नाट्य समीक्षण : 'तांडा'
(या स्पर्धेचे सर्व नाट्य समीक्षण वाचण्यासाठी वरील home बटनवर क्लिक करा)
जो शल्यचिकित्सक उपचार करताना रुग्णासाठी ही प्रक्रिया किती वेदनादायी आहे त्याऐवजी त्यावर नेमकी आणि अचूक शुश्रूषा कशी करता येईल याकडे सर्वाधिक लक्ष देतो. तीच खऱ्या आणि एका उत्तम डॉक्टरची ओळख असते. रोग जेवढा असाध्य त्यावर औषधांचा माराही तितकाच भेदक असण्याची गरज असते. लेखक देखील सामाजिक स्वास्थ्याचा शल्यचिकित्सकंच असतो. समाजात असणारे वास्तव कितीही कटू असले तरी आपल्या साहित्याच्या माध्यमातून समाजभानाचे औषध तो देत असतो. 'तांडा' या नाट्यविष्काराच्या माध्यमातून लेखकाने हेच औषध समाजाला दिले आहे. निरर्थकपणे गोष्टींच्या दुसऱ्या बाजूचे संतुलन राखण्याचा असंतुलित प्रयत्न करण्याऐवजी हात घातलेल्या विषयाला मानवीयता आणि न्यायाची कसोटी लावत थेट पिंजऱ्यात उभं केलं गेलं आहे. या नाटकाचा विषय हेच कथानक आणि कथानक हाच विषय इतकी घट्ट आणि परिपक्व अशी संहितेची मांडणी आहे.
चित्रपटात कथा आणि पटकथा या वेगवेगळ्या गोष्टी असतात. मात्र, काही अवलियांनी काही चित्रपटात हा भेदच एक करून टाकलाय. ख्रिस्तोफर नोलान यांचा 'मेमेंटो', मिशेल गोंड्री यांचा 'इटर्नल सनशाईन ऑफ द स्पॉटलेस माईंड', कमल हसन यांचा 'मुंबई एक्सप्रेस' अनुराग कश्यपचा 'दो बारा' अशी कितीतरी उदाहरणे देता येतील ज्यातून एक सिन जरी काढला तर कथानक पुढे जाणार नाही आणि मिस झाला तर समजणार नाही. नाटकात मात्र हा फॉर्म थोडा वेगळा असतो. इथे विषय/संकल्पना आणि कथानक अशी ढोबळमानाने आखणी असते. 'तांडा' च्या संहितेत हा फरक बेमालूमपणे मिसळला गेलाय. या नाटकातील प्रसंग हाच एक संवाद आणि संवाद हाच एक स्वतंत्र प्रसंग वाटतो. यातला एक प्रसंग जरी वजा केला तर कथानक पुढे जाणार नाही इतकी नेमकी आणि थेट त्याची मांडणी आहे.
समाजात चालणाऱ्या अंधश्रद्धा, अनिष्ठ रूढी-परंपरा त्यातून समाजाचं आणि विशेषतः स्त्रियांचं होणारं शोषण या मध्यवर्ती विषयावर आजवर असंख्य नाटकं आली आहेत. 'तांडा' हे नाटक देखील त्यापैकी एक. पण या विदारक सत्याची सशक्त मांडणी हे या नाटकाचे नाविन्य आणि वैशिष्ट्य आहे. तेवढ्याच जिवंतपणे याचे सादरीकरण करण्यात आले. सशक्त अभिनय, प्रातिनिधिक नेपथ्य, सुनियोजित प्रकाशयोजना, कथानुरूप पारंपारिक वाद्यसमृद्ध पार्श्वसंगीत, आखीव रेखीव वेशभूषा-रंगभूषा यातून या विषयाला एक वेगळी भावोंची गाठून दिली. रंगमंचावरील नाट्याचा परिणाम साधला जावा यासाठी पडद्यामागे त्यापेक्षा मोठे नाट्य घडत असते. जवळपास तीसएक कलावंतांचा प्रवेश, प्रत्येक कलावंताची 'प्रवेश, अभिनय आणि बहिर्गम' अशी नियोजनबद्ध शृंखला कायम ठेवण्याचे मोठे आव्हान होते जे लीलया पेलल्या गेले.
