चंद्रपूर शहर मुख्यतः गोंडकालीन किल्ल्याने वेढलेले आहे. येथील रस्त्यांची झालेली दुर्दशा, त्यावरील अतिक्रमण आणि वाहनांची वाढलेली संख्या यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी ही जवळपास नित्याची बाब झाली आहे. त्यात एखादी रॅली किंवा मोर्चा निघाल्यास अनेक तास ही वाहतूक कोंडी कायम असते. या समस्यांना तोंड देत असतानाच आता यात आणखी भर पडली आहे. वाहतूक पोलिसांनी शहरातील सर्व ट्रॅफिक सिग्नल असलेले टायमर बंद करून टाकले आहे. त्यामुळे सिग्नल सुरू व्हायला नेमका किती वेळ उरला आहे याचा थांगपत्ता वाहनधारकांना लागत नाही.
कोणत्याही क्षणी ग्रीन सिग्नल सुरू होऊ शकतो या प्रतीक्षेत वाहनधारक आपली वाहने सुरूच ठेवत आहेत. यातून अधिक ध्वनी- वायू प्रदूषण आणि वाहतुकीची कोंडी वाढत चालली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. वास्तविक ज्या ठिकाणी सिग्नलवर वाहतुकीचा भार अधिक आहे तेथील वाहतुकीचा ओघ सुरळीत राहावा, अपघात होऊ नये या सुविधेसाठी टायमर यंत्रणा लावण्यात आली. देशातील सर्व मोठ्या शहरात ही व्यवस्था आहे. ज्या सिग्नलवर वाहने अधिक असतात तिथे ज्यादा वेळ असलेला टायमर जिथे कमी आहे तिथे काही सेकंदांचा टायमर लावला जातो. महानगरपालिका असलेल्या चंद्रपुरात देखील ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. बापट नगर चौक ते गिरणार चौक आणि प्रियदर्शनी चौक ते बंगाली कॅम्प चौक अशा सर्व ठिकाणी ही टायमरची यंत्रणा सुरू होती. मात्र वाहतुक पोलिसांनी आपली डोकेदुखी कमी करण्यासाठी ही टायमर यंत्रणाच बंद केली आहे. जी यंत्रणा रस्ता सुरक्षेसाठी शासनाने नियमित केली आहे त्यालाच वाहतूक पोलिसांनी हरताळ फासल्याचे चित्र चंद्रपुरात बघायला मिळत आहे.
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
गेल्या अनेक महिन्यांपासून शहरातील सर्व टायमर बंद असताना याची दखल मात्र अद्याप कुठल्याही लोकप्रतिनिधींनी घेतलेली नाही. हे लोकप्रतिनिधी बड्या गाड्यात फिरतात, त्यांचा ताफा शहरातून जातो मात्र सामान्य माणसाला दररोज टायमर नसलेल्या सिग्नलवरून जाताना काय त्रास होतो हे जाणून घेण्याची तसदी अद्याप कोणी घेतली नाही. त्यामुळे 'चलता है चलने दो' या तत्वावर शहरातील वाहतूक व्यवस्था सुरू आहे.
पोलीस निरीक्षकांचा प्रतिसाद नाही
याबाबत वाहतूक पोलीस विभागाची बाजू जाणून घेण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याचे वाहतूक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळू शकला नाही.


0 Comments