्यापूर्वीच इंग्रजांकडून ते चिरडले जायचे.
हा उठाव केला तो वीर बिरसा मुंडा यांनी. या क्रांतीची बीजे अगदी लहाणपणीपासून रोवल्या गेली. त्यांचे आईवडील दोन्ही ख्रिस्ती झाले होते. या ख्रिस्ती धर्मांतरामुळे मुंडा जनजाती परंपरेचा होणारा ह्रास ते जवळून बघत होते, शिवाय इंग्रजांची जुलूमशाही आणि जमीनदारांचा अन्याय-अत्याचार बघून त्यांचं मन धगधगत होतं. यात क्रांतीची ठिणगी पडली ती 1888-89 मध्ये. मिशनरी शाळेचा वर्ग सुरू होता आणि त्यात एक इंग्रज शिक्षक डॉ. नॉटरॉड आदिवासींच्या प्रथा-परंपरेबाबत अत्यंत आक्षेपार्ह शब्दांत हिणावत होता. 13-14 वर्षांच्या बिरसाला हे सहन झाले नाही आणि त्यांनी विरोध करत या शिक्षकाला त्यांची जागा दाखवली. हे प्रकरण या शाळेचे फादर लुथरनपर्यंत पोचले. लुथरन यांनी बिरसा यांना बोलावून घेतले आणि डॉ. नॉटरॉडची माफी मागायला सांगितली. बिरसांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला आणि त्यांना शाळेतून बेदखल करण्यात आले.
याच दरम्यान त्यांचा एक मित्र 'सोमा'चा आजाराने मृत्यू झाला. तो धर्मांतरीत झाला असला तरी त्याचे अंत्यसंस्कार हे 'मुंडा' जनजातीप्रमाणे व्हावी ही त्याची अंतिम इच्छा. त्यामुळे गावकऱ्यांनी तशी तयारी केली. याच वेळी फादर लुथरन आपल्या समर्थकांसह तिथे पोचले. त्यांनी याला विरोध करत हा अंत्यविधी ख्रिस्ती धर्मानुसार व्हावा असा दबाव टाकला, अन्यथा याचे परिणाम सर्वांना भोगावे लागेल अशी धमकीही दिली. पण या धमकीला सुरुंग लावला तो बिरसा यांनी. "तुम्ही लोक आमचे जीवन आणि परंपरेत अनावश्यकरित्या दखल देताहात" असे म्हणत त्यांनी बंड पुकारले. त्यांच्या नेतृत्वात सारा गाव एकवटला आणि आपला जीव वाचवून फादर लुथरन यांना तिथून पळ काढावा लागला. याच वेळी बिरसा यांनी 'ईश्वर केवळ एक' या संकल्पनेनुसार 'बिरसेत' धर्माची स्थापना केली आणि क्रांतीचा 'उलगुलान' पेटवला. ब्रिटिशांच्या या जुलूमशाहीविरोधात त्यांनी जंगलं पायदळी तुडवून सर्व आदिवासी समाजाला संघटित केलं. जवळपास सहा हजार सशस्त्र क्रांतिकारकांची फौज त्यांनी तयार केली. जिथे जिथे ब्रिटिशांचा युनियन जॅक दिसत होता तिथे त्यांनी उलगुलानचा झेंडा रोवला. याच वेळी त्यांनी नारा दिला
"अबुआ राज एते जाना, महारानी राज टुंडू जाना" म्हणजे आमचे राज्य येणार आणि ब्रिटिश राणीची सत्ता जाणार, असा तो नारा होता. हे बंड बघून ब्रिटिश हैरान होऊन गेले आणि बिरसा यांना पकडण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू झाले. अनेक प्रयत्न फसले मात्र, 24 ऑगस्ट 1895 ला त्यांना अटक झाली. दोन वर्षे त्यांना तुरुंगात ठेवण्यात आले, मात्र इथेही त्यांची वैचारिक क्रांती सुरूच होती. 1897 मध्ये त्यांना सोडण्यात आले. यावेळी त्यांनी ब्रिटिशांशी हातमिळवणी केली नाही, कुठला तह केला नाही, तर तुरुंगातुन बाहेर निघताच क्रांतीच्या आगीचा वणवा ते पेटवत सुटले. 1897 ते 1900 पर्यंत त्यांनी जुलूमशाही करणाऱ्या 79 जमीनदारांची घरे जाळली, ब्रिटिशांच्या चौक्या उध्वस्त केल्या. आता बिरसा मुंडा 'भगवान बिरसा मुंडा' झाले होते. छोटा नागपूर परिसरातील जवळपास 550 वर्ग किलोमीटरमध्ये त्यांनी क्रांतीची मशाल पेटवली होती. ब्रिटीश सत्तेची पाळेमुळे या उठवाने हालवून टाकली होती. हा उठाव चिरडण्यासाठी बिरसा यांना अटक हा एकमेव पर्याय होता, मात्र बिरसा यांनी सत्तेला जंगजंग पछाडले होते. त्यांना पकडण्यासाठी त्याकाळी 500 रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. एवढेच काय यासाठी ब्रिटिश जिल्हाधिकाऱ्याला सशस्त्र सेनेची मागणी करावी लागली. दोन सैन्याच्या तुकड्या यासाठी पाठवल्या गेल्या.
