64 वी राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा, चंद्रपूर केंद्र; नाट्य समीक्षण : 'काळ्या मुलीचं मॅरेज'

 नाट्य समीक्षण : काळ्या मुलीचं मॅरेज


(या स्पर्धेचे सर्व नाट्य परीक्षण वाचण्यासाठी वरील home ऑप्शनवर क्लिक करा)

Drama



केवळ आव्हानात्मक नाट्य निर्माण करण्याच्या मोहात लेखकाने कुठल्याशा कच्च्या संकल्पनांना घेऊन त्यांना ओढून ताणून नाटकाच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करावा आणि तेवढ्याच बाळबोधपणे त्याचे सादरीकरण केले जावे याची प्रचिती 'काळ्या मुलीचं मॅरेज' हे नाटक बघताना आली.


नेमकी काय गोष्ट बघून लेखकाने ही नाटकाची संहिता लिहायला हाती घेतली, याचा संदर्भ काय, यातून कुठले नाट्य तयार झाले, वर्णभेद आणि दहशतवादाचा संबंध काय, त्याचे तपशील-दाखले काय, संहिता लिहिताना यावर कुठला अभ्यास केला गेला, स्पर्धकांना यात कुठले नाट्य दिसले आणि सादरीकरणात यात नेमकी कुठली भर घातली गेली अशा अनेक प्रश्नांची उत्तरे नाटकाच्या शेवटपर्यंत अनुत्तरित राहतात. 

 
संपूर्ण कथानकात करिश्मा शेख आणि अमित श्रीवास्तव ही दोनंच पात्र आहेत. करिष्मा ही काळ्या रंगाची आहे. आपल्या भारतीय समाजात काळ्या वर्णावरून होणारा भेदभाव, रंगावरून समाजाकडून जगणं असह्य करून टाकणारी टिंगलटवाळी, आपल्याच घरातुन मिळणारी दुय्यम-तिरस्करणीय वागणूक, काळा जन्मला म्हणून आपल्याच पोटच्या मुलाला ठार करणाऱ्या समाजाचा प्रातिनिधिक बाप, विदेशात देखील वर्णभेदावरून मिळणारी अमानवीय वागणूक आणि या सर्वांचे चटके सोसलेली करिश्मा असे हे पात्र आहे. यातुन आलेला न्यूनगंड, तिला आपल्याच विषयी मनस्वी चीड आणि तिरस्कार निर्माण करतो. यातून तिच्यात सूड, बदला घेण्याची भावना जागते. यासाठी तिच्या सोबत असणारा अमित श्रीवास्तव हा देखील समदुःखी असतो. रंगभेदाविरोधात हिंस्र युद्ध पेटविण्यासाठी तो 'ब्लॅक युनियन' या संस्थेची स्थापना करतो. या संघटनेचे जाळे जगभर पसरलेले आहे. त्याचा तो सचिव आहे. बदला घेण्यासाठी मोठा स्फोट घडवून आणण्याचं करिष्मा आणि अमित यांचं ठरतं. पण यासाठी करिष्माला
'फिदायीन' म्हणजे मानवी बॉम्ब बनावं लागेल हा एकच पर्याय तो तिच्यासमोर ठेवतो. त्यांना कुणालातरी करिश्मा पुष्पगुच्छ देताना हा स्फोट घडवून आणायचा असतो. यासाठी ती तयार देखील होते. हा 'प्लान'ला सत्यात उतरविण्यासाठी अमित करिष्माला शारीरिक-मानसिक प्रशिक्षण द्यायला लागतो. जिथे आत्मघाती स्फोट घडवून आणायचा आहे त्या ठिकाणी जाऊन ही दोघे रेकी देखील करून येतात. पण काही संशयितांनी देशातील संवेदनशील भागात रेकी केल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना लागते, ही बातमी प्रसारमाध्यमांत येते आणि त्यांची प्लानिंग फिस्कटते. या दोघांव्यतिरिक्त तिसऱ्या कुणाला या कटाची माहिती नसल्याने ती कोणी दिली प्रश्न उभा राहतो आणि शेवटी नाट्यमय घडामोड घडते. तो अमित श्रीवास्तव नसून पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयने पाठवलेला प्यादा 'आफताफ' असतो, जो आपल्या देशात हिंसक कारवाया घडविण्यास आला असतो तर ती करिष्मा नसून भारतीय गुप्तचर यंत्रणेतील कृष्णा देशमुख असते. अखेर हा पाकिस्तानी दहशतवादी पकडल्या जातो. 