देशातील अनेक भागात लग्नात कौमार्य चाचणी केली जाते. राजस्थान, गुजरात, महाराष्ट्रासारख्या अनेक राज्यात मानसिकरित्या मागासलेल्या समूहात अशे प्रकार प्रचलित आहेत. राजस्थानात अशाच एका लग्नात कौमार्य परीक्षेत पास न झालेल्या मुलीला, उकळत्या तेलात हात घालण्याची परीक्षा द्यावी लागते. तीने नकार दिल्यावर तिच्या कुटुंबाला बहिष्कृत करून तिची धिंड काढली जाते. हा व्हिडीओ कायद्याचे पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्रातील तरुणीपर्यन्त पोचतो. तिला न्यान मिळवून देण्यासाठी ती राजस्थान गाठते. ही संपूर्ण अमानवीय प्रथा ती जनहित याचिकेच्या माध्यमातून न्यायालयात घेऊन येते आणि अखेर न्याय होतो, अशी नाटकाची थोडक्यात कथा आहे.
अगदी पहिल्या प्रसंगापासून तर शेवटच्या प्रसंगापर्यंत कथानकाची गती आणि त्यातील नाट्याची रंगत कायम राखली गेली. प्रत्येक पात्राच्या सुस्पष्ट आलेखात कलावंतांनी प्रभावीपणे अभिनयरस ओतला. नेपथ्यात प्रसंगानुरूप वापरलेले 'प्रॉप्स', त्याची योग्य हालचाल यातून सादरीकरणात जिवंतपणा आला. भव्यदिव्य आणि सुनियोजित प्रकाशयोजना, समूह आणि वैयक्तिक पात्रासाठी दिलेले इफेक्ट, अंधाऱ्या रात्रीचे प्रसंग, पांढऱ्या पडद्यावर उभे केलेले प्रसंग यातून सादरीकरण अधिक इम्पॅक्टफुल झाले. सकाळी पक्षांचा चिवचिवाट, रातरकिड्यांची किर्रकिर्र, प्रवासात येणाऱ्या वाहतुकीचा आवाज, निर्णायक प्रसंगी दिलेले आघाती साऊंड इफेक्ट, राजस्थानी मातीशी जुळलेल्या पारंपरिक वाद्यांच्या सुनियोजित पार्श्वसंगीताने देखील प्रभावी सादरीकरणात महत्वाची भूमिका बजावली.
लेखकाला हे कथानक पात्राच्या स्वगत स्वरूपात देखील मांडता आलं असतं. पण भूतकाळात आधीच एका गोष्टीचा निकाल लागला आहे आणि त्या स्मृतींना उजाळा देण्याच्या प्रक्रियेत एक अपेक्षित साचेबद्धपणा आला असता. त्याऐवजी थेट प्रसंग आणि पात्रांच्या माध्यमातून प्रेक्षकांना स्वतः करायला लावणारा हा नाट्यप्रवास अधिक ताजा, जिवंत आणि गुंतवून ठेवणारा असतो हा विश्वास अधिक परिणामकारक ठरला. एकीकडे जनहित याचिकेची आधीच ठरलेली डेडलाईन, दुसरीकडे शोषित स्त्रियांची समजूत घालून न्यायालयात पोचण्याची धडपड, या दरम्यानचा संघर्ष, मध्ये जमावाची अडवणूक, त्यात पोलिसांची एन्ट्री आणि त्यांची अनपेक्षित भूमिका हा एंगेजिंग स्टोरीटेलिंगचा उत्तम प्रकार सादर करण्यात आला. कायदेविषयक ज्ञानाचाची यात उल्लेखनीय वापर केला आहे.
