64 वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा, चंद्रपूर केंद्र; नाट्य समीक्षण : 'विठू-रखुमाय'

 नाट्य समीक्षण :  'विठू-रखुमाय'


(या केंद्रावर पार पडलेल्या सर्व नाटकांचे समीक्षण वाचण्यासाठी वरील home बटनवर क्लिक करा)
Drama



स्पर्धकांकडून गेल्यावर्षी सादर केलेले  'विठू-रखुमाय' नाटक याही वर्षी सादर करण्यात आले. पार्श्वसंगीत आणि किरकोळ बदल वगळता सादरीकरणात सर्व सारखे आहे.

विठ्ठल आणि पदुबाई यांचा सुखी संसार सुरू असतो. राजा विठ्ठल दानशूर व्यक्तिमत्त्व. आपली प्रजा आणि भक्तांसाठी आपल्या खजिन्याची दालनं उघडे करणारा. मात्र पदुबाईला नवऱ्याची ही वृत्ती अजिबात पसंत नसते. तुळशी ही विठ्ठलाच्या भक्तीला स्वतःला वाहून दिलेली स्त्री. तिचा बाप तिला टाकून देतो आणि विठ्ठल तिला आपल्या घरी घेऊन येतात. मात्र तिला घरी ठेवण्यास पदुबाई नकार देते. त्यामुळे तुळशीला नव्या ठिकाणी विठ्ठल वसवतात. दोघांच्या पवित्र संबंधांवर समाज शिंतोडे उडवू नये यासाठी तिच्याशी लग्न करण्याची तयारी देखील ते दर्शवतात. पदुबाईला हे खुपत असते. तिला संपविण्याचा ती कट रचते. याची खबर तुळशीला लागते आणि तुळशी याची शाश्वती करण्यासाठी पदुबाईकडे जाते. विठ्ठल आणि आपल्यात पावित्र्य असल्याचा पुरावा देण्यासाठी ती दिव्याला सामोरे जाते. तुळशी गेल्याचे पाहून विठ्ठल आपली पत्नी पदुबाईला श्राप देतात. या श्रापाने पदुबाईचा करून अंत होतो. विठ्ठल देखील विमनस्क होऊन जातात. मग त्यांचा भक्त माळीराया येतो. आपल्या विठ्ठलाच्या परिस्थितीला आपण जबाबदार आहोत असे जाणून त्याचे प्रायश्चित घेण्यास तो दरिया मायची साधना करतो. याला प्रसन्न होऊन पदुमायचे कमळात रूपांतर होते तर तुळशी ही तुळस बनते. आणि पंढरपूरात 'विठो रखुमाय'ची स्थापना होते. असे नाटकाचे कथानक आहे.

 
मात्र या वर्षी हे नाटक अधिक प्रभावीपणे सादर करण्यात आले. प्रमुख पात्रांचा अभिनय आणि रंगभूषा-वेशभूषा ह्या नाटकाच्या जमेच्या बाजू ठरल्या. या नाटकातील वेशभूषा ही वैविध्यपूर्ण आहे. त्यात भरजरी पेहरावापासून पारंपरिक वेशभूषेचा समावेश आहे. यात मोलाची भर घालण्यात आली. प्रमुख पात्रांमध्ये कलावंतांनी केलेला प्रयत्न देखील प्रामाणिक आणि प्रभावशाली होता. पदुबाईची भूमिका शुभदा रणधीर यांनी उत्तमरीत्या साकारली. प्रसंगांतील नाट्यरसाची जागा त्यांनी अभिनयसंपदेने भरून काढली. तुळशी-कळमनाच्या भूमिकेला स्वामीनी कुळकर्णी यांनी न्याय दिला. ही भूमिका त्यांनी आश्वासकरित्या साकारली, त्यातील ठळक भाव देखील स्पष्टपणे व्यक्त झाले. विठ्ठलाच्या भूमिकेला देखील अशोक गुल्हाने यांनी न्याय देण्याचा चांगला प्रयत्न केला. यावेळी संवादोच्चार अधिक सरस असे होते, त्यातून नाट्यभाव देखील निर्माण होत होते. मात्र बरेचदा हा अभिनय प्रेक्षकाभिमुख अधिक होत असल्याचे जाणवले. फक्त रंगभूमीवरील क्रिया-प्रतिक्रियेवर अधिक भर दिला असता तर त्यातील नाट्य हे आणखी अधिक खुलले असते. कळमना आणि विठ्ठलाची भेट, कळमनाची अग्निपरीक्षा, पदूबाईचा शेवटचा प्रसंग, विठ्ठल-रखुमाईचा शेवटचा प्रसंग प्रभावीपणे साकारण्यात आले.  

Drama
'विठू-रखुमाय' नाटकातील एक प्रसंग.





 

नाटकाच्या सुरुवातीला आवाजाचा सूर कमी लावल्याने श्रवणात व्यत्यय येत होता नंतर हा सूर सावरण्यात आला. अधेमध्ये संवादाची चुकामुक झाली. प्रसंग आणि प्रकाशयोजनेतही चुकामुक झाली. ब्लॅकआउट होण्यापूर्वी देखील कलवंतांनी अनेकदा हालचाली केल्या. यात सर्वात मोठा अडथळा ठरला तो पार्श्वसंगीताचा. प्रसंग आणि अचूक पार्श्वसंगीताचा काही ताळमेळच बसेनासा झाला. या चुकणाऱ्या टायमिंगमुळे कलावंतांना अभिनय करण्यास देखील मोठी अडचण निर्माण झाली आणि त्यातून रसभंग होत होता. पार्श्वसंगीत देताना ऑपरेटरकडे एलईडी लॅम्पसुद्धा जवळ नव्हता. त्यामुळे ऑपरेटरला अंधुक लॅपटॉपच्या प्रकाशात स्क्रिप्ट वाचून संगीत द्यावे लागत होतं हे दिसून आलं. विशेष म्हणजे पहिला अंक झाल्यावर दुसऱ्या अंकातही या अडचणीवर मात करण्याचे कुठलेही प्रयत्न झाले नाही हे अधिक खेदजनक होते. तिसऱ्या प्रसंगात चुकीच्या ट्रॅकमुळे कलावंतांना मध्येच संवाद सोडावा लागला आणि पुढे ब्लॅकआऊट झाले. 

नाटकातील कथानक अनेक शतके जुने आहे, मात्र, तुळशीला शापित हार आणि भेटवस्तू घेऊन जाण्याच्या प्रसंगात चक्क प्लास्टिक पॅकिंग दाखवली गेली. मात्र तरीही गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीचे सादरीकरण हे अधिक सरस ठरले.

-अमित शंकर वेल्हेकर



नाटक : विठू-रखुमाय 
लेखक : रत्नाकर मतकरी
दिग्दर्शक : प्रशांत गोडे
संगीत : हिमांशू आदे
नेपथ्य : अशोक गुल्हाने
प्रकाशयोजना : अशोक कार्लेकर
 वेशभूषा : प्रियंका गोडे
रंगभूषा-वेशभूषा : शालीग्रामजी शेटे, ज्ञानेश्वर सोनटक्के, प्रियंका गोडे
भूमिका : अशोक गुल्हाने, शुभदा रणधिर, स्वामीनी कुळकर्णी, प्रशांत गोडे, सतीश ईसाळकर, महेंद्र गुल्हाने, बेबी शेवतकर, लिना आदे, संदीप मिसळे, अश्विन मिरासे, रवि शेंडे, नितेश ललित, योगेश शेटे आणि इतर.

Post a Comment

0 Comments