Drama
'काळ्या मुलीचं मॅरेज' नाटकातील एक प्रसंग.


या संपूर्ण कथानकात नाट्याचा पाया भक्कमपणे निर्माण व्हावा याचा कुठलाच ताळमेळ बसत नाही. जो बसवला गेलाय तो तार्किकदृष्ट्या अत्यंत कमकुवत आणि बाळबोध वाटतो. वर्णवाद, दहशतवाद, दहशतवादी नेटवर्क, गोरिला वॉर, आत्मघातकी मानवी बॉम्ब, गुप्तचर यंत्रणा, त्यांच्यात कायम सुरू असणारे शीतयुद्ध, देशाविरोधात विदेशी गुप्तचर यंत्रणेची काम करण्याची पद्धत यातील प्रत्येक संकल्पना हे स्वतंत्र जग असून ते अफाट आहे. पण नामोल्लेख वगळता हे नाटक या विषयांच्या वास्तवीकतेच्या खोलात जाण्याच्या प्रयत्नांना स्पर्श करत नाही. 


 आपल्या देशात काळ्या रंगाबाबत एक धारणा असणारा स्टीरिओटाईप माईंड आहे. विशेषतः काळ्या मुलींबाबत. 
यातून भारतात काळ्या लोकांना हिणकस वागवून दिली जाते हे देखील सत्य आहे. मात्र भारतातील हा वर्णभेद काही जाती, वर्ग, धर्मातीत नाही. कोणी गोरं आहे म्हणून दुसऱ्या समाजातील लोकांशी रोटीबेटीचा व्यवहार केला जात नाही आणि म्हणूनच हा वाद इतर भेदभावांच्या तुलनेत इतका टोकाचा किंवा वरचढ नाही. आपल्या भारतात असाही मोठा वर्ग आहे जो या अर्थानं कृष्णवर्णीय आहे. म्हणून त्यांच्यातल्या त्यांच्यात हा भेदाभेद होत नाही. पती आणि पत्नी दोघेही काळे असले तर जन्माला येणारं मुलं हे निसर्गतः काळंच होणार. म्हणून त्याला संपवून टाकण्यापत कोणी क्रूर होत नाही. मात्र तरीही असा प्रसंग यात दाखवला गेलाय. आणि दुसरीकडे जगात काळ्या रंगाबाबत होणारा द्वेषपूर्ण भेदभाव यात जमीन अस्मानचे अंतर आहे. जगात त्वचेनुसार ब्लॅक, ब्राउन, येल्लो, रेड आणि व्हाइट (गोरे) असे प्रकार आहेत. यात भेदभावपूर्ण मानसिकता बाळगणाऱ्या गोऱ्यांना आपण वगळता सर्वच काळे वाटतात. भारतीय 'ब्राऊन' मध्ये येतात. यातही अनेक कॉम्प्लेक्शन्स आहेत. त्या हिशोबाने भारतात हा भेदभाव केला जातो. असे असताना या दोन्ही गोष्टींची सळमिसळ करून संहिता रचली गेली. करिष्माला बदला घ्यायचा असतो म्हणून ती 'ब्लॅक युनियन'चा सचिव अमित सोबत जुळते. तो तिला आत्मघाती हल्ल्यात स्फोट घडवून आणायचं सांगतो. पण कोणाविरोधात? त्यांना भारतात नेमकं कुणाला मारायचं आहे? याच काहीच तारतम्य जुळत नाही, तसा कुठला ऐतिहासिक दाखला देखील नाही. दहशतवाद आणि वर्णभेदाच्या दृष्टीने या दोघांत आपल्या शत्रूबाबत एकविचार होऊ शकतो का, पाकिस्तानातील दहशतवादी भारतात चालणाऱ्या वर्णभेदाचा विरोध करणाऱ्या लोकांचा दहशतवादी कृत्य करण्यासाठी  'टूल' म्हणून वापर करू शकतात का याचे उत्तर हे न शोधलेलेच बरे.

