अमित वेल्हेकर
चंद्रपूर : अगदी काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे भक्कम आधारवड मानले जाणारे राष्ट्रीय समन्वयक डॉ.
अशोक जीवतोडे यांनी आता मात्र 'एकला चलो रे' चा नारा देत संघटनेपासून अलिप्त राहण्याची भूमिका घेतलेली आहे. याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात असले तरी काही स्वयंघोषित नेत्यांच्या लुडबुडीमुळे डॉ. जीवतोडे यांनी या संघटनेत सक्रिय राहण्यापासून दोन हात लांब राहण्याचे पसंत केले आहे.
![]() |
| राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 'राष्ट्रीय समन्वयक' उल्लेख विरहित लागलेले फलक |
याचे प्रतिबिंब डॉ. अशोक जीवतोडे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या शुभेच्छा फलकांमधून दिसून येत आहे. यापूर्वी जीवतोडे यांच्या प्रत्येक प्रसिद्धी फलकात त्यांच्या नावापुढे राष्ट्रीय समन्वयक अशी बिरुदावली आवर्जून लावली जायची. त्यांच्या उपस्थितीत झालेली आंदोलने, कार्यक्रम यांचे फोटो आवर्जून त्या फलकात टाकले जायचे.
विदर्भातील शिक्षण संस्थेत डॉ. अशोक जीवतोडे यांच्या चांदा शिक्षण प्रसारक मंडळ या शैक्षणिक संस्थेचा दबदबा आहे. अनेक जिल्ह्यात या संस्थेच्या शेकडो शाळा, महाविद्यालये आहेत कुठल्याही संघटनेचा पाया भक्कम करण्यासाठी गरज असते ती आर्थिक पाठबळ आणि मनुष्यबळाची. डॉ. जीवतोडे यांच्याकडे याची काहीच कमी नाही. ते संघटनेचे राष्ट्रीय समन्वयक झाले आणि या संघटनेला चालना मिळण्यास मोठी मदत झाली. कुठलेही आंदोलन, उपक्रम राबवायचे झाल्यास 'जनता महाविद्यालय चौक' 'फिक्स' असायचा. हाकेच्या अंतरावर असलेल्या त्यांच्या महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी गळ्यात दुपट्टा टाकून जमण्यास काहीच वेळ लागायचा नाही. आंदोलन, निदर्शने आणि प्रसार माध्यमांना 'बाईट्स' देऊन झाले की हा दुपट्टा काढून महाविद्यालयात पूर्ववत काम करण्यास ह्या कर्मचारी वृंदांना सोयीचे होत होते. या दरम्यान डॉ. जीवतोडे हे राष्ट्रवादीत होते. शरद पवारांपासून तर सुप्रिया सुळे यांचे अनेक कार्यक्रम याच महाविद्यालयात आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी या सर्व कार्यक्रमांत सक्रियरित्या कार्यरत राहण्याची नैतिक जबाबदारी देखील याच कर्मचाऱ्यांवर होती. राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना दोन्हींच्या कार्यक्रमांचा सपाटा जोरात सुरू होता. याच दरम्यान राष्ट्रीय ओबीसी संघाचा दबदबा वाढावा म्हणून याचे राष्ट्रीय संमेलन देशातील महत्त्वाच्या ठिकाणी घेण्याची सुपीक कल्पना उदयास आली. डॉ. जीवतोडे हे राष्ट्रीय समन्वयक असल्याने याच्या आयोजन, नियोजनाचा देखील तोटा नव्हता. जीवतोडे यांच्या संस्थेत कार्यरत शिक्षक-शिक्षकोत्तर येथेही वर्णी लावण्यात आली, अर्थातच अनौपचारिक.
याच दरम्यान डॉ. जीवतोड यांनी 'घड्याळा'त बिघाड आल्याचे बघत राष्ट्रवादी सोडून भाजपचा झेंडा हाती घेतला. अर्थात प्राध्यापक, कर्मचाऱ्यांची भूमिका ही वेगळी सांगायची गरज नाही. सर्वकाही सुरळीत सुरू होते. याच दरम्यान 2025 मध्ये गोवा येथे ओबीसी संमेलन होण्याची जयत तय्यारी सुरू झाली. मात्र दरम्यान कुठली माशी शिंकली हे कळलं नाही. एरव्ही प्रकाशझोतात राहणारे डॉ. जीवतोडे ऑगस्ट महिन्यात पार पडलेल्या या अधिवेशनात अचानक दिसेनासे झाले. यानंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या होणाऱ्या कुठल्याही कार्यक्रमात त्यांची हजेरी दिसली नाही. त्यांनी यापासून अलिप्त राहण्याची भूमिका घेतली. यामागचे नेमके कारण काय याबाबत संघटना किंवा स्वतः जीवतोडे यांच्याकडून अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र संघटनेत कार्यरत काही 'स्वयंघोषित' नेत्यांच्या उपद्रवामुळे त्यांनी या संघटेतुन काढता पाय घेतला असे बोलल्या जात आहे.
'गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत सर्व आपल्यालाच कळतं, आपल्या आजूबाजूला जे काही होतं ते आपल्यामुळेच होतं, बाकीच्यांना काहीच अक्कल नसते, सर्व नेते-अधिकाऱ्यांत आपलाच दबदबा आहे' अशी चारचौघात फुशारकी मारणारे स्वयंघोषित नेते प्रत्येक संघटनेत असतात. पुढे हेच नेते लोकांच्या विनोदाचे विषय होतात. मात्र असल्या स्वयंघोषित नेत्यांमुळे संघटनेचे अतोनात नुकसान होत असते, या डोकेदुखीमुळे महत्वाचे लोक आपला काढता पाय घेतात. त्यात राष्ट्रीय ओबीसी संघ अपवाद नसावा. मात्र हा स्वयंघोषित नेता नेमका कोण हे अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही.
याच दरम्यान डॉ. जीवतोडे यांची 'एकला चलो रे'ची भूमिका त्यांच्या वाढदिवसानिमित्त लागलेल्या फलकांच्या माध्यमातून बरेच काही सांगून जात आहे.

0 Comments