नाट्य समीक्षण : चितपट
(स्पर्धेचे सर्व नाट्य समीक्षण वाचण्यासाठी वरील home ऑप्शनवर क्लिक करावे)
कुठलीही कला ही संगीताशिवाय निर्माण होऊ शकत नाही. जगातील प्रत्येक कला आणि कलाकृतीचे उगमस्थान हे संगीत आहे. संगीत म्हणजे कानांनी ऐकू येणारा स्वर, लय आणि तालबद्ध ध्वनी नव्हे. तर आपल्या चेतनेतून उत्पन्न होणाऱ्या लहरी ज्याला आपण फ्रिक्वेन्सी, वेवलेंग्थ, वायब्रेशन, वाईब वगैरे म्हणतो. कलावंताच्या चित्तरूपी चिरशांत तळ्यात उठणाऱ्या याच लहरी सृजनतेचा किनारा गाठून देतात. त्यावरून जे वाहून येतं ती 'कलाकृती'. त्यामुळेच आपल्या हातून नेमकं काय घडणार आहे याची कुठलीच कल्पना कलावंताला ती कलाकृती पूर्ण होईपर्यंत येऊ शकत नाही. फक्त या लहरींवर आरूढ होऊन ती जिथे घेऊन जाते त्याचा धांडोळा घेत जाणे हाच असतो कलात्मकतेचा प्रवास.
चित्रकार, लेखक, संगीतकार, मूर्तिकार, कलाकार, गायक कवी आणि असे सर्व आर्टिस्ट आपल्यात निर्माण झालेल्या लहरींचा मागोवा घेतंच सृजन करत असतात. हातात कुंचला घेणाऱ्या चित्रकाराला हे अचूक थोडीच माहिती असते की हा अमुक अमुक रंग तो त्यात भरणार आहे. त्यावेळी, त्याक्षणी त्याच्या मनाच्या ज्या वाईब्स आहेत त्यानूसारंच तो त्याला मूर्त रूप देत असतो. म्हणून पुढच्या वेळी तेच हुबेहूब चित्र तो पुन्हा काढू शकत नाही. ते चित्र त्या वेळच्या वाईब्सनुसार काही और असेल.
रात्रीच्या मेहफीलीत 'मालकंस' छेडणाऱ्या पट्टीच्या गायकाला देखील कुठं माहिती असतं त्यावेळी, त्या क्षणी नेमका कसा परीणाम साधला जाणार आहे. फक्त आपल्याशी एकरूप होत मनात निर्माण झालेल्या दिशादर्शक संगीताचे बोट धरून नेमका त्यानुरूप स्वरांचा निर्माणप्रवास करणे हेच त्याच्या हातात असतं. हीच कुठल्याही आर्ट आणि आर्टिस्टची ओळख आहे. 'चितपट' ही कलाकृती याच 'संगीताचा' परिपाक आहे. पावसाचं पाणी जसं नदीत मिळावं आणि नदी आडवळणे घेत अलगदपणे समुद्रात सामावली जावी इतका सहज या नाटकाच्या संहितेचा प्रवास आहे. लेखकांनी या विषयाला घेऊन निर्माण झालेलं संगीत अगदी जसंच्या तसं शब्दांत उतरवलं आहे.
वार्धक्याला पोचलेले एक दाम्पत्य, एकुलता एक तरणा मुलगा वारलेला, अशातच एक भाडेकरू त्यांच्या आयुष्यात येतो, त्याला मुलासारखा जीव ते लावतात. यातून त्यांच्या जीवनातही हरवलेला आनंद पुन्हा गृहप्रवेश करतो. सर्व काही सुरळीत सुरू असताना एका गोष्टीवरून त्यांच्यात आलेला दुरावा, दुभंगलेले नातेसंबंध आणि शेवट असा हा कथानकाचा प्रवास आहे. संहितेतील प्रत्येक पात्राचा आलेख हा सुस्पष्ट आणि रेखीव असा आहे. कथानकाला अपेक्षित पात्रांचा भाविष्कार हा अधिक सुसंगत असा वाटतो, त्यात अतिरंजक नाट्य निर्माण करण्याचा प्रयोग केला गेला नाही.
जितकी ताकदीची संहिता तितक्याच ताकदीने या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण केले गेले. दमदार आणि कसलेला अभिनय, सूक्ष्म-तपशीलवार नेपथ्य, सुस्पष्ट-भावोत्कट संगीत/पार्श्वसंगीत, कथानकाशी एकरूप झालेली लयबद्ध प्रकाश योजना आणि आखीव-रेखीव रंगभूषा-वेशभूषा या सर्वांनी मिळून कथाकाच्या जहाजाला एक वेगळाच पल्ला गाठून दिला. स्पर्धेच्या नाटकाचं सादरीकरण हे किती ताकदीने केले जाऊ शकते याचा नवा पायंडा 'चीतपट'ने घालून दिला.
नेपथ्यातुन जुना काळ जिवंत उभा केला गेला. त्या काळच्या खिडक्या, त्यावर आलेल्या वेली, दफतरी पिशवी, लोखंडी खुर्ची, जुन्या लाकडी खुर्चीला आलेला गडदपणा, अलमारी, चादरी, खिडकीवर असलेले वृंदावन, पणतीमुळे त्यात आलेलं काळवंडपण, कपडे लटकावून ठेवण्यासाठी असलेल्या खुंटी, जुनी दोन पल्ल्यांची दारं, पितळेची भांडी, काळा कोट, छड़ी इतक्या तपशीलवार त्याचा प्रयोग केला गेला.
