नाट्य परीक्षण : देहभान
(स्पर्धेचे सर्व नाट्य समीक्षण वाचण्यासाठी home ऑप्शनवर क्लिक करावे)
साहित्य क्षेत्र हे असे एक क्षेत्र आहे ज्यात लेखक हा थेट समाजाशी संवाद साधतो. त्याला नेमकं काय सांगायचं आहे याचे सर्वस्वी स्वातंत्र्य लेखकाचे असते. हे साहित्य किती रंजक, कल्पक, नाविन्यपूर्ण, निर्भीड किंवा परखड आहे याची सचोटी समाज आपापल्या पद्धतीने लावत असतो. नाटक देखील याच अभिव्यक्तीचे अभिन्न अंग आहे.
'देहभान' या नाटकाच्या माध्यमातून लेखकाने 'लैंगिक जागरूकता' या संवेदनशील विषयवार भाष्य केले आहे. समाजात खोलवर घर करून बसलेले लैंगिकतेबद्दलचे भ्रम, त्याचा सामाजिक स्वास्थ्यावर झालेला विपरित परीणाम, लैंगिक जागरूकतेचा अभाव आणि या साक्षरतेची निकड या मध्यवर्ती विषयाच्या चौकटीत नाटक रचले गेले आहे. यातून एक साचेबद्ध नाट्य तयार झाले खरे पण स्वतःच ठरवून टाकलेल्या नैतिक-अनैतिकतेच्या कृष्णधवल द्वंद्वात या विषयाची आर्तता बोथट झाली. विशेषतः स्त्री पात्रांच्या माध्यमातून अवाजवीपणे या विषयाची जबाबदारी त्यांच्यावर लादली गेली. भंग न झालेले कौमार्य हे स्त्री पात्राच्या 'नायकत्वाचे' परिमाण होऊ शकते काय? कलात्मक स्वातंत्र्य किंवा सामाजिक वास्तवाच्या परिभाषेत बसवून दोन महत्वाच्या स्त्री पात्रांना त्यांच्या नैसर्गिक लैंगिक गरजेपासून आजीवन अलिप्त ठेवण्याची सृजनता ही अन्यायकारक आहे. संपूर्ण नाटकांत हे दोन्ही स्त्री पात्र आपल्या लैंगिक गरजांबाबत स्पष्टपणे भाष्य करत नाहीत, या विषयाचा अभिन्न भाग असलेल्या लैंगिक उपकरणांचा उल्लेख करत नाही, त्याचा संदर्भ कुठे देत नाहीत, ही बाब लैंगिक शिक्षण जागरूकतेच्या मध्यवर्ती संकल्पनेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करते.
ज्या 'लैंगिक शिक्षणावर' हे नाटक भाष्य करते त्याचे पहिले आणि खरे क्रांतिकारक हे रघुनाथ धोंडो कर्वे आणि मालती कर्वे आहेत. कर्वे दाम्पत्याने 1921 मध्ये संतती नियमन सल्ला केंद्र आणि साधनांची विक्री करण्याचे भारतातील पहिले केंद्र सुरू केले. सामाजिक बहिष्कार पत्करून त्यांनी केलेला सामाजिक स्वास्थ्याचा लढा हा असामान्य आहे. इतके मोठे ज्वलंत उदाहरण समोर असताना 1952 आणि 2002 या काळाचे नाट्यांकनात त्यांच्या कार्याचा साधा उहापोह देखील केला गेला नाही.
'थ्री नॉट थ्री' च्या नाट्य समीक्षणात कलात्मक संतुलनाविषयी भाष्य केले गेले होते. हा अनावश्यक संतुलनाचा प्रयोगच नाटकाच्या मुळाला कसा असंतुलित करतो यावर प्रकाश टाकला होता. हीच बाजू 'देहभान' नाटक अधोरेखित करते.
कोणी पसंत पडला नाही म्हणत आजीवन अविवाहित राहणारी प्राध्यापिका दमयंती, सामाजिक कार्याच्या
एका प्रतिग्येसाठी आपले वैवाहिक जीवनाचे स्वप्न स्वाहा करणारी वसुधा ह्या आजीवन शारीरिक संबंधांपासून दूर राहतात ही बाब नाट्यमय अधिक पण त्यातील 'बोल्ड ह्युमनिस्टिक अप्रोच' कमी करते.
लैंगिक शिक्षणाचे दारिद्रय काल, आज आणि आत्ता यावर हे नाटक प्रकाश टाकते. सन 1952, 2002 आणि आत्ता नाटक बघणारा प्रेक्षक अशी ही त्रिमिती आहे. या दोन काळाच्या आधारे आत्ताची गरज यावर नाट्य दिशानिर्देश करते. काळ बदलला, माणसे बदली समाजाची मानसिकता मात्र तीच आहे याचे प्रतिनिधीक सादरीकरण यात केले आहे.
