फन नसलेला "फॅन'
रेटींग : **
....................
दिग्दर्शक : मनिष कुमार
निर्माता : आदित्य चोप्रा
कथा-पटकथा : हबिब फैजल
छायाचित्रण : मनू आनंद
संकलन : नम्रता राव
कलाकार : शाहरुख खान, श्रीया पिळगावकर, दीपिका अमिन, योगेंद्र टिकू.
.........................भारतासारख्या व्यक्तीपूजक देशात सिने अभिनेत्यांबद्दल कमालिचे क्रेझ असणा-या फैनची काहीही कमी नाही. मात्र, अशा क्रेझी फैन्सवर बेतलेल्या चित्रपटांची संख्या अत्यंत तोकडी आहे. यात आता शाहरुखच्या बहुचर्चित असलेल्या "फॅन' चित्रपटाची भर पडली आहे. एखादा क्रेझी "फॅन' आपण जीवापाड प्रेमकरीत असलेल्या स्टारचे मन वेधन्याकरीता काय करु शकतो आणि त्यांनतर झालेल्या भ्रमनिरासानंतर सूड उगविण्याकरीता कुढल्या थरापर्यंत पाहचू शकतो याचे थरारपूर्ण चित्रांकन म्हणजे "फॅन' च्या प्रदर्शनापूर्वीचा बहुतेकांचा समज. तो चित्रपट पाहिल्यानंतर फोल ठरतो. यशराज सारखे भव्य बॅनर, शाहरुखसारखा मेहनती अभिनेता आणि आणि जागतिक किर्तीचे तंत्रज्ञ आणि तंत्रज्ञानाचा वापर करुन घेऊनही हा चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यास असमर्थ ठरतो. चित्रपटाला अतिथरारक करण्याच्या नादात निर्माण झालेली तर्कहीन पटकथा, प्रभावहिन संवाद आणि उत्कंठा न निर्माण करु शकलेल्या तांत्रिक बाबी यामुळे चांगली संकल्पना असूनही एक चांगला चित्रपट बनण्यास हा चित्रपट तोकडा पडल्याचे जाणवते. मनिश शर्मा यांचे नियंत्रणहीन आणि अभ्यासहीन दिग्दर्शन हे या चित्रपटाचे सर्वात मोठे अपयश आहे. यामुळे शक्यता आणि क्षमता असूनही फॅन हा फन (कला) नसेलला चित्रपट वाटतो.
दिल्लीत राहणारा गौरव (शाहरुख खान) याच शहरातून गेलेला आणि स्वत:च्या भरवशावर सर्वात मोठा सिनेस्टार झालेल्या आर्यन खन्ना (शाहरुख खान) याचा सर्वात मोठा फॅनरूपी भक्त असतो. कधी तरी आपल्याशी त्यांची गाठभेट होईल या भावविश्वातच तो वावरत असतो. त्याच्या या स्वप्नाची पूर्तता व्हावी याकरिता घरच्यांचेही भक्कम पाठबळ असते. त्याला आवडणारी नेहा (श्रेया पिळगावकर) एकीकडे विदेशात जाण्याचे स्वप्न बघत असताना गौरव अपेक्षेचे गाठोडे घेऊन आर्यन खन्नाची भेट घेण्यासाठी मुंबईला जाण्याचा बेत आखतो. इथे पोहचल्यानंतर त्याला कळते ही आपण आर्यनचे एकमेव चाहते नसून अशा लाखोंपैकी एक आहोत. या दरम्यान तो आर्यन भेट न झाल्याने कमालिचा हताश होतो. याच दरम्यान त्याला कळते की आर्यनचे एका नव्या नटा बरोबर बिनसले आहे आणि तो नवा स्टार आर्यनला न्यायालयात खेचण्याच्या तयारीत आहे. तो एक डाव खेळतो. तो त्याच्या अंगवळणी येतो. मात्र, त्याची भेट आर्यन खन्नाशी होते. आर्यन खूप खुश होणार अशी आशा गौरवला असते. मात्र, आर्यन त्यांच्या सर्व अपेक्षांना धुडकावून लावतो. त्याला जराही किंमत न देता आर्यन गौरवला परत आपल्या शहरात जाण्याची सक्त ताकिद देतो. हा गौरवकरीता सर्वात मोठा धक्का असतो. देवाप्रमाणे पुजलेल्या स्टारकडून मिळालेल्या अशा तुच्छतापूर्ण वागणूकीने त्याचा सर्वात मोठा भ्रमनिरास होतो अन गौरव त्याचा सुड घेण्याचे ठरवितो. आणि पुढे सुरु होतो फॅन आणि स्टार यांच्या संघर्षाचा थरार. त्यांनतर नेमके काय होते. गौरव आणि आर्यन यापैकी कोण जिंकतो? कोण आपली बाजू नमते घेतो? या सर्व प्रश्नांचा उलगडा समोर होत जातो.
