वाहतूक पोलिसांचा प्रताप आणि प्रश्नांकडे डोळेझाक
आपली डोकेदुखी कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी शहरातील वर्दळीच्या ठिकाणी लागलेल्या सिग्नलवरील सर्व टायमर बंद करून टाकले. परिवहन मंत्रालयाने वाहतूक सुरळीत करण्यासाठी सुरू केलेल्या नियमांना चंद्रपूर वाहतूक पोलिसांनी केराची टोपली दाखवली आहे. याबाबतची बातमी safarnamafm ने प्रकाशझोतात आणली होती. याबाबत वारंवार संपर्क करूनही वाहतूक पोलीस विभागाने अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांची राज्य महामार्गावर 'ओला' कंपनीने केलेल्या अतिक्रमाणाबाबत बाजू जाणून घेण्यास वारंवार संपर्क करण्यात आला, मात्र यावेळी देखील त्यांनी कुठलाच प्रतिसाद दिला नाही. मात्र त्यांनी प्रतिक्रिया न दिल्याने वाहतुकीच्या समस्या कमी होणार नाहीत आणि या विभागाच्या निष्क्रिय भूमिकेमुळे शहरात जिल्ह्यात निर्माण झालेल्या समस्या safarnamafm सातत्याने उजागर करत राहणार आहे. (वाहतुकीची कुठलीही समस्या असल्यास वाचक safarnamafm@gmail.com येथे आपली समस्या पाठवू शकता)
यात चंद्रपूर महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग देखील कमी नाही. या विभागाकडून छोटे दुकानदार, अस्थायी दुकाने यावर कायदा आणि बळाचा वापर करून कारवाई केली जाते. या विभागातील कर्मचारी दमदाटी करून सर्व साहित्य जप्त करून नेतात मात्र बड्या लोकांच्या अतिक्रमाणाकडे मनपाचा अतिक्रमण विभाग सोयीस्कर दुर्लक्ष करतो असे चित्र आहे. याबाबत अतिक्रमण विभागाचे सुरक्षा अधिकारी राहुल पंचबुद्धे यांच्याशी संपर्क केला असता. त्यांना ओला शोरूम नेमके कुठे आहे यांची माहिती नसल्याचे सांगितले. सोबत प्रत्येक प्रभागात असे अतिक्रमण प्रतिबंधक पथक असून सहायक आयुक्तांच्या मार्गदर्शनात ते कारवाई करत असल्याची माहिती दिली. मात्र 'ओला'ने केलेल्या अतिक्रमाणाबाबत आपण माहिती घेतो असल्याचे सांगितले.
नेमके पाणी कुठे मुरत आहे?
या संपूर्ण प्रकारातून नेमके पाणी कुठे मुरत आहे हे लक्षात येते. चंद्रपूर-नागपूर राज्य महामार्गावर नियम धाब्यावर बसवत मनपाने अनेकांना बांधकामाची परवानगी दिली. या बांधकामात पार्किंग तळमजल्यावर दाखवली जाते, वाहने मात्र मुख्य महामार्गावर ठेवली जात आहेत. या प्रकाराकडे मात्र वाहतूक पोलिस आणि अतिक्रमण विभागाकडून सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे.


0 Comments