परिपूर्णतेचा कळस : सैराट
५ पैकी *****
दिग्दर्शन, कथा, निर्माता : नागराज मंजुळेछायाचित्रन : सुधाकर रेड्डी संकलन : कुतूब इनामदारसंगीत : अजय-अतूलकलाकार : आकाश थोसर, रिंकू राजगुरु
......................
आतापर्यंत शांत व निरभ्र असलेल्या आकाशाला अभ्यूदयाची चाहूल लागते. बघता-बघता संपूर्ण आकाश सुर्यांनी उधळलेल्या कोमल किरणांनी रंगून जाते. पक्षांची किलबील, मनाला आल्हाद देणारा गार वारा, सर्वत्र विघुरलेल्या प्रकाशामुळे धरणीनीही आनंद, उर्जेने न्हाऊन निघते. हळूहळू सूर्य डोक्यावर येताच चटके जाणवायला सुरवात होते. आतापर्यंत प्रफुल्लीत असलेले मन कासाविस होत जाते. गरम सोसाट्याच्या वा-याने सर्व ओसाड होत जातं. गुदमरुन गेल्यासारखे होते. मध्यान्हानंतर उन्हाचा पारा जरा कमी होतो. चटके मात्र, हळूहळू बसतच असतात. संध्याकाळ होताच सुर्य मावळू लागतो. तो मावळताच सर्वत्र गडप अंधार होतो. आणि याच अस्वस्थ करणा-या अंधारात आपण आपलेच अस्तित्वच चाचपडत बसतो. ''सैराट'' या चित्रपटाचा मला वाटणारा हा भावार्थ आहे.
आपल्या मनातलं भावविश्व जसंच्या तसं साकार करण्याकरिता एखादा कलाकार आणि त्याची टीम कुठली उंची गाठू शकतो याचं परिपूर्ण उदाहरण म्हणजे ''सैराट'' चित्रपट. हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड ठरलेला आहे. चित्रपटाच्या तांत्रिक बाबींपासून तर कलात्मक पैलूंवर घेतलेली प्रचंड मेहनत, त्यातील नेमकेपणा, संतुलितपणा यातून निर्माण झालेली ही कलाकृती प्रेक्षकांच्या हृदयाला ''सैराट'' करते. एखाद्या साधारण संकल्पनेला कल्पनाही करु न शकणा-या असाधारण पद्धतीने मांडण्याची सचोटी जागतिक चित्रपटसृष्टीतील थोडक्याच दिग्दर्शकांमध्ये आहे. त्यात आता नागराज मंजुळेचे नाव जुळले आहे.
''सैराट''मधून नागराजने जे वास्तव मांडले आहे ते वाचून समजन्यापेक्षा प्रत्यक्ष पाहून समजलेलेच बरे. ''सैराट''ची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे हा चित्रपट नुसता खिळवून ठेवत नाही, तो प्रत्यक्ष तुम्हाला त्यात सहभागी करुन घेतो. नागराज आणि त्याच्या टीमने सैराटच्या माध्यमातून समाजमनाशी साधलेला संवाद हा अस्वस्थ आणि अंतर्मुख करणारा आहे. या चित्रपटातील प्रत्येक पैलूंवर स्वतंत्रपणे लिहू शकण्याइतपत भक्कम काम करण्यात आले आहे. याची सर्वात जमेची बाजू म्हणजे यात निवडण्यात आलेले कलाकार. केवळ अर्ची आणि परश्याच नव्हे तर सल्ल्या, लंगड्या, प्रिंस आणि असे अनेक पात्रे ज्या पद्धतीने प्रस्तूत होतात तसे आजवर कुठल्याही मराठीत चित्रपटात भेटणार नाहीत. सर्वार्थाने सामान्य वाटणारे हे पात्र आपल्या आजूबाजूचेच वाटतात आणि त्यामूळेच प्रेक्षक त्यात सहजपणे गूंतत जातो. अजय-अतूल जोडीच्या संगीताने अक्षरश: जादू केली आहे. पाश्चिमात्य आणि दाक्षिणात्य संगीत प्रयोगाच्या अवीट गोडीसह अस्सल मराठी मातीचा सुंगध असलेले गीतांची तोड नाही. नुकत्याच आलेल्या तारुण्यात प्रेमाचे ''याड'' लागल्यानंतर एरव्ही सर्वसामान्य वाटणारे जग किती सुंदर होऊ शकते तसेच वास्तविकतेचे भान आल्यानंतर हेच जग किती संघर्षपूर्ण होऊ शकते याचे हृदयाला भिडणारे छायाचित्रण ही दूसरी जमेची बाजू. सिनेमॅटोग्राङ्कर सुधाकर रेड्डी याने आकाशात झेप जरी घेतली तरी त्याला वास्तविकतेच्या जमीनीचा भक्कम आधार आहे. प्रत्येक सीनमधून व्यक्त होताना त्याच्या तांत्रिक तपशिलांकडे दिलेले लक्ष हे कुठल्याही जाणकार प्रेक्षकाला भुरळ पाडू शकेल. नागराजचे स्वप्न सुधाकरने आपल्या डोळ्यातून पाहून ते अधिक व्यापक आणि समर्थ केले हेच छायाचित्रण पाहूण प्रकर्षाने जाणवते. याला तेवढीच भक्कम साथ मिळाली आहे ती कुतूब इनामदार याच्या उत्कृष्ट संकलनाची. ज्या सलगतेने आणि सहजतने चित्रपटाची कथा समोर जाते ती कुतूबच्या संकलनाची कमाल आहे. वेशभुषाकाराने घेतलेल्या परिश्रम दखल घेण्यास पात्र आहे. आकाश आणि रिंकू यांचे वास्तविक पण उठावदार वाटणारे व्यक्तीमत्व साकार करण्यासाठीचे आव्हान उत्तमपणे पेलल्या गेले. तसेच चित्रपटाचे पाश्र्वसंगीत, साऊंड इंजिनिअरींग, मिक्सींग चित्रपटाला परिपूर्णतेच्या शिखरावर नेऊन ठेवतात. या चित्रपटाचे डोलारा सांभाळणा-या नागराजचे जेवढे कौतूक करावे तेवढे थोडेच आहे. एक दिग्दर्शक म्हणून चित्रपटातील नागराजची पकड कधीही सुटत नाही. प्रत्येक सीनमागे ती आणखी भक्कम, सखोल आणि उदात्त होत जाते. विशेष म्हणजे यावर कुठल्याही चित्रपट तंत्राचा प्रभाव जाणवत नाही. नागराज ज्या स्वतंत्र, रांगड्या आणि प्रामाणिकपणे व्यक्त होतो हीच या चित्रपटाची खरी खुबी आहे. ऐरव्ही दुर्लक्षित असलेले जीवन नागराजने ज्या बारकाईने टिपले आहे त्याला मनस्वी दाद द्यावीशी वाटते. नागराज आणि त्याच्या टीमने कला आणि तंत्राची जी अजोड कलाकृती प्रस्तूत केली त्याला ''परिपूर्णतेचा कळस'' असे म्हणण्याशिवाय पर्याय नाही.
0 Comments