64 वी राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा, चंद्रपूर केंद्र; नाट्य समीक्षण : तीन पायांची शर्यत

 नाट्य समीक्षण : तीन पायांची शर्यत

(स्पर्धेतील सर्व नाट्य समीक्षण वाचण्यासाठी वरील home ऑप्शनवर क्लिक करा)

Tin payanchi sharyat



'ड्रग्स'च्या रॅकेटमध्ये फसलेल्या तरुण मुलाला योग्य मार्गावर आणण्यासाठी मोठ्या विनवण्या करून राजेंद्र हा पोलीस अधिकारी प्रतापला आपल्या घरी घेऊन येतो. पण मुलगा घरी नसतो. राजेंद्रचा नेमका हा उद्देश नसून यामागे त्याचा काहीतरी वेगळाच प्लान आहे हे पदोपदी लक्षात येतं. प्रताप गेल्यावर राजेंद्र आपली पत्नी कँसरच्या शेवटच्या स्टेजवर असून तिने केलेले लिखाण दाखवण्यासाठी प्रसिद्ध लेखिका शलाकाला घरी घेऊन येतो. इथे आल्यावर शलाकालाही इथे काहीतरी वेगळं घडत आहे याची कल्पना येते. कुठल्यातरी कामाचा बहाणा करून राजेंद्र घराबाहेर पडतो. यानंतर प्रतापची एन्ट्री होते. तेव्हा त्यांना कळतं की आपण इथे आलो नसून आपल्याला आणलं गेलं आहे. यामागचा राजेंद्रचा काय हेतू आहे, शलाका आणि प्रतापचे आपसांत काय संबंध आहेत, या दोघांचा राजेंद्रशी काय संबंध आहे या रहस्याचा उलगडा म्हणजे सस्पेन्स-थ्रिलर 'तीन पायांची शर्यत' हे नाटक आहे. प्रत्येक धक्कातंत्राने उलगडत जाणारे कथानक, उलगडणाऱ्या रहस्यातुन आणखी गूढ होत जाणारी गोष्ट हे या नाटकाच्या संहितेचे वैशिष्ट्य आहे. रिचर्ड हॅरिस यांच्या 'द बिझनेस ऑफ मर्डर' या मूळ नाटकाचे हे रूपांतर आहे. 


या नाटकाची परिणामकारकता साधण्यात सादरीकर्त्यांना यश आले आहे. उत्तम अभिनय, कल्पक नेपथ्य, सुनियोजित प्रकाशयोजना आणि उत्कंठापूर्ण पार्श्वसंगीत यामुळे नाटक शेवटपर्यंत खिळवून ठेवते. तिन्ही पात्रांसाठी कलावंतांची निवड ही आश्वासक आणि साजेशी वाटली. विनोद धकाते यांनी कसदार अभिनयाची छाप सोडली. नियंत्रित देहबोली, अचूक संवादफेक, सस्पेन्स-थ्रिलर नाटकाला साजेसे नाट्यपूर्ण हावभाव यातून राजेंद्र हे पात्र ठसठशीतपणे उभे राहिले. रंगमंचावर सर्वाधिक हालचाली करण्याचे आव्हान त्यांनी योग्यरित्या पेलले. 
आपली पत्नी आणि मुलाच्या हत्येच्या स्वकथनाच्या प्रसंगात त्यांनी प्राण फुंकला. यावेळी त्यांच्या डोळ्यातुन ओघळणारे अश्रू हे त्यांच्या जिवंत अभिनयाची साक्ष देत होते. शलाकाच्या भूमिकेत शरयू कुबेर यांनी प्रभाव टाकला. त्यांनी उभी केलेली लेखिका/पत्रकार शलाका ही आश्वासक होती. सुस्पष्ट संवादोच्चार, नियंत्रित देहबोली ही त्यांच्या अभिनयाची जमेची बाजू ठरली. पोलीस अधिकारी प्रतापच्या भूमिकेत तलाश खोब्रागडे यांनी देखील दखलपात्र अभिनय केला. विशेषतः पहिल्या अंकात प्रत्येक क्रियेमागे दिलेली नाट्यमय प्रतिक्रिया यामुळे सादरीकरण अधिक घट्ट होत गेलं, पण दुसऱ्या अंकात हे प्रयत्न कमी पडले. अनेक ट्विस्ट येणाऱ्या प्रसंगी अचूक हावभाचाही कमतरता जाणवली. संथगतीने केलेली संवादफेक यामुळे देखील सादरीकरण अधिक ताणले गेले.