नाटकाची हाताळणी एखाद्या चित्रपटानुरूप वाटली. पाचही पंचांच्या आवाजाचा बाझ, त्यांची देहबोली आश्वासक अशी होती. सामाजिक व्यवस्था, त्यात पिचला गेलेला माणूस, पोटच्या पोरीसाठी त्याचा पोटतिडकीचा संघर्ष आणि या सर्वांचे द्वंद्व प्रशांत कक्कड यांनी अभिनयातून समर्थपणे मांडले. "चूक मर्दाची पण असू शकते" हा संवाद त्यांच्या कसलेला अभिनयाची पावती होती. वकील शिवानी ही नायिका स्नेहल राहुत यांनी समर्थपणे उभी केली. अचूक संवादफेक, अभिनयसंपन्न देहबोली हा त्यांच्या अभिनयाच्या जमेच्या बाजू. मोगराच्या भूमिकेत कल्याणी बोरकर यांनी प्राण फुंकला. या पात्राचा संघर्ष त्यांनी अभिनयसंपन्नतेने व्यापून टाकला. इमोशन्स हे कुठल्याही अभिनयाचा पाया असतो, याच आधारावर अभिनयाचा कळस गाठला येतो. हा सूर त्यांनी शेवटपर्यंत सोडला नाही. अभिनयाला संवादाची गरज नसते याची चुणूक शुभदा कक्कड यांनी दाखवली, तर अमृता दुधे यांनी देखील आपल्या भूमिकेला न्याय दिला.
अधामधात संवादाची चुकामुक झाली, काही प्रसंगी संवाद स्कीप करावे लागले. विशेषतः कोर्टाच्या सुरुवातीच्या प्रसंगी हे अवघडलेपण जाणवले.
यातले काही संवाद हे अंतर्मुख करणारे होते. आपल्या जोडीदाराला नाकारताना शिवानी "साथीदार हवाय, परीक्षक नाही", "मी पण समाजाची 'मोगरा'च आहे", "तिच्या जळत्या जिभेतून धूर निघत होता आणि जनता म्हणत होती न्याय होत आहे", "मी समाजाला नाही, समाजातील भीतीला विरोध केला", "आज केवळ निर्णय नाही तर इतिहास बदलायचा आहे", "हे नाणं आपलं आहे" हे त्यापैकी संवाद.
हुक्का हा राजस्थानचा प्रचलित प्रकार. अजूनही ग्रामीण भागात तो ओढला जातो. एखाद्याचा सामाजिक बहिष्कार करण्यासाठी 'हुक्कापाणी बंद' असा शब्दप्रयोग तिथे केला जातो इतका तो अविभाज्य घटक आहे. याचा प्रयोग सहज करता आला असता. मोगराच्या घरी चार दिवस अन्न शिजले नाही अशावेळी ती सरपणाची मोरी घेऊन जाताना दाखवण्यात आलं. यातून विसंगतीपूर्ण अर्थ निघतो. ग्रामीण लोकांसमोर इंग्रजी शब्द प्रयोग हे अवाजवी वाटले, प्रसंगातुन त्याचा अचूक परिणाम साधला गेला नाही. पीआयएल अप्रुव्ह, स्ट्रॉंग एव्हीडन्स हे त्यातील काही शब्द. कायद्याचा अभ्यासपूर्ण उल्लेख करताना त्यातील आचारसंहितेकडे देखील लक्ष द्यायला हवे होते. बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या ऍडव्होकेट ऍक्ट 1961 नुसार उच्च न्यायालयात युक्तिवाद करताना वकिलाला गळ्यात व्हाइट बँड घालायला हवा. नरेश बोरीकर यांनी साकारलेल्या वकिलात हे दिसून आलं नाही. काळा किंवा फॉर्मल शूज आवश्यक असतांना त्यांनी चक्क स्पोर्ट शु घातला होता. नाट्य उभे करताना या साध्या बाबींकडे देखील लक्ष द्यायला हवे होते.
-अमित शंकर वेल्हेकर
नाटक : तांडा
लेखक : निनाद पाठक
दिग्दर्शक : प्रशांत कक्कड
नेपथ्य : महेश अडगुळवार
पार्श्वसंगीत : वैभव पाराशर
रंगभूषा-वेशभूषा : ज्योती करनुके, मुग्धा खत्री
अभिनय : प्रशांत कक्कड, स्नेहल राऊत, कल्याणी बोरकर, गौरव भट्टी, अमृता दुधे, शंकर लोडे, रोशन गजभिये, शिरीष आंबेकर, राजकुमार मुसणे, अमित अडेट्टीवार, स्मृती राऊत, शुभदा कक्कड, चेतन धकाते, शीतल खोंडे, गणेश अतकर, भीष्म सिंह, सोनाली सूर आणि इतर.


0 Comments