पार्श्वसंगीत/संगीताने सादरीकरणात प्राण फुंकला. दुर्मिळ असलेली गाणी, प्रत्येक प्रसंगात समरस होणारे वैविध्यपूर्ण पार्श्वसंगीत, त्याची अचूक निवड, लाईव्ह गाण्याचा प्रयोग यामुळे संगीताने एक वेगळी छाप सोडली.
प्रकाश योजना आणि वेशभूषेत वापरलेले हलके रंग हे परस्परपूरक असे होते. अतिरंजक गडद, भडक रंगांचा वापर न करता साध्या पांढऱ्या आणि फिक्कट प्रकाश योजनेतुन मोठी किमया साधली गेली. यामुळे रंगमंचावर जिवंतपणा आला. प्रकाशाचे योग्य नियंत्रण ही यातील जमेची बाजू, प्रातःकाळचा प्रसंग, विंगेतून दिलेला स्पॉट, मध्यांतर आणि शेवटचा टाईपरायटरचा प्रसंग हे प्रकाशयोजनेचे उल्लेखनीय यश.
वेशभूषा-रंगभूषा हे देखील उल्लेखनीय आणि सुसंगत अशी होती. पात्रांच्या केशरचना, (विशेषतः काकूंच्या कानावर आलेल्या पांढऱ्या केसाच्या बटा), प्रसंगानुरूप पात्रांची वैविध्यपूर्ण हलक्या रंगछटांची वेशभूषा, काकूंची गळ्यात घातलेली पितळेची माळ या सर्व बाबी नाटकाला कालसुसंगत करण्यास अनुकूल ठरल्या.
विशाल ढोक आणि समृद्धी कामळे हे 'अण्णा आणि काकू' पात्र रंगमंचावर जगले इतका प्राण त्यांनी अभिनयात फुंकला आहे. हळवी, भोळी काकू आणि फटकळ पण आतून अत्यंत हळवे व्यक्तिमत्व असलेले अण्णा या पात्रांचे खोलवर आकलन करून ते साकार केले गेले आहे. पहिल्या समृद्धी यांनी देहबोलीत आणि आवाजात आणलेला कातरपणा अनावश्यक वाटत होता. मात्र यानंतर त्यांना लगेच सुर गवसला तो नाटकाचा पडदा पर्यंत कायम राहिला. एखादा तरुण या वयोवृद्ध अण्णाची भूमिका करतोय आहे याचा कुठलाही मागमूस विशाल ढोक यांनी सोडला नाही. अगदी पहिल्या क्षणापासून ही बेरिंग त्यांनी कायम ठेवली ती पडदा पडेपर्यंत. पहिल्या अंकाच्या शेवटच्या प्रसंगी थरथरणारा देह उभा करणे हा त्यांच्या अभिनयाचा सर्वोच्च बिंदू होता. ढोक यांचा कसदार अभिनय, पट्टीचा आवाज, अचूक संवादफेक, संतुलित देहबोली या नाटकाच्या सादरीकरणाची सर्वात जमेची बाजू आहे. इतरांनी देखील चांगला अभिनय केला.
रामशितळे या पात्राचा अभिनय ही एक औपचारिकता वाटली. रमाकांतच्या वाढदिवसाच्या प्रसंगी तो इतकी माया बघून भावनिक होतो आणि शेवटी तो ओक्साबोक्शी रडतो. जागतिक ख्याती प्राप्त अभिनय शिकविणारे अशा अनेक लोकांचं म्हणणं आहे की कोणताही माणूस रडत नाही. ही प्रक्रिया त्याच्या उलट असते. तो ही भावना आत दडवण्याचा प्रयत्न करतो पण शरीर त्याला साथ देत नाही आणि अश्रू ओघळायला सुरुवात होते. या भावनेला दाबण्याचा प्रयत्न करणे हाच खरा अभिनय असतो. यात भावनेचा योग्य समन्वय साधता आला असता.
भावगीताच्या वेळी अण्णा आणि काकूंच्या पात्रांच्या हालचालीचे आव्हान चांगले पेलल्या गेले. मात्र गजरा लावल्यावर तो पडला, हा प्रसंग सावरता आला असता. अण्णा बुद्धिबळ खेळताना पहिली काळी बाजू चालतात जेव्हा नियमांनुसार पहिली चाल ही पांढरी असते. अण्णाच्या नाराजाची प्रसंग महत्वाचा आहे. मात्र तो अनावश्यकरित्या अधिक ताणला गेला. यातून काहीवेळ एकसुरी नाट्य तयार झाले.
-अमित वेल्हेकर
नाटक : चितपट
लेखक : श्रीपाद जोशी
दिग्दर्शक : विशाल ढोक
नेपथ्य : सुरज चिकटवार
संगीत/पार्श्वसंगीत : तेजराज चिकटवार, आकाश अंबादे, अमृता मदनकर, जगदीश गोमीला
प्रकाश योजना : हेमंत गुहे
रंगभूषा/वेशभूषा : ज्योती करनुके
भूमिका : विशाल ढोक, तुषार चहारे, समृद्धी कामळे, स्वाती उलमाले, भाविक नांढा, अतुल उबाळे.


0 Comments