Tin payanchi sharyat
'तीन पायांची शर्यत' नाटकाचा एक प्रसंग.



राजेंद्र आणि प्रताप या पात्रांचे इंग्रजी संवादोच्चारण कमी पडले. संवादात "आमची माती आमची माणसं" याऐवजी "आमचं माझा" असं झालं. "फालतू आहे पण पालतू आहे" हा संवाद महत्वाचा होता. पत्रकार-लेखिका असलेली शलाका ही पोलीस अधिकारी प्रताप याला आपण पाळलं आहे अशी म्हणते. यावर राजेंद्रची ही प्रतिक्रिया आहे. यातून नाटकात या दोघांत असलेले मतलबी संबंध इस्टॅब्लिश होतात. सवांदफेकातुन हा फरक अधिक स्पष्टपणे अधोरेखित केला जायला हवा होता.

मूळ व्यावसायिक नाटकात देखील शेवटचा प्रसंग हा अधिक ताणला गेल्याची प्रचिती येते. पण या प्रसंगात प्रत्येक संवादानंतर वेगळी कलाटणी घेणारे कथानक आहे. एकंदरीत नाटकाच्या तुलनेत या प्रसंगातील घडामोडी अधिक वेगाने घडतात. खाडकन आवाज व्हावा आणि अगदी दुसरे कथानक सुरू व्हावे असे हे स्थित्यांतर आहे. एकंदरीत हा दखलपात्र प्रभाव पाडण्यात कलावंतांचे प्रयत्न कमी पडले. 

नेपथ्य आणि प्रकाश योजना ही नाटकाच्या सादरीकरणाची सर्वात जमेची बाजू ठरली. मूळ व्यावसायिक नाटकापेक्षादेखील या दोन्ही बाबी अधिक सरस वाटल्या. रंगमंचाच्या हिशोबाने अगदी अचूक नेपथ्य उभे करण्यात आले. नाटकाच्या गूढ संकल्पनेनुसार घरावर केलेला गडद तपकिरी रंगाचा वापर, त्यात आणखी भर टाकणाऱ्या पेंटिंग्ज, पलंगावर देह टाकलेला माळा, सुरू असलेले बेसिन या सर्वांचा प्रयोग हा दाद देणारा ठरला. 'बार' उभा करण्याचा प्रसंग आणि बारचा प्रकाश हा बेसिनवर जाऊ नये म्हणून मधात उभी केलेली भिंत  हा या कल्पकतेचा कळस होता. कथानक, पात्रांच्या प्रत्येक हालचाली आणि हावभाव अधोरेखित करण्यासाठी सुसज्ज अशी प्रकाशयोजना करण्यात आली. मेणबत्तीचा प्रकाश, किचन, बार हे सर्व प्रयोग प्रभावशाली होते. पार्श्वसंगीताने देखील या नाट्यमय प्रवासात अधिक भर घातली. उत्कंठावर्धक पार्श्वसंगीत, त्यातील धक्कातंत्र याचाही चांगला वापर केला गेला.

कथानकाचा शेवट हा राजेंद्र स्वतःचा खून केल्यावर, शलाका हा खून प्रतापने केल्याचे सांगून होतो. पण हा शेवट एकंदरीत गुन्हेगारीच्या अनेक तार्किक संकल्पना देत पुढे जाणाऱ्या कथानकाच्या तुलनेत कमकुवत असा वाटतो. 

दुसरी मेणबत्ती ही लायटरने जळली नसताना प्रकाशाचा इफेक्ट देण्यात आला, यात चुकामुक झाली.

-अमित शंकर वेल्हेकर


नाटक : तीन पायांची शर्यत
लेखक : अभिजित गुरू
दिग्दर्शक : जितेंद्र बोझावार
नेपथ्य : रुपाली धकाते
प्रकाश योजना : मिथुन मित्रा
पार्श्वसंगीत : सुखदा बोझावार
रंगभूषा/वेशभूषा : मुक्ता बोझावार
भूमिका : विनोद धकाते, शरयू कुबेर, तलाश खोब्रागडे.

Post a Comment

0 Comments