चंद्रपूर : पालन करणाऱ्यांचे संरक्षण आणि पायमल्ली करणाऱ्यांना दंड यासाठी वाहतुकीचे नियम आहेत. वाहतूक विभागातील अनेक कर्मचारी हे कर्तव्य चोखपणे बजावत असतात, मात्र काही कर्मचारी याच कायद्याचा धाक दाखवून सामान्य वाहनधारकांकडून वसुलीही करतात. असे अनेक प्रकार सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आले आहेत. अशा मोजक्या भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे संपूर्ण विभागाची नाहक बदनामी होते. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चंद्रपूरमध्ये कर्तव्यावर असलेले दोन कर्मचारी आपली हद्द सोडून चक्क गडचांदूर येथे वसुली करत असल्याचा हा प्रकार आहे. असे घडले असल्यास ही अत्यंत गंभीर बाब आहे. वाहतूक विभागाने याची सखोल चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र, याबाबत विचारणा करण्यासाठी वाहतूक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांना संपर्क केला असता त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.
काय आहे हा धक्कादायक प्रकार
मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही महिन्यांपासून चंद्रपूर शहरात तैनात असलेले काही वाहतूक कर्मचारी गडचांदूर पोलीस ठाणे क्षेत्रात जाऊन कारवाई करीत होते. वास्तविक ज्या कर्मचाऱ्याची जिथे तैनाती आहे त्याच हद्दीत त्याला कारवाई करण्याचा अधिकार आहे. मात्र हा नियम धाब्यावर बसवून हा प्रकार सुरू होता. गडचांदूर-चंद्रपूर महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. याचाच फायदा घेऊन भोयगाव पुलाच्या समोर जाऊन अवैध वसुलीची ही मोहीम चालवली जात होती. येथे वाहनधारकांना थांबवून त्यांना नियम आणि दंडाचा धाक दाखवला जायचा. नियमानुसार दंडात्मक कारवाई झाल्यास हरकत नव्हती. कारण हा दंड शासनाच्या तिजोरीत जाणार होता, मात्र ही रक्कम थेट या भ्रष्ट कर्मचाऱ्यांच्या खिशात जात होती. यात शेवटी तडजोडीची रक्कम ठरवली जायची. विशेष म्हणजे कोणीही सुटता कामा नये यासाठी ऑनलाइन पेमेंटचीही सुविधा होती. ज्यांना ऑनलाइन करायचे आहे अशांना रस्त्यावर असलेल्या एका फळविक्रेत्याचा क्यूआर कोड दिला जायचा. तिथे पेमेंट केल्यावरच त्याची सुटका होत असे. आठवडयातील एक दिवस या प्रमाणे अनेक ठिकाणी वसुली केली जायची. एका दिवसात हजारोंचा गल्ला हे कर्मचारी जमवायचे. कायदा आणि वाहतूक पोलीस विभागाचा धाक अजूनही सामान्य लोकांमध्ये आहे त्यामुळे या भ्रष्ट कर्मचाऱ्यांचं चांगलच फोफावत होतं. भोयगाव, वेंढली आणि अशा अनेक ठिकाणी हे खिसेभरू मोहीम सुरू होती.
असा आला प्रकार समोर
गेल्या अनेक महिन्यांपासून या वाहतूक पालिसांची वसुलीची मोहीम बिनदिक्कत सुरू होती. हा प्रकार गडचांदूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या एका जागरूक पोलीस पाटलाच्या निदर्शनास आला. पोलीस पाटील असल्याने तो साधी चौकशी करायला तिथे गेला मात्र त्याला बघून हे कर्मचारी चांगलेच भांबावून गेले. या प्रकार समोर येऊ नये म्हणून त्यांनी या पोलीस पाटलालाचं दमदाटी करायला सुरुवात केली. "जर अधिकचा शहाणपणा करशील तर पोलीस पाटील पदावरून काढून टाकू" अशी धमकी देत त्यांनी तेथून काढता पाय घेतला. नंतर हे कर्मचारी आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत नसून हे वाहतूक कर्मचारी चंद्रपूर येथील असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. चंद्रपूरातून काही कर्मचारी आपल्या पदाचा दुरूपयोग करून अन्य ठिकाणी सामान्य लोकांकडून वसुली करीत असल्याचा प्रकार समोर आला. मात्र हे बिंग फुटल्याने गेल्या काही महिन्यांपासून भोयगाव आणि वेंढली परिसरात ही वसुली बंद झाली आहे.