नाटकाचे सादरीकरण हे उत्तम आणि प्रभावी झाले. सुस्पष्ट भाषा, नेटके पाठांतर, दोन काळातील संलग्नतापूर्ण स्थित्यंतर, सुसज्ज नेपथ्य, प्रकाश योजना आणि नाट्यपूरक अभिनयाने योग्य परिणाम साधला गेला. दमयंती/मावशी, साधना/वसुधा, सोहनी/दादासाहेब, मनोज/आबासाहेब यांनी आपापल्या भूमिकांना न्याय दिला. शिल्पा/विद्याच्या भूमिकेत शाभंवी पांडे हिने वेगळी छाप सोडली. चंचल, चुणूकदार पण संवेदनशील व्यक्तिमत्वाच्या दोन्ही पात्रांना तिने जिवंत केले. अचूक संवादफेक, आश्वासक देहबोली आणि रंगमंचावरील तिचा मुक्तवावर यामुळे नाटकाला गती मिळाली. ग्रामीण भागाचा टच असणाऱ्या रांगड्या मनोजच्या भूमीकेत श्रेयस गुल्हानेने नाटकात गंमत आणली. मास्तरची भूमिका यात अत्यंत महत्वाची आहे. नाटकाच्या थेटपणाचे हे पात्र प्रभावी माध्यम आहे.
ज्ञानेश गटकर यांचे यात प्रयत्न कमी पडल्याचे जाणवले. त्यांच्या संवादातून या पात्राची दाहकता, त्याच्या आत धगधगत असलेली अस्वस्थता, त्याचा स्पष्टवक्तेपणा याचा भाव परिणामकारकपणे साधला गेला नाही.
1950 च्या दशकातील वेशभूषा ही आश्वासक होती. मात्र 23 वर्षांपूर्वीच्या म्हणजे 2002 च्या वेषभूषेची कल्पना यावी असा परिणाम साधला गेला नाही. त्यात अंदाजे 70-80 च्या दशकातील पद्मनाथच्या वेशभूषेवर देखील फारसे काम झाले नाही. चेक्सचा शर्ट आणि जीन्स यामुळे काळाचा फरक जाणवला नाही. प्रकाशयोजना ही सुनियोजित होती. काळाचा बदल यात राखला गेला. वसुधा आणि मास्तर यांचा प्रेमप्रसंग, कडकडणारऱ्या विजेचा इफेक्ट हा सुरेख रंगवल्या गेला. मात्र 1950 च्या पावसाळी रात्रीचा प्रसंग उभा करताना थेट पात्रांच्या डोक्यावर केलेल्या लाईट सेटिंगमुळे कलावंतांच्या चेहऱ्यावर सावली पडत होती आणि त्यांच्या भावमुद्रा स्पष्ट दिसत नव्हत्या.
सादरीकरणादरम्यान अनेक चुका झाल्या. प्राध्यापिका दमयंतीच्या कॅबिनमध्ये साहित्यातील इतर ग्रंथाऐवजी वकिलाच्या कार्यालयात असणाऱ्या ग्रंथांची प्रचिती येत होती, 1950 च्या पावसाळी रात्री येणाऱ्या पात्रांत एकही जण ओला होऊन येत नाही, तसा कुठला संदर्भ नाही, याच प्रसंगात दार आधी आत ओढलं जाते आणि नंतर बाहेर, विद्या कचरा गोळा करून फेकताना ते पात्र उलटं झालं होतं, मनोज किल्ल्या द्यायला आलो होतो असं सांगतो पण तो केवळ एकच किल्ली हाती देतो, प्रकाश जाण्यापूर्वीच एनेकांनी हालचाली केल्या, पद्मनाथ तळपायाने सिगारेट विझवतो, पद्मनाथ याने दिलेली पेंटिंग वसुधाने उलटी पकडली, तालमीच्या ठिकाणी टेबलावरून कापड पडला जो पुढच्या प्रसंगात उचलला गेला नाही, मध्यंतरापूर्वीच्या प्रसंगात स्पॉटवर मोठी चुकामुक झाली. दमयंती आणि पद्मनाथ यांच्यात असलेली केमिस्ट्री आणखी सहज करता आली असती. प्रत्येक कलावंताच्या दोन वेगवेगळ्या भूमिका असल्याने त्यातील वैशिष्ट्य कायम ठेवण्याचे मोठे आव्हान कलावंतांसमोर होते, त्याला त्यांनी न्याय दिला. दमयंती आणि वसुधा यांचा समोरासमोर उभे ठाकण्याचा प्रसंग उत्तमरीत्या वठवल्या गेला. तीन काळाची चौकट नेपथ्यातुन चपखलपणे बसविण्यात आली. रंगमंचाचा पुरेपूर आणि नियंत्रित वापर कलावंतांकडून केला गेला. वैश्यालयात जाऊन 12-13 वर्षांच्या मुलींचा उपभोग घेण्याचा संदर्भ, त्या विषयाशी संबंधित दोन्ही प्रसंग आक्षेपार्ह वाटले. हीच परिणामकारकता निव्वळ वैश्यालयाचा संदर्भ देऊनही साधता आली असती.
-अमित वेल्हेकर
नाटक : देहभान
लेखक : अभिराम भडकमकर
दिग्दर्शक : अनिकेत बेगडे, राजेंद्र टोंगो
नेपथ्य : सतीश पवार
प्रकाश योजना : अभिषेक श्रीकुंडवार
वेशभूषा/रंगभूषा : शैला सज्जनवार, ऐश्वर्या बेगडे
संगीत : अपर्णा शेलार, शीतल बोंद्रे
कलावंत : शिल्पा बेगडे, शांभवी पांडे, ज्ञानेश्वर गटकर, अनिकेत बेगडे, श्रेयस गुल्हाने, राजेंद्र टोंगो, प्रिया कांडुरवार


0 Comments