वरकरणी उत्कंठा निर्माण करणारे कथानक चित्रपटस्वरुपात बघताना अपेक्षा भंग होतो. चित्रपटजगताचा एक अभिन्न भाग असलेला वर्ग आपल्याच विश्वाच्या चांगल्या वाईट पैलूवर वास्तवरुपी प्रकाश टाकताना हा प्रयत्न इतका बाळबोध का होतो हा सर्वात मोठा प्रश्न आहे. हा प्रश्न प्रेक्षक म्हणून शेवटपर्यंत तुम्हाला छळत असतो. चित्रपटात असलेले आर्यन खानचे पात्र प्रत्यक्षात शाहरुख खानचा संघर्ष, त्याचे यश, आणि त्याला मिळालेल्या अमाप प्रसिद्धीचे वलय यापासून प्रभावित आहे. मात्र, यात दाखविण्यात आलेले वास्तव अत्यंत बनावटी वाटते. तो ''लार्जर दॅन लाइफ'' यापेक्षा हे पात्र एक व्यावसायीक बाहुले कसे आहे. हेच दिग्दर्शक अप्रत्यक्षरीत्या सांगतो. दिग्दर्शकाला नेमके काय सांगायचे आहे हा दुसरा प्रश्न. त्याला शाहरुखच्या ''डर'' चित्रपटातील पात्राला पुर्नजिवीत करायचे होते की ''कॉपीकॅट'' सारख्या हॉलिवूडपटाचा थरार दाखवायचा होता हेच कळत नाही. गौरवच्या पात्राचा मानसशास्त्रीयदृष्या केलेल्या तोकडा अभ्यास हा संभ्रम निर्माण होऊ देण्यास पात्र ठरतो. चित्रपटाची पटकथा मध्यांतरापर्यंत ब-यापैकी चालते. त्यानंतर त्यात टाकलेले तर्कहिन ट्विस्ट, ङ्किल्मी पाठलाग, अतिरंजित साहसदृश्ये, कथानकविरहीत कथा यामुळे चित्रपट कमालिचा भरकटत जातो. हबीब फैजल यांचे संवाद अत्यंत प्रभावहिन आहेत. यात दिल्लीतील चांदणीचौकमिश्रीत भाषेचा बाज टाकण्यापलीकडे काही विशेष करण्यात आले नाही. चित्रपटाचे छायाचित्रण आणि संकलन देखील सुमरच आहे . एखाद्या विक्षिप्त फॅनच्या सुडाचा थरार निर्माण करण्यासाठी चित्रपटातील साहसदृश्ये सर्वात प्रभावि माध्यम होते. याची जबाबदारी जागतिक ख्यातीचे दक्षिण कोरियन अॅक्शन डायरेक्टर सेयोंग ओह यांना देण्यात आली. मात्र, यातील जास्तीत जास्त साहसदृश्ये बनावटी आणि निष्प्रभ वाटतात. त्यांच्यावर बोर्न सुप्रिमेसी ते बोर्न अल्टीमेटम किंवा डेनियल क्रेगच्या बाँडपटाचा अतिरेकी प्रभाव जास्त जाणवतो. साहसदृश्ये चालत असताना त्या ठिकाणांचा नेमकेपणा जाणवत नाही. त्यात खरेपणा जाणवत नाही. ही हौस दिग्दर्शकाला अॅलन अमिन किंवा श्याम कौशल किंवा अन्य भारतीय अॅक्शन डायरेक्टरकडूनही भागविता आली असती. ''परसुट ऑफ हॅपिनेस''सारख्या संवेदनशील हॉलिवुडपटाला तितक्यात प्रभाविपणे संगीत देणारे ज्येष्ठ पाश्र्वसंगीतकार अँण्ड्रीआ गुएर्रा यांनी फॅनला आपले संगीत दिले आहे. स्वतंत्र्यरित्या बघितल्यास हे संगीत चांगलेही आहे. मात्र त्यांच्याकडून काही खास तयार करवून घेण्यात आले नाही. यावर बॅटमॅन, एमआय सीरीज आणि बाँडपटाप्रमाणे निर्मिती करण्याचा दबात जास्त होता असे वेळोवेळी जाणवते. ही जबाबदारी सलिम सुलेमान सारखे पाश्र्वसंगीतकार उत्तमरित्या पार पाडू शकले असते. जमेचीच बाजू सांगायची झाल्यास शाहरुखने गौरवची भूमिका उत्तमरित्या पार पाडली आहे. वयाच्या पन्नासाव्या वर्षी वीशीच्या युवकाची देहबोली, त्याची उर्जा, भावविश्व याला शाहरुखच्या अभिनयाने प्रामाणिकपणे न्याय दिला आहे. मेकमननेही चांगले काम केले आहे. मात्र, याव्यतीरिक्त चित्रपटाबद्दलच्या सकारात्मक बाजू बोलण्याइतक्या विषेष नाही. चित्रपटाची सर्वस्वी जबाबदारी ही दिग्दर्शका मनिष शर्माची होती. तांत्रिक आणि कलात्मक बाजूंचे योग्य संतूलन साधले असता हा चित्रपट चांगला बनू शकला. मात्र, चित्रपटाला जास्त तडका देण्याकरीता केलेल्या धडपडीत ही संधी हुकून गेले असल्याचे वाटते. त्यामुळे चित्रपटात क्षमता असूनही "फॅन' आपले ''फंन'' दाखविण्यास असमर्थ ठरतो.
0 Comments