64 वी हौशी राज्य नाट्य स्पर्धा, चंद्रपूर; नाट्य समीक्षण : 'थ्री नॉट थ्री'

(स्पर्धेचे सर्व नाट्य समीक्षण वाचण्यासाठी home ऑप्शनवर क्लिक करावे)
नाट्य समीक्षण : 'थ्री नॉट थ्री'

साहिर लुधियानवी म्हणतात "ले दे के अपने पास फ़क़त इक नज़र तो है। क्यूँ देखें ज़िंदगी को किसी की नज़र से हम"

Three
हे अगदी खरं आहे. कुणाकडून उसनं घेतलेलं गाणं कशाला गायचं? आपलं गाणं आपण स्वतःच व्हायचं. आपली माती काही वांझोटी नाही, सभोवतालच्या जगावर आत्मचिंतनाच्या विचारांचं बीज टाकलं तर बघता बघता कलेचा वटवृक्ष तयार व्हायला वेळ लागणार नाही, मग का  राज्य नाट्य स्पर्धेत नेहमी मुंबई-पुणे नाटकांच्या संहितांची भाऊगर्दी का असते?

तीच घासून घासून स्वच्छ केलेली तबकडी पुन्हा पुन्हा का रेकॉर्डवर लावायची? हा प्रश्न संहिता निवडणाऱ्या हौशी नाट्य संस्थांना कधी पडतो का हे सांगणे कठीण आहे. आपलं भावविश्व हे फार मोठं आणि समृद्ध आहे, शिवाय ते अस्पर्शीत आहे. जरा नजर फिरवली तर असंख्य विषय आहेत. यावर गांभीर्याने विचार व्हायला हवा. पण त्या ऐवजी सरधोपटपणे मुंबई-पुणे-मुंबईचा नाट्यमय प्रवास करून धन्यता मानली जाते. कला ही काही पुण्या-मुंबईची मक्तेदारी नाही. ती कुठेही फुलू शकते. अर्थात त्याला लेखन कौशल्याचे खत, आकलनक्षमतेचे पाणी आणि सृजनशीलतेचा सूर्यप्रकाश मिळाला तर. जवळपास 20 वर्षे झालीत स्मार्टफोन आल्याला. नवनव्या तंत्रज्ञानाने संपूर्ण जग बदलून गेलंय पण मुंबई-पुण्याच्या संहितांच्या गळ्यात कालबाह्य झालेल्या टेलिफोनचा वायर अजूनही अडकून आहे. अपवाद वगळता नाट्यप्रवाहातील हा फास कोणी सोडवला नाही, सोडवता आला नाही. सांगायला अनेक गोष्टी आहेत पण एकंदर परिस्थिती समजण्यासाठी हे एक उदाहरण पुरेसे आहे. 

Three
'थ्री नॉट थ्री' नाटकाचा एक प्रसंग


'थ्री नॉट थ्री' हे नाटक केवळ या मातीतलं आहे म्हणून ते वेगळं ठरतं असं नाही तर त्यातील ज्वलंत वास्तव हे नाटक स्पष्ट, निर्भीड आणि ठसठशीतपणे मांडतं म्हणून. एक सामान्य आदिवासी वर्ग नक्षलवाद विरुद्ध सरकारी व्यवस्थेच्या लढाईत कसा बळी ठरला जातो, हे या नाटकाचं मध्यवर्ती कथानक. पण बहुदा अशी नाटकं संतुलित करण्याच्या मापदंडात अडकली जातात.  रक्तपाती नक्षलवादाचा विरोध करताना ते सरकारी व्यवस्थेचे नाट्यमय महिमंडन केले जाते. खरं तर संतुलन करण्याचा प्रयोग हाच अशा नाटकाला एकांगी बनवतो. एका बाजूचा विरोध म्हणजे दुसऱ्याचं समर्थन करणे असा होत नाही. तर एका बाजूचा विरोध करूनही दुसऱ्या बाजूला प्रश्न विचारने हीच खरी लोकशाही. सरकारची बाजू म्हणजे देशाची बाजू असा सरधोपट अर्थ होत नाही तर संविधानाने दिलेल्या मौलिक अधिकारांच्या आधारावर अन्याय्य व्यवस्थेला जाब विचारणे हे खरे भारतीयत्व. 'थ्री नॉट थ्री' हे नाटक नक्षलवादाचा सडेतोड विरोध करतेच, मात्र आपल्या मुळावर उठलेल्या व्यवस्थेला देखील तेवढ्याच ताकदीने जाब विचारते. 