मुळात नाट्यपूर्ण संहिता निर्माण करण्याच्या प्रयत्नात या विषयाच्या गांभीर्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले. त्यामुळे नाटकातील पात्र देखील आश्वासकरित्या उभे ठाकत नाहीत. एका क्षणात आक्रमक होणारा, दुसऱ्या क्षणी भित्रा होणारा, आपली गन विसरणारा, पांडाला कपडे घालून दहशतवादी कृत्याची कल्पना करणारा, बॉम्ब कसा ऑपरेट करायचा या ऐवजी संतुलन कसं राखायचं आणि बुके कसा पकडायचा याचं प्रशिक्षण देणारा, करिश्माकडून एक साध्या कीपॅड मोबाईलचा addiction वाटावं इतका वापर होत असताना जराही संशय न येणारा, खाली दारूच्या बोटल्स असून देखील या विसंगतीकडे लक्ष न जाणारा, केवळ बोटांची हालचाल करून प्लॅनिंग कशी करायची याची कल्पना करणारा, हातातील साध्या quartz वॉचने प्रशिक्षण देणारा, प्रशिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच रेकी करायला लावणारा, ते ही एका विशिष्ट धार्मिक वेषात ज्याला सर्वाधिक संशयाच्या चौकटीतुन बघितलं जात असा दहशतवादी असू शकतो काय? निष्पाप लोकांचा जीव घेण्यास जराही मागेपुढे न पाहणारा वेलट्रेंड दहशतवादी मानसिकरित्या इतका कमकुवत असतो का? आणि अशा दहशतवादी कारवाया केल्या जातात का हा प्रश्नच आहे.

वर्णभेदावरून दहशतवादी कृत्य करण्यापर्यंत एखाद्याची मजल जाऊ शकते का, ती आश्वासकरित्या उभी राहू शकते का याचाही विचार फारसा परिपक्वतेने संहितेत झालेला नाही.
अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा उहापोह केल्यास नाट्य परीक्षण पूर्ण होऊ शकणार नाही. 

नाटकाची सुरुवात ही हिंदी संवादापासून होते नंतर ते मराठीत बोलतात (मुळात ते हिंदीतच बोलत असतात) हा प्रयोग चांगला होता. यापूर्वी असा प्रयोग 'मोहनजोदाडो' चित्रपटात आशुतोष गोवारीकर यांनी केला होता. एकांतात असताना आणि ब्लॅक आउट झाल्यावर हे दोघेही आपल्या खऱ्या रुपात काम करतात हे दिसून आले.

मुळात करिष्मा या पात्राच्या अपेक्षेत नूतन धवने यांची निवड ही विसंगत वाटली. नाटकाच्या संहितेनुसार खोटं खोटं का होईना एक रंगभेदाच्या सूडभावनेने पेटलेली शारीरिक आणि मानसिकरित्या कणखर स्त्री, तिची दाहकता आणि भेदकपणा अभिनयात उतरला नाही. शिवाय एखाद्या अंडरकव्हर एजंटची शारीरिक सक्षमता कशी असावी, तिच्या अभिनयातुन तिच्या चाणाक्षतेची चुणूक दिसावी यासाठी भरपूर ऊर्जा लावावी लागते, यावर देखील फारसे काम केले गेले नाही. हे पात्र सादरीकरणात आश्वासकरित्या प्रभाव टाकू शकले नाही, यात प्रयत्न कमी पडले. अमित श्रीवास्तवच्या भूमिकेत नाट्यरस भरण्याचा प्रयत्न झाला मात्र मुळात या पात्राचा आलेख अधिक नाटकीय असल्याने परिणाम देखील तसाच साधला गेला. काही प्रसंगात नाटकाची रंगत निर्माण झाली.