"होय असा प्रकार घडला", पोलीस पाटलाचा दुजोरा
ज्याच्या सोबत हा प्रकार घडला त्या पोलीस पाटीलाशी संपर्क केला असता त्यांनी याला दुजोरा दिला. या घटनेनंतर हा प्रकार बंद झाला असेही सांगितले. हा प्रकार समोर आल्यानंतर बरेच पाणी पुलाखालून गेला आणि त्यावर पडदा टाकला गेला हे विशेष
प्रतिसाद न देणारे वाहतूक निरीक्षक प्रवीण पाटील
हा प्रकार अत्यंत धक्कादायक असून वाहतूक पोलीस विभागाच्या प्रतिमेला मालिन करणारा आहे. त्यामुळे याबाबत सखोल चौकशी होणे आवश्यक असून त्यात तथ्य आढळल्यास अशा भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर सक्तीची कारवाई होणे आवश्यक आहे. यामुळे वाहतूक पोलीस विभागाची प्रतिष्ठा आणि सामान्य लोकांचे हित जपले जाईल. याबाबतची प्रतिक्रिया घेण्यासाठी वाहतूक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. अधिकारीच निष्क्रिय प्रतिसाद देत असेल तर वाहतूक विभागाची नेमकी परिस्थिती काय आहे याची कल्पना करण्यासारखी आहे.
सामान्य माणसाने काय करावे
जर अशा प्रकारची कुठे कारवाई होत असल्यास सर्वसामान्य लोक घाबरून जातात, मात्र जागरूक नागरिक म्हणून सर्वप्रथम त्या कर्मचाऱ्यांचे नाव जाणून घेणे आवश्यक आहे. यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांकडे पॉज मशीन आहे का आणि ती सुरू आहे का याची शहानिशा करणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण या पॉज मशीनमध्ये जीपीएस तंत्रज्ञान आहे. जिथे चालन केल्या जाईल त्याचा संपूर्ण तपशील त्यात असतो. जिथे चालन झालं त्या ठिकाणापासून तुम्हाला दंड ठोठावणाऱ्या कर्मचाऱ्यासह दंडाचा तपशील सर्व माहिती त्यात असते. एटीएम कार्ड, क्यूआर कोड, ऑनलाइन पेमेंट मोड आणि नगदी अशी सर्व सुविधा त्यात असते. मात्र प्रत्येक कर्मचाऱ्याला कारवाई करण्याची हद्द दिली असते एखादा कर्मचारी आपली हद्द सोडून दुसऱ्या ठिकाणी ही मशीन वापरू शकत नाही. वाहतूक विभागाची कुठलीही कारवाई या पॉज मशीनमधून होणे आवश्यक आहे, मोबाईलने ती होऊ शकत नाही. जर ही मशीन बंद असल्याचे सांगण्यात आल्यास त्याला स्पष्ट नकार द्यावा आणि संबंधित घटनेचा व्हिडीओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड करून याची तक्रार वाहतूक विभागाकडे कारवाई. यामुळे असे गैरप्रकार थांबण्यास मदत होईल. मात्र शहानिशा केलेल्या सर्व गोष्टी बरोबर असतील तर मात्र अशा प्रामाणिक कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याची जबाबदारी सामान्य नागरिकाची आहे.
0 Comments