(स्पर्धेचे सर्व नाट्य समीक्षण वाचण्यासाठी home ऑप्शनवर क्लिक करावे)
नाट्य समीक्षण : प्रतिकार
दिशाहीन संहिता, पात्रांच्या माध्यमातून लेखकाने प्रत्येक आदर्शवादावर फिरून फिरून केलेले शब्दपाल्हाळ भाष्य, त्यातून गांभीर्य निसटत जाणारे मर्म, सपक प्रकाशयोजना आणि रेंगाळलेले सादरीकरण यामुळे जवळपास चांगला अभिनय असूनही हे नाट्य परिणामकारक ठरू शकले नाही.
जातीयवाद हे भारतीय समाजाचं अभिन्न असं जळजळीत वास्तव आहे. त्यातील थेट, छुपे, गोंडस या त्रिकोणी चौकटीच्या अगणित छटा आहेत. त्यातच भारतीय स्त्रियांना दुय्यम स्थान देणारी एक 'आचारसंहिता' आणि स्वतःच्या स्वार्थासाठी कुठल्याही वर्गात न मोडणारा कणाहिन वर्ग आहे. या अदृश्य सर्वव्यापी व्यवस्थेचा बळी जाणाऱ्या वर्गासाठी 'भारतीय संविधान' हाच सर्वात मोठा आधार आहे. हे नाटक ढोबळमानाने याच 'व्यवस्थेवर' भाष्य करते.
पण, गोष्ट कुठलीही असो, ती साचेबद्ध आणि सुसुत्रतेत बांधता यायला हवी, हीच खरी कला आणि हेच कलेचे सामर्थ्य आहे. या नाटकात हीच मोठी तफावत आहे.
'प्रतिकार' हे नाटकाचे नामककरण अनाकलनीय आहे. इथे कोण, केव्हा, कधी 'प्रतिकार' करतंय हे समजण्यापलीकडे आहे. इथे कोण प्रतिकार करतंय? पूर्वी आंबेडकरी चळवळीत काम करणारा आणि आता एका ठाणेदाराच्या घरी घरगडी म्हणून दास्य पत्करणारा शिपाई 'बाबासाहेब'?; शेवटचा प्रसंग वगळता आपल्या पितृसत्ताक नवऱ्याने "आत जा" म्हटल्यावर निमूटपणे आत जाणाऱ्या 'बाईसाहेब'?, की आपल्या स्वार्थासाठी हातमिळवणी करणारा पत्रकार-सामाजिक कार्यकर्ता 'धिवरे'? हे निश्चित सांगणे कठीण आहे. सांगायचंच झालं तर अखेरच्या प्रसंगावरून हा एका पीडित बापाचा, स्वार्थी राजकारण आणि जातीव्यवस्थेत पिचलेल्या दलित तरुणाचा आणि स्त्रीदास्याविरोधात उभ्या ठाकलेल्या स्त्रीचा 'प्रतिशोध' आहे. आणि त्याही खोलात जाऊन बघितल्यास हा केवळ एकाचाच प्रतिशोध आहे. कारण 'आपल्या नवऱ्याला ठार कर' असं ही स्त्री कधी म्हणत नाही. फक्त ठार झालेल्या नवऱ्याचे सत्य स्वीकारून ती पुढची भूमिका घेते. या प्रसंगातुन शंका निर्माण करणारे अनेक अन्वयार्थ निघतात. या खून प्रकरणात पुन्हा 'जागृत' झालेला बाबासाहेब देखील आपल्या 'बाईसाहेबांनी' दिलेल्या आज्ञाचेच पालन करतो, इच्छा असूनही तो दुसरी भूमिका घेऊ शकत नाही, मग बाबासाहेब नेमके कुठले जोखडदंड तोडतो?
जेव्हा की मारेकरी हा कायद्याच्या व्याख्येनुसार 'वेडा' आहे. वेडा व्यक्ती हा कायद्याच्या दृष्टीने खुनी होऊ शकत नाही आणि त्यामुळे या दोघांनी हा खून लपवला किंवा न लपवला तरीही त्याचा फारसा फरक पडत नाही. पण स्त्रीदास्याविरोधात भूमिका घेणारी महिला देखील आपल्या पतीचा खून झाल्यावर यासाठी वेगळे नाट्य रचते. मग अशी स्त्री या स्त्री दास्याविरोधात नेमका कोणता आदर्शवाद घेऊन समाजापुढे जाणार? की ही भूमिका केवळ तिच्या एकट्यापुरती मर्यादित आहे? असे बरेच प्रश्न कायम राहतात.