धवने यांच्याकडून ऑस्ट्रेलियालाचा दोनदा 'ऑस्टेलिया' असा उल्लेख झाला, 'रीझ्युम' हा शब्दोच्चार कधीचाच कालबाह्य झाला, त्याला आता 'रीझ्युमे' असं म्हणतात. मात्र गौरव सातपुते यांनी कालबाह्य शब्दप्रयोग केला. Janab या कोडवर्डचा फुल फॉर्म सांगताना jihadi allura aftafi bagawat असा उल्लेख केला गेला. मात्र यात N चा संदर्भ आलाच नाही. या बाबी टाळता आल्या असत्या. दहशतवादी प्रशिक्षण देण्यासाठी एका हाताच्या घडीचा स्टॉपवॉच सारखा उपयोग करणे हे अपरिपक्व वाटले. मुळात दहशतवादी कृत्यांचा एकूण अभ्यास केला तर एकच नाव समोर येते ते म्हणजे casio F91W ही डिजिटल घडी. जगात याचा वापर सर्वाधिक दहशतवादी आणि दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी केला गेला. ओसामा बिन लादेन हीच घडी घालत होता. केवळ एक हजारात मिळणारी ही घडी कुठल्याही वातावरणात अचूक वेळ सांगते म्हणून आजही जगात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या डिजिटल वॉचमध्ये ती अव्वल आहे, अनेक सेलिब्रिटी ही घडी घालतात. याचा किंवा अशा खऱ्याखुऱ्या साहित्याचा वापर केल्यास त्यात अधिक मूल्यात्मक भर घातली गेली असती. स्मार्टफोन वापरत असताना व्हाट्सएपच्या जमान्यात आपण sms वाचत आहे असं सांगणं ही विसंगती वाटली.

सगळ्यात महत्वाची बाब. संपूर्ण कथानकाचा केंद्रबिंदू हा 'काळ्या मुलीचं दुःख' यावर आहे. मुळात भारतीय दृष्टीकोनातून ही दोन्ही पात्र रंगाने खरीखुरी काळी वाटावी याची तसदी रंगभूषा करताना घेतली गेली नाही. करिश्मा काळी दाखवली आणि नंतर ती खरी ओळख दाखवताना मेकअप काढून येते हा परिणामही साधला गेला नाही. काळ्या लोकांचे नक्की दुःख काय आहे हे त्यांना हिणवतानाच्या प्रसंगात मोठ्या ताकदीने उभे राहायला हवे होते, ती परिणामकता जाणवली नाही. 

ज्या चाकोरीबद्ध साच्यातून दहशतवादी लोकांची परिभाषा केली जाते त्याच चाकोरीतुन नाट्याचा शेवट होतो. कृष्णा देशमुख च्या नावाने समोर येणारी पण वास्तविक करिष्मा शेख नावाची अंडर कव्हर एजंट म्हणून चालली नसती का हा प्रश्न डोकावत राहतो. 

त्यामुळे 'ऑपरेशन काळ्या मुलीचं मॅरेज' या कोडवर्ड व्यक्तिरिक्त 'कोणत्या काळ्या मुलीचं मॅरेज'? अनेक प्रश्नांसह हा देखील प्रश्न कायम छळत राहतो. 

-अमित शंकर वेल्हेकर

नाटक : काळ्या मुलीचं मॅरेज
लेखक : निरंजन मार्कंडेयवार
दिग्दर्शक : बकुळ धवने
नेपथ्य : पंकज नवघरे
प्रकाश योजना : अजय करडे
पार्श्वसंगीत : सुरज उमाटे
रंगभूषा-वेशभूषा : मेघना शिंगरू, रोहिणी उईके
कलावंत : गौरव सातपुते, नूतन धवने

Post a Comment

0 Comments