पोलिस आणि नक्षलवादी संघर्षाच्या संवेदनशील भागात पत्नी, मुलगा मुली सोबत राहणारा सटबा. या दोन्ही बाजूंच्या संघर्षाचा बळी ठरत जाणारे त्याचे आयुष्य. नक्षलवादी आणि पोलिसांच्या झालेल्या चकमकीत मुलाला लागलेली गोळी. या अन्यायाविरुद्ध मुलाने हातात उचललेली बंदूक. नक्षलवादी आणि पोलिसांना आपल्या फायद्यासाठी वापरून स्वतःच्याच जनतेचे शोषण करणारा नेता. आणि यात पूर्णतः उध्वस्त होणारे कुटुंब अशी या नाटकाची थोडक्यात मांडणी आहे. या नाटकाचा प्रयोग देखील तेवढ्याच ताकदीने सादर करण्यात आला. त्यातील दाहकता, वेदना, मर्म हे ठळकपणे मांडले गेले. सशक्त अभिनय ही या नाट्यप्रयोगाची सर्वात सशक्त बाजू. सर्व कलावंतांनी आपापल्या पात्रांत प्राण फुंकला. स्वतः दिग्दर्शक आणि मुख्य भूमिकेत असलेले अविश बन्सोड यांनी या नाटकाला भावनिक उंची गाठून दिली. एक समजूतदार बाप आणि पती, हिंसाचार आणि नक्षलवाद नाकारणारा आणि दोन्ही व्यवस्थेत पिचून गेलेला हतबल बाप, हा अभिनय प्रवास त्यांनी सुरेख मांडला. विशेषतः दुसऱ्य अंकात स्वगत प्रसंगात त्यांच्या डोळ्यातुन अश्रू ओघळले. प्रथमेश पडलकर यांनी एका कडव्या नक्षल्याची भूमिका ताकदीने वठवली. धिप्पाड देहयष्टी, आश्वासन देहबोली आणि भारदस्त पट्टीचा आवाज यामुळे या पात्राची परिणामकता साधली गेली. छोट्याश्या वाटणाऱ्या बाळासाहेबाच्या भूमिकेत संजय माटे यांनी चांगल्या रंगछटा उधळल्या. नाटकात एक धूर्त राजकारण्याची प्रतिकात्मक मांडणी होती त्याची पूर्तता त्यांनी केली. 

मात्र तरीही पाठांतर कमी पडले. अनेक पात्र नेमक्या वेळेवर संवाद विसरत होते. त्यामुळे चांगला अभिनय आणि संवादशैली असूनही रसभंग होत होता. प्रकाशयोजना ही तोकडी पडली. झोपडीच्या समोरील धूसर प्रकाशात अनेकांचे चेहरे स्पष्ट दिसत नव्हते. संगीत आणि रंगभूषा नाटकाच्या संहितेशी एकरूप झाले. नेपथ्यात टुमदार झोपडी, त्यावरील अणुकीचीदार बांबूचा त्रिकोण, वेली, नक्षीकला, तिसऱ्या अंकात बेचिराख झालेली जागा हे सर्व परणीकारक होतं. झोपडीच्या आत निळा पडदा लावण्यात आला, त्यात आणखी काही वस्तू दाखवल्या असत्या तर ते अधिक वास्तविक वाटलं असतं. कंदिलाचा उजेड प्रकाशयोजनेतून दाखवण्याचा चांगला प्रयत्न होता. यातला सर्वात प्रभावी इफेक्ट म्हणजे हतबल झालेले दाम्पत्य आणि त्यांच्या मागे असलेल्या जंगलाला संपूर्ण व्यापून टाकणारी त्यांची सावली, हा प्रसंग या नाटकाचे मर्म उभे सांगतो. नेपथ्य बरोबर न लावल्याने मागून कलावंतांची येजा दिसून पडत होती. आदिवासी युवकाची भूमिका करताना 'ट्रेंडी' केशरचना ही पात्राच्या विसंगत होती. चौथ्या प्रसंगात बंदूक आणि आवाजाची टायमिंग चुकली. इथे आदिवासी बोलीभाषेचा त्रोटक वापर करण्यात आला, तो वाढवता आला असता. तो सुरुवातीला केला असता तर अधिक प्रभावी ठरले असते. महिला पत्रकार आल्या आल्या पूर्ण स्थिती जाणून न घेता इतकी भावनिक का होऊन जाते? हे पात्र पत्रकार कमी आणि सामाजिक कार्यकर्ता अधिक वाटायला लागते. 

सादरीकरणाची सर्वात चांगली बाजू म्हणजे कलावंतांनी संवादाच्या माध्यमातून भावनांची केलेली देवाणघेवाण. एका पात्राकडून होणारा संवाद त्या मधात दुसऱ्या पात्राने अलगदपणे येऊ दिलेले भाव यातून हे नाटक अधिक परिणामकारक झाले.

शेवटी. नाटकातील काही सवांद हे अत्यंत प्रभावी आणि अंतर्मुख करणारे आहेत. "आपण माणूस आहोत म्हणून अशा परिस्थितीतही जंगलात राहतोय, पक्षी असतो तर कधीच उडून गेलो असतो", "(बहीण आपल्या भावाला) तूला काही झाले असते तर मी डोहात बुडून जीव दिला असता, (भाऊ) अगं याच डोहातून तरुन तर आपल्याला जायचं आहे", "इथे वाघ मारायला बंदी, पण माणूस मारायची मुभा आहे" असे अनेक संवाद यात जीव ओततात. 

'थ्री नॉट थ्री' म्हणजे 303. आदिवासी देखील यातील शून्याप्रमाणे आहे. एका बाजूला नक्षलवाद आणि दुसऱ्या बाजूला अन्यायी व्यवस्था. या शब्दप्रयोगाचा वापर कुठेतरी करता आला असता.

-अमित वेल्हेकर


नाटक : थ्री नॉट थ्री
लेखक : दशरथ मडावी
दिग्दर्शक : अविष बनसोड
नेपथ्य : हेमंत चिंचघाटे
संगीत : सुरज राठोड
प्रकाश योजना : अशोक कार्लेकर
वेशभूषा : अरुणाताई
रंगमंच व्यवस्था : योगेश, प्रणय, गणेश, अशोक, मंगेश
कलावंत : अविष बनसोड, चारुलता पावशेरकर, संजय माटे, रमेश मडावी, प्रणय करमणकर, दिव्या भगत, प्रथमेश पडलकर, प्रा. काशिनाथ लाहोर.

Post a Comment

0 Comments