अशातच 3 जानेवारी 1900 मध्ये डंबारी पहाडावर एका विराट सभेचे आयोजन केले जाते. जिथे बिरसा मुंडा संबोधित करणार होते, हजारोंच्या संख्येने निशस्त्र आदिवासी तिथे जमतात आणि ब्रिटिश सेना आणि पोलीस त्यांच्यावर हल्ला चढवतात. अंधाधुंद गोळीबार केला जातो. यात जे मृत पावले त्यांना पहाडावरून फेकून दिले जाते आणि जे जखमी झाले त्यांना जिवंत गाडले जाते. शेकडोंच्या संख्येने निशस्त्र आणि निर्दोष लोकांना मारले जाते. मात्र तरीही बिरसा त्यांच्या हाती लागत नाहीत.
25 मार्च 1900 मध्ये 'द स्टेटमेंट' या वृत्तपत्रातील बातमीच्या अहवालानुसार जवळपास 400 लोक यात मारले गेले. मात्र, ब्रिटिशांच्या दफतरदरबारी केवळ 11 लोकं मारले गेल्याची नोंद आहे. आदिवासींच्या भाषेत डुंबरी पहाडाला 'टाप्ड बुरु' म्हणजे मृतदेहांचे पहाड असे म्हटले जाते. हे सर्व घडलं जालियनवालाबाग हत्याकांडाच्या 20 वर्षांपूर्वी. भारतातील हे पहिले सामूहिक हत्याकांड होते. पण इतिहासाने या निर्मम हत्याकांडाची दखल घेतली नाही.
अजूनही बिरसा पोलिसांच्या हाती लागत नाहीत, दरम्यान त्यांच्या अनेक साथीदारांची धरपकड होते, यातच 3 मार्च 1900 मध्ये बिरसा मुंडा यांना अटक होते. आपल्या जननायकाला बघण्यासाठी जनसमुदाय एकवटतो, यातून त्यांची लोकमान्यता कळते. बिरसा तुरुंगातुन सुटले तर काय होणार हे ब्रिटिशांना वेगळं समजण्याची गरज नव्हती. अशातच 9 जून 1900 मध्ये 'वीर बिरसा मुंडा' यांचा मृत्यू होतो. मृत्यूचे कारण 'डायरिया' सांगण्यात येते. यादरम्यान त्यांचा घातपात केला गेला असाही प्रश्न उपस्थित होतो. असेलही. त्यांना जीवित ठेवण्यात ब्रिटिशांचा तरी काय रस होता. ब्रिटिशांच्या विरोधात उठाव करणाऱ्या एका मोठया क्रांतिकारकाच्या कार्याला या काळया दिवशी पूर्णविराम लागला. मात्र, ही ज्योत जळत होती. अखेर ब्रिटिश सत्तेला हा जुलुमी कायदा मागे घ्यावा लागला आणि 1908 मध्ये छोटा नागपूर टेनंसी ऍक्ट पारित करावा लागला. ज्या अंतर्गत कोणीही गैरआदिवासी आदिवासींची बळकावू शकत नाही, विकत घेऊ शकत नाही. ते आजतागायत कायम आहे.
इतकी मोठी सशस्त्र क्रांती, इतका मोठा उठाव आणि इतके मोठे नेतृत्व मात्र याची दखल आपल्या करंट्या इतिहासाने त्रोटकपणे घेतली. त्यांचे नाव थोर क्रांतिकारकांच्या सुवर्ण इतिहासात ठळकपणे कोरले गेले नाही. आजही गुगलवर सर्च केल्यास केवळ ऍक्टिव्हिस्ट म्हणून त्यांचे नाव येते.
तर बिरसा मुंडा यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकणारे हे नाटक आहे. इतिहासाचा संपूर्ण तपशील घेऊन नाही तर त्याचा आधार घेऊन, कलात्मक स्वातंत्र्याची जोड देऊन संहिता रचल्या गेलीय. तर जगमोहन हा एक माजोर्डा जमीनदार, त्याच्या मुनीम लाला यांच्याकडून इंग्रजांशी हातमिळवणी करून परिसरात अन्याय अत्याचार केला जातो, यातून संपूर्ण आदिवासी समाज त्रस्त असतो. अशातच वीर बिरसा यांचा जन्म होतो, ते याविरोधात बंड पुकारतात. त्यांच्या संघर्ष आणि करुण अंत असे या नाटकाचे थोडक्यात कथानक आहे.