महत्वाच्या पात्रांचा आलेख हा सुस्पष्ट नाही, त्यांची कुठली ठाम भूमिका नाही. स्त्री दास्य आणि जातीवादी गुलामगिरी अमान्य असलेली स्त्री आपल्याच घरी पोलीस कर्मचाऱ्याला घरगडी म्हणून राबवून घेताना संकोच करत नाही, त्याही पुढे कर्मचाऱ्याने इस्त्री करताना आपली साडी जाळून टाकली याची तक्रार मात्र ती आपल्या नवऱ्याकडे करते. तर दुसरीकडे इस्त्रीचा प्रकार माहिती झाल्यावर त्याच्यानुसार समानतेवर श्रद्धा असलेल्या समविचारी 'बाईसाहेब' या स्त्रीला देखील शिपाई बाबासाहेब गुलामगिरी लादणाऱ्यांच्या श्रेणीत टाकतो. असे बरेच प्रश्न आहेत.
शिपाई बाबासाहेबाच्या भूमिकेला सुरज उमाटे यांनी न्याय दिला. बाईसाहेब, धिवरे या पात्रांचा अभिनय देखील आश्वासक होता. रोशनसिंह बघेल यांनी वेड्याची भूमिका ही सुरेख वठवली. पण शिपाई बोरसे म्हणून राजू आवळे, नीलिमा चरडे (धुरपदा), देवेंद्र मगरे (रामा कुलथे), प्रज्वल निखार (शंकर) यांच्या प्रवेशाने एकसुरी झालेल्या सादरीकरणात प्राण फुंकला. आवळे यांचा भारदस्त जरबी आवाज, आश्वासक देहबोली यामुळे पोलिसी खाक्या जिवंत झाला. नीलिमा चरडे यांनी एका छोट्याशा वाटणाऱ्या भूमिकेचं सोनं केलं. ही म्हातारी साकारणे सोप्पे नव्हते. पण स्वतः दिग्दर्शक आणि महत्वाच्या भूमिकेत असलेले बबन राखुंडे यांचा अपीअरन्स चांगला असूनही निराशा केली. संवादातील पहिले वाक्य बोलल्यानंतर दुसरे वाक्य नेमके काय हे ऐकायला कठीण झाले. पहिला अंक तर यातच गेला. अनेकदा फम्बलिंग होत होती. पहिल्या प्रसंगात फोन वाजत आहे मात्र तो उचलताना चुकामुक झाली. फ्रीज उघडून बिअर घेताना देखील सावधानता बाळगली गेली नाही, सर्वात मोठी गोष्ट शेवटच्या प्रसंगी त्यांनी बंदुकीचा नकळत चाप ओढला. नाटकातील कथा ही जवळपास 20-25 वर्षे जुनी असेल. इथे त्यांचे पात्र 'ओल्ड मंक' ही रम पीत असतो आणि ते पीत असताना ही दारू एक हजाराची म्हणजे इतकी महाग वगैरे आहे असे सांगितल्या जाते. मुळात या दारूची 25 वर्षांनंतर आजची किंमत देखील एक हजाराच्या खाली आहे. धुरपदाच्या कुटुंबाला पोलीस अमानवीय मारहाण करताना देखील कुठलीही विशेष प्रकाश योजना वापरली नाही. रंगभूषा, वेषभूषा ही कथानकाला साजेशी अशी होती. विशेषतः 'वेड्याची' जे खूप काही सांगून जाते.
-अमित वेल्हेकर
नाटक : प्रतिकार
दिग्दर्शक : बबन राखुंडे
नेपथ्य : रवींद्र वांढरे, अथर्व तगडमवार
प्रकाश योजना : अथर्व गुहे
संगीत : श्रीनिवास मूळावार
रंगभूषा - वेषभूषा : प्रियंका ढोक
निर्माता : अक्षय राखुंडे
भूमिका : बबन राखुंडे, विशाखा देशपांडे, सुरज उमाटे, वैशाख रामटेके, राजू आवळे, नीलिमा चरडे, देवेंद्र मगरे, प्रज्वल निखार, रोशनसिंग बघेल


0 Comments