नाटकाचे सादरीकरण हे प्रभावी झाले. हे नाटक झाडीपट्टी नाट्यसंस्कृतीच्या धाटणीची आहे, त्यामुळे त्यात असणारे सर्व नाट्यरंग भरलेले आहेत. कथानकाच्या प्रवासात लावणी, लाईव्ह संगीत, पडद्यांचे नेपथ्य, विनोद अशा सर्व बाबींचा यात समावेश आहे. मात्र तरीही यातून मूळ नाट्यविचार सादर करण्यात यश आले. स्पर्धकांनी रंगमंचावर आपला एक छोटा मंच उभा केला, त्यातच विंगेचीही रचना केली गेली, याच रंगमंचाचा नेपथ्यासाठी वापर केला गेला. नेपथ्य आकर्षक असे होते. प्रसंगानुरूप मागे पडद्यांची केलेली नियोजनबद्ध अदलाबदल थोडी चुकामुक झाली तरी त्याची हाताळणी आव्हानात्मक आणि प्रशंसनीय होती. जमीनदाराचा वाडा, इंग्रजांचा तुरुंग पडद्याचा वापर करून उभारणे नाविन्यपूर्ण होते.
इंग्रजांसोबत बंडखोरांची झटापट, आदिवासी युवतीच्या इंग्रज अधिकाऱ्याशी संवादाचा प्रसंग, जमीनदार जगमोहनचे प्रसंग, आदिवासी तरुण-तरुणीचा संवाद,
बिरसा मुंडा यांनी पुकारलेले बंड आणि तुरुंगाच्या प्रसंगातून नाटय समर्थपणे उभे राहिले.
सर्वांनी आपल्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. बिरसा मुंडा यांच्या भूमिकेला भुपेश भोयर यांनी न्याय दिला. त्यांची साजेशी शरीरयष्टी, आश्वासक देहबोली यातून हे विद्रोही पात्र आश्वासकरित्या उभे ठाकले, इंग्रज अधिकाऱ्यांच्या भूमिकेत नारायण उरकुडे यांनी छाप सोडली. योग्य इंग्रजाळलेल्या मराठी-हिंदी संवादातुन हा प्रभाव कायम राखला गेला. आदिवासी बंडखोराची मिश्किल भूमिका देखील चांगली वठवण्यात आली, हा अभिनय प्रवाही होता. रमेश राऊत यांनी लबाड लाला हे पात्र अचूकपणे वठवलं. तर फादरीची भूमिका ही अतिरंजित पद्धतीने वठवण्यात आली. इंग्रजीदर्पाची भाषा बोलताना इतका अतिरेक झाला की संवाद ऐकूनासे झाले. यात सर्वात प्रभाव टाकला तो जामीनदार जगमोहनच्या भूमिकेत नानेश्वर प्रधान यांनी. पात्रात असलेले खलनायकी नाटयभाव त्यांनी प्रभावीपणे साकारले. संवादांचा चढोतार, आश्वासक देहबोली आणि रंगमंचावरील मुक्तसंचार यामुळे सादरीकरण अधिक प्रभावी झाले. नर्तकीच्या भूमिकेत केवळ नृत्य आहे. कुशल नृत्यांगना प्रणाली बडवाईक यांनी देखील त्यात कुठली कसर सोडली नाही. प्रत्येक लय, ठेक्याची जागा त्यांनी नृत्य कौशल्याने उठावदारपणे भरून काढली. पण अशा गंभीर कथानकात खरंच तमाशाची गरज आहे? जमीनदाराच्या वाड्यात नाचणारी नृत्यांगनापर्यंतही ठीक पण स्वतः बिरसा मुंडा सामाजिक आनंद व्यक्त करण्यासाठी एका नर्तकीला आमंत्रित करतात आणि तिच्यासोबत आदिवासी समूहनृत्य केले जाते? यासाठी स्वतःची आदिवासी सांस्कृतिक नृत्य पुरेसे नाही का? याचा गांभीर्यपूर्वक विचार स्पर्धकांनी करणे आवश्यक होते.
रंगभूषा-वेशभूषा ही प्रातिनिधिक स्वरूपाची होती. इंग्रज अधिकाऱ्याची रंगभूषा आश्वासक होती. संपूर्ण पार्श्वसंगीत लाईव्ह होती. ते परीणामकारक पण अधिक भडक होती. पण लाईव्ह असल्याने प्रसंगानुरूप संगीत निर्माण करणे सोयीस्कर झाले. जमीनदार जगमोहनचे पात्र वठवताना 'नायक नही, खलनायक हु मैं" या गाण्याचा प्रयोग कथानकाचे गांभीर्य घालवणारा आणि सुमार दर्जाचा वाटला.
-अमित शंकर वेल्हेकर
नाटक : वीर बिरसा मुंडा
लेखक : हरीराम कोटनाके
दिग्दर्शक : जोगेश्वर गावडे
नेपथ्य : योगेश्वर वालदे, लाला मुनेश्वर
प्रकाश योजना : टिकाराम राऊत
रंगभूषा-वेशभूषा : दीक्षा मेश्राम, परमानंद कापगते, मीनाक्षी राऊत, यशवंत उरकुडे
पार्श्वसंगीत : संतोष लटके, विनोद वाडगुरे, संदीप घुगवा
भूमिका : भुपेश भोयर, रमेश राऊत, नारायण उरकुडे, सुकलाल हारामी, प्रणाली बडवाईक, सुभाष मेश्राम आणि इतर.


0 Comments